धाराशिव – गेल्या काही दिवसात जिल्ह्यात उद्घाटने झालेल्या आरोग्य विभागाच्या बांधकामांना शासनाचा छदाम देखील उपलब्ध नसल्याचा गंभीर आरोप शिवसेना ( उबाठा) चे सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांनी शिवसेना तालुकास्तरीय कार्यशाळेत केला. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर जिल्ह्याला विकासाच्या नावावर केवळ नारळ मिळाला असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
तसेच जिल्ह्यात जी आरोग्य शिबिरे घेतली त्यात दिली गेलेली औषधे जिल्ह्यातील इतर शासकीय रुग्णालयातून घेतली गेली मात्र शिबिरासाठी औषधाची वेगळी तरतूद न केली गेल्याने औषधांचा तुटवडा होऊन रुग्णांना त्याचा फटका सहन करावा लागला.
या कार्यशाळेत बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी भाजप च्या धोरणावर जोरदार प्रहार केला.
विधानसभा अध्यक्षांनी खोटारडेपणा करत निकाल दिला आहे, यापूर्वी राज्यातील राजकारण कधीही असे झाले नव्हते, सत्ताधाऱ्यांचा खोटारडेपणा जनतेपर्यंत पोहोचवा असेही त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले. सध्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. धाराशिव शहरातील स्वच्छतेवरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.नेत्यांना बदनाम करून फोडाफोडी करून मत मागितली जातील त्यापासून सावध रहा असा सल्ला देखील उपस्थित शिवसैनिकांना त्यांनी यावेळी दिला.
या कार्यशाळेत जिल्हा प्रमुख आ. कैलास पाटील यांनी देखील राज्य सरकार आणि विरोधकांवर चांगला निशाणा साधला. मूलभूत विषय बाजूला ठेवून मराठा ओबीसी वाद लावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला तसेच वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरात मध्ये जात असताना मोठ्ठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन प्रधांमंत्र्यांनी दिले होते तो प्रकल्प कुठे आहे हे देखील सत्ताधाऱ्यांना विचारा, जिल्ह्यात पाच हजार कोटींची कामे आणली म्हणून सत्कार करून घेतला ती कामे कुठे आहेत हे देखील सत्ताधाऱ्यांना येत्या काळात विचारा असे आ. कैलास पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले.
या कार्यशाळेला सहसंपर्कप्रमुख शंकरराव बोरकर, उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, तालुकाप्रमुख सतिश सोमाणी, युवासेना राज्य विस्तारक अक्षय ढोबळे, युवासेना सहसचिव मनीषा वाघमारे, पंचायत समिती माजी सभापती शाम जाधव, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक राजाभाऊ पवार, गणेश खोचरे,रवी वाघमारे, दयानंद येडके, बाळासाहेब काकडे तसेच धाराशिव शहरासह तालुक्यातील सर्व गटप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, आदींसह, शिवसैनिक उपस्थित होते.