धाराशिव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्यांचा प्रताप
धाराशिव, दि. ३० (आकाश नरोटे)
जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा यांचा अजब कारभार समोर आला आहे. कार्यालयांतर्गत असणाऱ्या वाहनांचा वेळेत विमा काढणे, फिटनेस, पीयूसी काढणे याची जबाबदारी असणाऱ्या उप अभियंता एस. पी. शिंदे यांना २१ ऑगस्ट रोजी अंतिम कारणे दाखवा नोटीस काढली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षीत असताना कार्यकारी अभियंत्यांना वेगळीच कार्यपध्दती शोधून काढली आहे. अंतिम कारणे दाखवा नोटिशीनुसार कारवाई करण्याऐवजी दि. २३ सप्टेंबर रोजी पुन्हा कारणे दाखवा नोटीस काढून प्रशासकीय कार्यवाहीचा नवीन प्रताप आणला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीसाठी हातपंप दुरुस्तीसाठी पंचायत समिती स्तरावर वेगवेगळी सहा वाहने देण्यात आली आहेत. त्या वाहनाचा विमा काढणे, फिटनेस पीयूसी काढणे याची जबाबदारी उप अभियंता यांत्रिकी यांची आहे. मात्र उप अभियंता यांनी हे कर्तव्य पार न पाडल्याने उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना ५२ हजाराचा दंड देखील ठोठावला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सचिन सर्जे यांच्या तक्रारीवरून सुरू असून पहिली तक्रार त्यांनी ०३ मे रोजी केली त्यावर उप अभियंता यांना पहिलं पत्र ११ जून रोजी काढण्यात आले. त्यानंतर दुसरे पत्र १८ जून रोजी कार्यकारी अभियंता यांनी उप अभियंता यांना काढले त्यांनतर २१ ऑगस्ट रोजी उप अभियंता यांना अंतिम कारणे दाखवा नोटीस काढण्यात आली.त्यात
कार्यालयांतर्गत शासकीय वाहनांचा वेळेत विमा काढणे, फिटनेस व पीयुसी काढणे हे आपले अभिप्रेतः कर्तव्य असताना तशी कार्यवाही न करता वाहने नियमबाह्यपणे चालू ठेवुन कर्तव्यात कसूर केल्याचे सकृतदर्शनी सिध्द होत असल्याचे म्हटले आहे. सुचना देवुनही वरील बाबी प्रलंबीत ठेवलेल्या आहेत.
यावरुन उपअभियंता शासकीय नियमांचे व वरीष्ठांच्या सुचना व आदेशांचे उलंघन करत असल्याचे
स्पष्ट होत असल्याचे म्हटले आहे. तसेच याबाबत खुलासा सादर न केल्यास किंवा समाधानकारक व वेळेत सादर न केल्यास आपले काहीही म्हणने नाही असे गृहीत धरुन आपणा विरुध्द संदर्भीय नियमानुसार सक्त शिस्तभंग विषयक कार्यवाही अनुसरली जाईल असा सज्जड इशारा देखील देण्यात आला होता तसेच खुलासा सादर न केल्याने वरिष्ठांच्या आदेशाचे व शासन नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून येत असल्याचे म्हटले आहे. असे असून देखील कार्यकारी अभियंता यांनी पुन्हा २३ सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीस काढल्याने प्रशासकीय पत्राचा हा खेळ नेमका कशासाठी सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ही वाहने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नावाने आहेत. तरी प्रकरणांत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलदगतीने कारवाई करावी, अन्यथा या प्रकरणात न्यायालयात जाणार आहे. सचिन सर्जे, तक्रारदार