स्फोटाने तासगाव पूर्व भाग हादरला,मृत व जखमींचा आकडा वाढण्याची भीती.!!
वायफळे/प्रतिनिधी
सावळज ता.तासगाव येथील सावळज व बस्तवडे गांवच्या हद्दीच्या सिमेवर असणाऱ्या पटवर्धन खोरा या डोंगर पठारावर जमीन सपाटीकरण कामासाठी जिलेटीन कांडी उडविण्यासाठी आणलेल्या दोन ट्रक मधील काँम्प्रेसर पेट घेतल्याने एकाचा मृत्यू तर तिनजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.यामध्ये प्रतिक हणमंत स्वामी, रा.नागज ( वय वर्षे 22 ) हे मयत झाले असुन जखमी उपेंद्र यादव रा.उत्तर प्रदेश व अन्य दोन असे एकुण तीन जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी प्रत्यक्षदर्शींच्यानुसार अनेकजणांचा ( पाच ते सहा ) म्रुत्यु व गंभीर असल्याची शक्यता व्यक्त होत होती.तासगाव नगरपरिषदच्या अग्निशमन विभागाकडुन आग विझवण्याचे काम सुरू होते.या स्फोटाची तीव्रता इतकी भयानक होती की जवळपास 15 ते 20 किमीचा परिसर हादरून गेल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण होते.
प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,सावळज व बस्तवडे हद्दीच्या सिमेवर सावळजच्या पश्चिम बाजुस पटवर्धन खोरा याठिकाणी श्री. संभाजी चव्हाण,रा. सिध्देवाडी यांनी सुमारे १७७ एकर डोंगरपठार जमीन काही महीन्यापुर्वी खरेदी केली आहे. त्या डोंगरावर जमीन सपाटीकरण करण्याचे काम चालू आहे.या ठिकाणी डोंगर फोडण्यासाठी दोन ट्रक मधुन काँम्प्रेसर द्वारे होल मारून जिलेटीन कांड्या त्यात घालून स्फोट करीत होते.यातील एका ट्रकचा काँम्प्रेसर व रेडिएटर गरम होऊन डिझेल टाकीने पेट घेतला तसेच लागुनच असलेल्या शेजारील ट्रकचा पेट घेतला.यातील जिलेटीन स्फोटके पेट घेतल्याने मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की यामुळे तासगाव पुर्व भाग हादरला.या स्फोटापासुन शंभर मिटर परिसरात मानवी शरीराचे भाग हात,पाय,वगैरे छिन्नविच्छिन्न पडले होते.जखमींना सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.घटनास्थळी शेकडो बघ्यांची गर्दी झाली होती.मयत व जखमीचे नातेवाईकांचा आक्रोश सुन्न करणारा होता.सावळज परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
याठिकाणी तहसीलदार श्रीमती कल्पना ढवळे,पोलीस उप अधिक्षक आश्विनी शेंडगे,पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली. यावेळी मंडल अधिकारी वसंत पाटील,गावकामगार तलाठी पोपट ओमासे, एन आर पाटील ,पोलीस पाटील दत्तात्रय पाटील उपस्थित होते. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त होता.
*चौकट*
सावळजमधील या डोंगरपठारावर सहा महिन्यापासून जमीन सपाटीकरण चालू आहे. त्यासाठी भुसुरूंगस्फोट करण्यात येत होते. त्यामुळे परिसरातील सावळज,बस्तवडे, बिरणवाडी या गावातील अनेक घरांना तडे गेले आहेत, शेतजमिनीत घेण्यात आलेल्या कुपनलिकेचे पाणी गेले आहे. यासंबंधातील तक्रार तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्या कडे अनेक वेळा ग्रामस्थांनी केली होती. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. ही जमीन नेमकी कुणाची व ती कुणाच्या नावे आहे व या ठिकाणी सपाटीकरण करून घेण्यापाठीमागील नेमके कारण काय??याची कुजबुज उपस्थित ग्रामस्थांमधून होती.सुरुंग स्फोटाद्वारे करण्यात येणारे हे सपाटीकरण इतकी गंभीर बाब प्रशासनच्या का लक्षात येऊ नये?वेळीच प्रशासनाने यात लक्ष घातले असते तर ही दुर्घटना घडली नसती.या घटनेस प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे.
जमीन मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – ग्रामस्थांची मागणी
डोंगरपठारावर मोठ्या संख्येने भुसुरूंगस्फोट करण्यासाठी आवश्यक परवानगी घेतली आहे का ? यासाठी सेफ्टि किट वापरण्यात आले होते का ? या ठिकाणी इतके दिवस बिनबोभाट होत असलेल्या नियमबाह्य कामकाजावर वरदहस्त कुणाचा? याची चर्चा ग्रामस्थांतुन कुजबुज सुरू होती.