धाराशिव – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत मेळावा आयोजित केला असून त्यानिमित्ताने उमेदवार जाहीर करावा अशी सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. महायुतीतील प्रहार आणि रयतक्रांती या संघटना सोडून सर्वांनी आपला भावी खासदार जाहीर केला आहे.
जागा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सुटणार!
लोकसभा निवडणुकीचा पूर्वानुभव पहाता धाराशिव लोकसभेची जागा लढण्याचा अनुभव राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहे. नैसर्गिक स्थितीनुसार या दोन पक्षांना जागा सोडावी लागेल न सुटल्यास दोन्ही घटक पक्षावर अन्याय होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महाविकास आघाडीने जागा, उमेदवार याबाबत स्पष्टता ठेवली आहे त्याविरोधात तगडा उमेदवार अपेक्षित आहे मात्र काम कोणाचे करायचे हे निश्चित नसल्याने महायुतीतील कार्यकर्ते अंग झाडून कामाला लागले नाहीत. तीन पक्षातील नेत्यांशी सुसंवाद असणारी व्यक्तीच उमेदवार असावी, क्लीन चेहरा असावा, कोणतेही राजकीय आरोप नसावेत अश्याच व्यक्तीच्या गळ्यात उमेदवारी देण्यात येणार असल्याचे राजकीय निष्णात सांगतात.
आजचा मेळावा निर्णायक
राजकीय दृष्ट्या आज धाराशिव शहरात स्वस्तिक मंगल कार्यालय येथे होणारा महायुतीचा मेळावा निर्णायक असणार आहे. अप्रत्यक्षरीत्या एकमेकांवर टीका केलेले अनेकजण आज मांडीला मांडी लावून कार्यकर्त्यांच्या समोर बसणार आहेत.