उस्मानाबाद – नगराध्यक्ष, आमदार, खासदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनसुद्धा विकास कामे होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो मात्र हे सगळे शिवसेनेचेच असल्याने उस्मानाबाद नगरपालिकेला २०८ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून भविष्यात आणखी निधी आणून शहराचा कायापालट करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उस्मानाबाद नगर पालिकेच्या इतिहासात सहा महिन्याच्या आत २०८ कोटी निधी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यात प्रामुख्याने १६८ कोटी हे भुयारी गटार योजनेसाठी असून, उर्वरित निधी रस्त्यांच्या कामासाठी आहे . भुयारी गटार योजना पूर्ण झाल्यानंतर साथीचे आजार ८० टक्क्याने कमी होतात. या पत्रकार परिषदेस नगरसेवक सोमनाथ गुरव, प्रदीप घोणे यांची उपस्थिती होती.
भुयारी गटार योजनेसाठी अशी मिळाली मान्यता
प्रती माणसी १३० लिटर पाणी मिळत नाही तोपर्यंत ही योजना शहरासाठी मिळत नाही नगर पालिकेने सर्वात आधी त्याची पूर्तता केली. १३ डिसेंबर २०१७ रोजी नगरपालिकेत ठराव घेऊन प्रस्ताव सादर केला गेला. २९ जून २०१९ ला परिपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे पाठवून तांत्रिक मान्यता मिळाली, २७ ऑगस्ट २०२० ला नगरपालिका संचालनालयाच्या संचालकांकडे प्रस्ताव गेला, त्यानात २५ नोव्हेंबर २०२० स्टेट लेव्हल कमिटी कडे प्रस्ताव गेला ०३ फेब्रुवारी २०२१ मध्ये नगरविकास मंत्र्यांची मान्यता मिळून ११ मे २०२१ मध्ये प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय निघाला.
दोन टप्प्यात होणार योजना
भुयारी गटार योजनेचे काम दोन टप्प्यात होणार असून नॅशनल हायवेच्या पश्चिम बाजूस कृष्णा खोऱ्यात असणाऱ्या भागाचे पहिल्या टप्प्यात काम होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात गोदावरी खोऱ्यातील भागाचे काम होणार आहे.
३०० किमी लांबीची गटार
शहरात या गटारीची लांबी ३०० किलोमिटर आहे. तर प्रत्येक ३३ मीटर वर एक चेंबर असून नागरिकांना सेप्टिक टँक बांधायची गरज नसून भविष्यातील २० वर्षाचा विचार करून याचे डिझाईन बनविण्यात आले आहे.
शहराच्या विकासासाठी भरीव निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालक मंत्री शंकरराव गडाख, आ.तानाजी सावंत,खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील ,आमदार ज्ञानराज चौगुले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सर्व अधिकारी यांचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी आभार मानले आहेत