उस्मानाबाद – गेले दोन दिवस ३५ आमदारांची विधिमंडळ अंदाज समिती उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आहे. जिल्हा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये या समितीची बैठक पार पडली. मात्र जिथे बैठक झाली केवळ तिथेच स्वच्छता करण्यात आल्याचे चित्र आहे.
समितीतील सदस्यांना वातावरण आल्हादायक वाटावे यासाठी प्रशासनातील अधिकारी धावपळ करत आहेत. मात्र ज्या जनतेसाठी सर्व धावपळ सुरू असते ती कायम नाक दाबून या इमारतीमध्ये फिरते हे कोण दाखवून देणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सतत अस्वच्छ असते. इमारतीमधील दुर्गंधी प्रवेश करताच जाणवते मात्र याकडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. या स्वच्छतेचे लेखापरीक्षण कोण करणार? कैक समित्या येतील जातील, प्रशासनाची अंतर्गत चौकशी करतील मात्र इमारतीचे रुपडे बदलेल की नाही अशी शंका जनतेला आहे.