उस्मानाबाद दि. (प्रतिनिधी) – रमाई आवास योजनेचा लाभ शासनाच्या नियमाप्रमाणे संबंधित लाभार्थ्यांना न देता वशिलेबाजीने आवासाचे वाटप करण्यात येत आहेत. त्यामुळे गरजवंत लोकांना वंचित रहावे लागत असल्यामुळे ते नियमाने वाटप करावे, या मागणीसाठी फकीरा ब्रिगेडच्यावतीने दि.३१ ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उमरगा तालुक्यातील काळ निंबाळा येथे वशिलेबाजीने रमाई आवास योजनेच्या घरकुलाचे वाटप करण्यात येत आहे. ते वाटप तात्काळ थांबवून शासनाच्या परीपत्रकाप्रमाणे (जी.आर.) व गरजू लोकांना वाटप करण्यात यावे. तसेच श्रीरंग केरनाथ सरवदे यांच्यासह १० लोकांना तात्काळ घरकुल वाटप करण्यात यावे. तसेच जिल्ह्यातील विधवा, परितक्ता, अपंग व ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही त्या लोकांना तात्काळ घरकुल मंजूर करून त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर उपलब्ध करून देण्यात यावे. अर्धवट बांधकाम राहिलेले घरकुल पूर्ण करण्यासाठी येत असलेले एक हप्ते तात्काळ देण्यात यावेत, गट विकास अधिकारी यांच्या पत्राचे उल्लंघन करणारे ग्रामसेवक व सरपंच या दोघांवर दिरंगाईचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणामध्ये मराठवाडा अध्यक्ष श्रीरंग सरवदे, मराठवाडा संघटक संजय सरवदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पार्वती झुंजारे, जिल्हा उपाध्यक्ष नागीनी थोरात, भारताबाई लोंढे यांच्यासह इतरांचा समावेश आहे.