उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने कोणालाही विचारात न घेता जे तीन कृषी कायदे लागू केले आहेत. त्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा जन आंदोलन संघर्ष समितीच्यावतीने दि. ८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. मात्र या बंद दरम्यान दूध, भाजीपाला व मेडिकल या सुविधांना वगळण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटना तसेच विविध पक्ष संघटना व शेतकरी संघटनांनी दिल्ली येथील शेतकर्यांच्या आंदोलनाला व्यापक पाठबळ देण्यासाठी आंदोलन हाती घेतले आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन नवीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाना, राजस्थान व महाराष्ट्र आदी राज्यातील शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने दिल्ली येथे एकवटले असून सुरुवातीला केंद्रसरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. कडाक्याच्या थंडीत देखील त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे, अश्रू धुराच्यानळकांड्या फोडीत लाठीहल्ला करीत अमानुषपणे शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरीही निराधाराच्या जोरावर शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून मुळातच देशभरातील शेतकऱ्यांच्या मताचा विचार न करता, त्यांना विश्वासात न घेता व न जुमानता ही विधेयके मंजूर केलेली आहेत. या कायद्यामुळे करार शेतीच्या माध्यमातून बडे भांडवलदार शेती व्यवस्थेत उतरतील व जमिनीच्या तुकड्यावर आपली गुजराण करणाऱ्या शेतकऱ्यांना हद्दपार करतील, अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे. त्याबरोबरच भारतीय अन्न महामंडळ देखील निष्क्रिय केले जाईल व अन्नसुरक्षा कायदा, रेशन व्यवस्था मोडीत काढली जाईल ही रास्त भीती देखील त्यांच्या मनामध्ये आहे. गेल्या दोन-अडीच महिन्यापासून शेतकऱ्यांची सन्मान जनक संवाद करण्याचे दायित्व देखील हे सरकार पार पाडत नाही. त्यामुळे सरकारने तातडीने या शेतकऱ्यांची संवाद साधावा व शेतकरी विरोधी संमत केलेले तीन्ही कायदे तात्काळ मागे घ्याव्यात यासाठी दि. ८ डिसेंबर रोजी भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून त्यास पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय व संघटनांच्यावतीने दि.८ डिसेंबर रोजी बंद पाळण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतकरी व नागरिकांनी या आंदोलनात उतरून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी दि.७ डिसेंबर रोजी छत्रपती हायस्कूल येथे सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली असून या बैठकीस प्रा. अर्जुन जाधव (स्वराज इंडिया), सतीशकुमार सोमाणी (शिवसेना) भाई धनंजय पाटील, संभाजी गायकवाड (शेकाप), नितीन बागल (राष्ट्रवादी काँग्रेस), राजाभाऊ शेरखाने, ॲड. जावेद काझी, मेहराज शेख(काँग्रेस आय), कॉम्रेड पंकज चव्हाण(भाकप), कृष्णा जगताप, अमोल घोगरे, बाळासाहेब बरकसे, शिवदास पवार, हनुमान हुंबे, आर.जे. बोबडे, आशिष पाटील, ॲड. तानाजी चौधरी, दिनेश चौगुले (संभाजी ब्रिगेड) व अरुण निटूरे (राष्ट्रीय बहुजन किसान पार्टी) आदीसह विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.