उस्मानाबाद – जिल्ह्यात लस न घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यवाहीचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना पत्र लिहून लस न घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी देखील लस घेतली आहे का नाही याची माहिती मागवली आहे. तसेच ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही त्यांचे वेतन का रोखू नये असा खुलासा देखील घेतला जाणार आहे.
दिनांक १६ जानेवारी २०२१ पासून कोविड १९ लसीकरण मोहिम राबविली जात आहे. तथापी अद्यापही जिल्हयातील पहिली मात्रा न मिळालेल्या लोकांची टक्केवारी ३७% इतकी आहे ही अत्यंत गंभीर बाब आहे. आज रोजी जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थांमध्ये कोव्हीड- १९ प्रतिबंधात्मक लसीकरण सत्रांच्या माध्यमातुन सर्व १८ वर्षे वयावरील नागरीकांसाठी मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध असूनही काही शासकिय अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांनी अद्याप लस घेतली नसल्याचे आढळून येते ही बाब अत्यंत खेदजनक आहे. सर्व कर्मचारी, त्यांचे कुटूंबिय व जवळचे नातेवाईक यांनी लस घेतली किंवा नाही याचे लेखी प्रमाणपत्र घ्यावे. तसेच लस घेतली नसल्यास वेतन का रोखू नये या बाबतचा खुलासा संबंधिताकडून घ्यावा. या सुचनेप्रमाणे कार्यवाही अनुसरण्यात यावी आणि आपल्या अधिनस्त सर्व शासकिय अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यांचे तात्काळ लसीकरण पुर्ण करून घ्यावे. आपल्या अधिनस्त शासकिय अधिकारी / कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय यापैकी लसीकरणापासून कोणीही वंचित राहिल्याचे आढळल्यास यासाठी आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येऊन योग्य ती प्रशासकीय कार्यवाही अनुसरण्यात येईल असे पत्रात म्हटले आहे.