उस्मानाबाद – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. अतिवृषटी झालेल्या भागांची ते पाहणी करणार आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पत्रकारांना वाळीत टाकण्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. जिल्हा माहिती कार्यालयाकडून पोलीस प्रशासनाला ४३ पत्रकारांची यादी पाठवण्यात आली. मात्र त्यातील केवळ मोजक्याच पत्रकारांना पासेस देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.आज सकाळी पत्रकार पास घेण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयात गेले असतात तेथील कर्मचारी पवार यांनी छोट्या पत्रकारांना पास दिले नाहीत. या संतापजनक प्रकारानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांना संपर्क केला असता त्यांनी पोलीस निरीक्षक बाबर यांना संपर्क करण्यास सांगितले. बाबर यांना संपर्क साधला असता आम्ही जिल्हा माहिती कार्यालयाकडून आलेल्या यादीनुसार पास दिले असल्याचे सांगितले. माहिती कार्यालय सांगते यादी पाठवली, श्री बाबर म्हणतात पास दिले मग नावांची छाटणी कोणी केली? तो करण्यामागे त्यांचा काय उद्देश होता? पत्रकारांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात सहभागी का करून घेतले नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पत्रकारांना पास देताना नेमका कोणता निकष लावण्यात आला? मोजक्याच लोकांना पास द्यायचे होते तर सर्वांकडून फोटो का मागवण्यात आले? याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे. पत्रकारांसोबत असा भेदभाव केव्हाच झाला नव्हता. मुख्यमंत्री स्वतः एका वर्तमानपत्राचे संपादक राहिले आहेत. त्यांच्याच दौऱ्यात पत्रकारांना दूजाभाव मिळत असेल तर इतरांकडून काय अपेक्षा करणार.
दूजाभाव करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांचा शोध घेऊन उचित कारवाई करण्यात यावी. वृत्तपत्र लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. ती एक मोठी व्यापक चळवळ आहे. त्यांच्या हक्काना नख लावण्याचा प्रकार लाजिरवाणा आहे.
बिभीषण लोकरे
संपादक दैनिक मराठवाडा केसरी