धाराशिव, (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यात सिलिंग जमिनीच्या गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागासवर्गीयांना दिलेली सिलिंग जमीन बेकायदेशीर मार्गाने बळकावण्याचा प्रकार उजेडात आला असून, या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचा आरोप आहे.
तुळजापूर खुर्द (जि. धाराशिव) येथील जमीन सर्वे नं. 103/1 मध्ये चार एकर 29 गुंठे सिलिंग जमीन लक्ष्मण सिताराम कदम यांना मिळाली होती. या जमिनीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र, लक्ष्मण कदम यांना अर्धांगवायू झाल्यानंतर शेती पडीक राहिली. याचाच गैरफायदा घेत नागनाथ भोजने यांनी बनावट इसार पावती आणि कागदपत्रे तयार करून, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीररीत्या आपले नाव नोंदवले.
लक्ष्मण कदम यांचे वारसदार शांताराम कदम यांनी या प्रकाराची तक्रार तहसीलदार यांच्याकडे केली. त्यांनी दोन्ही पक्षांना नोटीस काढून कागदपत्रांची सखोल पडताळणी करणे अपेक्षित होते. मात्र तहसीलदारांनी फक्त नागनाथ भोजने यांनाच नोटीस काढली आणि प्रकरण थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे नियमानुकुल करण्यासाठी पाठवले. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जमिनीवर अनधिकृत प्लॉटिंग:
या सिलिंग जमिनीचा एक भाग तडवळा कॉर्नर येथे विनापरवाना एन.ए. लेआउट न करता प्लॉटिंग करून विक्री करण्यात आली आहे. ही कृती सिलिंग जमीन बळकावण्याचा संघटित प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
गुन्हे दाखल करण्याची मागणी
शांताराम कदम यांनी तहसीलदार यांना वारंवार अर्ज करून प्रत्यक्ष जागेची पाहणी व पंचनामा करण्याची विनंती केली. परंतु याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी 23 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत संबंधितांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणी जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका कितपत निष्पक्ष आहे, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यामुळे तुळजापूर तालुक्यातील भूमाफिया आणि प्रशासकीय भ्रष्टाचाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- 5 मोटरसायकल व डिझेलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
- त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?
- जिल्हा परिषदेचा ढिसाळ कारभार ! मार्चमध्ये सुट्टीच्या दिवशी काम करण्याचा आदेश, कर्मचारी उपस्थित – विभाग प्रमुख मात्र गायब!!
- धाराशिव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- आमदार कैलास पाटील यांची सरकारवर टीका – जिल्हा आणि राज्याच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष