अतिक्रमण हटाव मोहीम धाराशिव – धाराशिव शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू होणार असून सरकारी कार्यालयांनी केलेले अतिक्रमण हटवून खाजगी अतिक्रमण काढण्यात येणार आहे.शहरातील तेरणा महविद्यालय ते तुळजापूर नाका रस्त्यावर असणाऱ्या सर्व अतिक्रमणावर ही कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद यासारख्या अनेक कार्यालयांनी सुरक्षा भिंत बांधताना अतिक्रमण केलेले आहे. रस्त्याची मोजणी करताना हे अतिक्रमण असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला आढळून आलेले असताना देखील कधीच ते काढण्याचे धारिष्ट्य या विभागाने केलेले नाही.तेरणा महाविद्यालय ते तुळजापूर नाका दरम्यान नालीचे बांधकाम होणार असल्याने ही अतिक्रमण मोहीम राबविण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने ठरवले. शेकडो दुकानांना, हातगाडी मालकांना, टपरी धारकांना याबाबत पूर्वीच नोटिसा देण्यात आलेल्या आहेत.अर्थात त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. खाजगी अतिक्रमण बेकायदेशीर असले तरी नगरपालिका त्यांच्याकडून नियमितपणे दैनंदिन कर वसूल करते. हातगाडी मालकांना बाजारासाठी हॉकर्स झोन तयार करून देणे ही शासनाची जबाबदारी असताना ती टाळून त्यांच्यावर कारवाई करणे ती देखील एका नालीच्या बांधकामासाठी हे चूक की बरोबर याचे उत्तर शासनाने द्यायला हवे.