धाराशिव – महायुतीच्या धाराशिव येथील मेळाव्यात आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांनाच लक्ष्य केले. १८ लाख जनतेसाठी केंद्रातील एक योजना आणलेली दाखवा म्हणल ती पैज असे थेट आव्हान विद्यमान खासदारांना यानिमित्ताने दिले तसेच एक महिना शिल्लक आहे आणता आली तर एखादी केंद्राची योजना आणून दाखवा असेही ते यावेळी म्हणाले.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी धाराशिव जिल्ह्याला भावनिक आवाहनाला मतदान देण्याची सवय आहे त्याला छेद द्या भावनेच्या आहारी जाऊन मतदान करणं पाप आहे असे सांगितले. पुढे बोलताना डॉ. सावंत म्हणाले की विरोधकांची अवस्था शोले चित्रपटासारखी झाली आहे आधें इधर जाव आधे उधर जाव, धाराशिव जिल्हा आकांक्षीत जिल्हा असून मागच्या पापात जाणार नाही, जो नेता विकास उंबऱ्या पर्यंत आणेल तोच आपला नेता. विकासाच्या विषयी मी स्फोटक आहे. आकांक्षित जिल्ह्याची ओळख पुसण्यासाठी माझा रोड मॅप तयार आहे. लोकसभेचे तिकीट कोणाला मिळेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील दिलेल्या उमेदवाराला अडीच लाखांच्या पुढे मताधिक्य असेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बाहेरच्या जिल्ह्यातील नेत्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या फंदात पडू नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना मेळाव्यात बोलू दिलं नाही, शिवसैनिकांची नाराजी?
लोकसभा निवडणुकीपूर्वी हा मेळावा होत असल्याने याला महत्व होते. सर्वच घटक पक्षातील नेत्यांची यानिमित्ताने भाषणे झाली मात्र आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या भाषणानंतर पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना भाषणासाठी बोलवले गेले त्याच वेळी आ. ज्ञानराज चौगुले यांनी माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना बोलू देण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे केली मात्र ती मागणी मान्य न केल्याने मंचावर उपस्थित शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही काळ नाराजीचे चित्र होते.