सुरेश पाटील यांच्यावर पक्ष कारवाई करणार का?
धाराशिव:- हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस अजित पवार गट सुरेश पाटील यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्याने कसबे तडवळे गाव कडकडीत बंद करण्यात आले.
राष्ट्रवादीतील एक गट फुटून सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी धाराशिव येथे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी. धाराशिव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आंदोलन करून कार्यकर्त्यांना शरद पवार साहेब यांच्या सोबत राहण्यासाठी सद्बुद्धी देवो असे शिवरायांकडे साकडे घातले होते. याला उत्तर देताना प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांनी शिवरायांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने. शिवप्रेमींमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. याचा निषेध करण्यासाठी आज दि. १६ जुलै रोजी सकाळी १० वाजता गावातील शिवप्रेमींनी गाव बंद आंदोलन केले होते. यावेळी शिवप्रेमीचे आंदोलन हाणुन पाडण्यासाठी सुरेश पाटील यांनी देखील गावामध्ये रॅली काढली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन्ही गट समोरासमोर आल्याने काही तणावाचे वातावरण तयार झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले असले तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तत्पूर्वी काही नागरिकांनी सर्वांसमोर माफी मागण्यास सांगितली मात्र मी कालच दिलगिरी व्यक्त केली आहे आज माफी मागणार नाही अशी भूमिका सुरेश पाटील यांनी घेतली होती.
पक्षातून हकालपट्टीची मागणी
सुरेश पाटील यांच्या वक्तव्याचा विरोध सगळीकडेच होत असून त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी त्यांच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. काहींनी वरिष्ठांच्या कानावर ही बाब घातली असून पक्ष काय कारवाई करतो याकडे लक्ष लागले आहे.