back to top
Monday, November 4, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याराज्यात सगळीकडं सारखंच नुकसान आहे, तुमच्यात काय बघायचं आहे -विरोधी पक्षनेते प्रवीण...

राज्यात सगळीकडं सारखंच नुकसान आहे, तुमच्यात काय बघायचं आहे -विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचे वक्तव्य

  कवठेएकंद येथे  भाजप पंचायत समिती सदस्य संतोष आठवले व कार्यकर्त्याकडून नाराजी व्यक्त करीत विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा निषेध

तासगाव प्रतिनिधी दि.२१

     ‘अतिवृष्टीमुळे राज्यासह  सर्व तालुक्यात सगळीकडे सारखंच नुकसान झाले आहे. तुमच्या गावात काय वेगळं असणार. तुमच्यातील नुकसान हे सगळीकडेच आहे.तसेच असणार. त्यामुळे काय पहायचे आहे’. भाजपचे विधानपरिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या या वक्तव्यावरून तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील शेतकरी चांगलेच संतापले. तर दरेकरांना एवढी मग्रुरी कशाला पाहिजे, असा सवाल व्यक्त करीत भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांचा निषेध करीत घरचा आहेर दिला.   गेल्या आठवड्यात राज्यभरात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान, दरेकर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर कवठेएकंद येथे भेट देणार होते. कवठेएकंद येथील शेतकऱ्यांची भेट व पाहणीचे नियोजन दुपारी साडेबारा वाजता नियोजित होते. त्यामुळे गावातील भाजपचे पंचायत समितीचे सदस्य संतोष आठवले यांच्यासह सर्व भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दरेकरांना नुकसान झालेले क्षेत्र दाखवण्याचे नियोजन केले होते. शिवाय गावातील अतीनुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीचे किट देण्याचे नियोजनही भाजपच्या कार्यकर्त्यांनी केले होते. हे किट दरेकरांच्या हस्ते देण्यात येणार होते. मात्र दरेकर यांना कवठेएकंद येथे नुकसान ग्रस्त शेतकरी व नागरिकांचे घरांचे नुकसान पाहणी दौरा आयोजित केला होता. परंतु येण्यास साडेचार वाजले तरीही दरेकर आले नसल्याने. शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते दरेकर यांची वाट पाहून कंटाळले होते. मात्र कवठेएकंदमार्गे सांगलीला जाताना दरेकर कवठेएकंद येथे थांबले नाहीत. केवळ गाडी थांबवली. गाडीची काच खाली घेतली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी दरेकर यांना नुकसानीची पाहणी करा. शिवाय नुकसानग्रस्तांना मदतीचे किट तुमच्या हस्ते द्या, अशी मागणी केली.

मात्र, दरेकर यांनी गाडीतून खाली न उतरताच केवळ आपल्या आलिशान गाडीची काच खाली करून ‘सगळीकडे सारखेच नुकसान झाले आहे. तुमच्यात काय वेगळं असणार. त्यामुळे इथे काय पहायचे’, असे वक्तव्य केले आणि शेतकऱ्यांची कोणतीही विचारपूस न करता गाडीच्या काचा वर करीत एसीची हवा खात ते निघून गेले.   दरेकरांच्या या वक्तव्यावर कवठेएकंद येथील शेतकरी व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन सडकून टीका केली आहे. संतप्त शेतकरी व कार्यकत्यांनी दरेकरांचा निषेध केला आहे. दरेकर यांना भाजपच्याच कार्यकर्त्यांकडून दिल्या गेल्या या घरच्या आहेराबाबत चर्चा आहे. यावेळी दीपक घोरपडे, दीपक जाधव, जयवंत माळी, बाळासो शिरोटे, बाळासो पवार, राहुल शिरोटे, गुंडाभाऊ मेणगुदले, आनंदराव काळे, संजय शिरतोडे, महादेव काळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

दरेकरांना एवढी मग्रुरी कशाला पाहिजे : संतोष आठवले पं.स. सदस्य

  कवठेएकंद परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर भयाण संकट कोसळले आहे. शेतकऱ्यांना मदतीची व आधाराची गरज आहे. मात्र भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी कवठेएकंद येथे गाडीतून उतरण्याचीही तसदी घेतली नाही. ते भुर्रकन निघून गेले. कवठेएकंद येथील भाजपच्यावतीने नुकसानग्रस्तांना मदतीचे किट दरेकर यांच्याहस्ते देण्यात येणार होते. मात्र त्यासाठीही त्यांनी वेळ दिला नाही. ते जरी आमच्या पक्षाचे असले तरी त्यांना एवढी मग्रुरी कशाची आली आहे, असा संतप्त सवाल भाजपचे पंचायत समितीचे सदस्य संतोष आठवले यांनी केला आहे. दरेकरांच्या या वागणुकीचा त्यांनी निषेध केला आहे.

अवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील सत्तर ते ऐंशी टक्के शेत जमिनीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे बरेच गावांमध्ये ओढ्याचे पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्यामुळे घराचे नुकसान झाले आहे. कवठे एकंद येथील हद्दीतील शेतीच्या व घराच्या नुकसान झाले आहे.त्या पार्श्वभूमीवर महा विकास आघाडीचे कृषी राज्यमंत्री ना डॉक्टर विश्वजित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांच्या समवेत कवठे एकंद येथे दौरा केला होता नुकसान झालेल्या द्राक्ष शेतीचे व बौद्ध  समाजातील घरांचे झालेले नुकसानीची पाहणी केली होती. तासगाव कवठेमहांकाळ च्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांनीही राष्ट्रवादी कार्यकर्ते समवेत कवठे एकंद गावाचा दौरा करून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. परंतु विरोधी पक्ष भाजपाकडून विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनाही  कवठे एकंद येथे आणण्याचा भाजप कार्यकर्त्यांचा प्रयत्न होता परंतु ते आले परंतु नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक यांची भेट न घेता उर्मट भाषा वापरून निघून गेले यामुळे कवठे एकंद गावच्या भाजपचे कार्यकर्ते व पंचायत समिती सदस्य संतोष आठवले यांच्या जिव्हारी ही गोष्ट लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये, लवकरच कवठे एकंद गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते हे येन केन प्रकारे शेतकरी व  लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्नशील आहेत असे दिसत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments