धाराशिव –
पिकाचे नुकसान झाले तर पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मदत मिळते मात्र त्यासाठी नुकसान झाल्याच्या ७२ तासाच्या आत तक्रार करावी लागते मात्र तक्रार करण्यासाठीची वेबसाईट बंद असल्याने शेतकऱ्यांना तक्रार करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना पत्र काढत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२४ हंगामात, दिनांक २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२४ दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन पिकांचे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकरी स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसान बाबी अंतर्गत विमा कंपनीला नुकसानीच्या सूचना देत आहेत.
मात्र दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री पासून PMFBY पोर्टल बंद असल्यामुळे शेतकरी सूचना देऊ शकत नाही. या परिस्थितीत जेवढ्या कालावधीसाठी पोर्टल बंद आहे, तो कालावधी नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सूचना देण्यासाठी ७२ तासाची मुदतीमध्ये गृहीत धरला जाणार नाही याची सर्व विमा कंपन्यांनी नोंद घ्यावी, विमा कंपन्यांनी त्यांचे तालुका प्रतिनिधी जिल्हा प्रतिनिधी यांच्यामार्फत हा संदेश सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अश्या सूचना कृषी आयुक्तालयाने विमा कंपन्यांना दिल्या आहेत.