ईट सोमेश्वर स्वामी:
भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथे तिसऱ्या श्रावण रविवारच्या निमित्ताने विनोदाचार्य हभप पांडुरंग महाराज उगले यांच्या किर्तनाचे आयोजन दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जोतिबा मंदिर परिसरात करण्यात आले आहे.
किर्तनाच्या माध्यमातून जनमानसांत प्रबोधनाचा वारसा रुजवण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून जोतिबाचीवाडी येथील गावकऱ्यांच्या वतीने लोकवर्गणीतुन जोतिबाचीवाडी येथे श्रावण महोत्सवात
अखंड हरिनाम सप्ताह तसेच तिसऱ्या श्रावण रविवारी जोतिबा मंदिर परिसरात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकार यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
पंचक्रोशीतील हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात.
किर्तन सोहळ्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी ही जास्तीत जास्त भाविकांनी किर्तन सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जोतिबाचीवाडी भजनी मंडळ तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
बालाघाटच्या डोंगर रांगेत सौंदर्याने खुललेलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं ज्योतिबा मंदिर भाविकांना आकर्षित करत आहे.विलोभनीय निसर्गाचा आविष्कार लाभलेलं भुम तालुक्यातील जोतिबाचीवाडी येथील हे जोतिबा मंदिर कोल्हापूरच्या जोतिबाच अधिष्ठान म्हणून ओळखले जाते.
चैत्र महिन्यात मोठ्या स्वरूपात जोतिबा याञा भरते तेव्हा मोठ्या प्रमाणात येथे भाविकांची गर्दी पहावयास मिळते.
या गावात मांसाहार करण्यास वर्ज आहे.
वारकरी संप्रदायाची संस्कृती जपणार आणि शुद्ध शाकाहारी गाव म्हणून या गावाची एक विशेष ओळख आहे.
गेली अनेक वर्षापासून श्रावण रविवार हा जोतिबाचीवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे बहरलेला निसर्ग आणि प्रबोधनात्मक विचारांची मांदीआळी या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. नोकरी, व्यवसायासाठी बाहेरगावी असलेले गावकरी श्रावण महोत्सवा निमित्ताने जोतिबा दरबारी एकत्रित येतात. अनेक अन्नदाते समाजाप्रती सामाजिक दायित्व भावनेतून अन्नदान करतात.
हजारो भाविक तिसरा श्रावण रविवारच्या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात.लक्ष्मण जाधव
(जोतिबाचीवाडी)