उस्मानाबाद – घटनेने बालकांना हक्क दिले आहेत पण त्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सर्व समाजाने एक होऊन काम करायचे आहे. प्रत्येकाने आपापला खारीचा वाटा उचलला तरी आपण समाजात मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करू शकतो, व त्यांचे बालपण अबाधित राहू शकतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. वसुधा दिग्गज दापके- देशमुख यांनी केले.
चाईल्ड- लाईन व सह्याद्री फाऊंडेशन्स उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चाईल्ड- लाईन से दोस्ती’ या उपक्रमाअंतर्गत सांजा ता.जि. उस्मानाबाद येथील जि. प. आंतरराष्ट्रीय माध्यमिक शाळेमध्ये ‘नकोसा स्पर्श’ (चांगला व वाईट स्पर्श) याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच संजय (नाना) सूर्यवंशी हे होते. अध्यक्षीय भाषणात बोलताना शिक्षकांनी बालकांची मानसिक स्थिती ओळखून त्यांच्याशी संवाद साधण्याचे आवाहन केले. बाल संरक्षण अधिकारी श्रीमती वैशाली पाटील, विधी व पर्यवेक्षक अधिकारी अँड. जयश्री भाले यांनी यावेळी बालकांच्या सुरक्षेविषयी विचार व्यक्त केले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भालचंद्र मोहिते, वनकळस टी.एन. श्रीमती सलगर, घायाळ, यंदे,चाईल्ड- लाईन चे समन्वयक ज्ञानेश्वर गिरी, टीम मेंबर विकास चव्हाण, राजेंद्र कापसे, सह्याद्री फाऊंडेशन्सचे गजानन पाटील, यांच्यासह पालक, तसेच गावातील महिला उपस्थित होत्या.
सूत्रसंचालन विद्यार्थ्यीनी कु. विद्या डोलारे यांनी तर प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरवसे आर. जी. व आभार श्रीमती दारफळकर एस.एस. यांनी मानले.