Home Blog Page 51

अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्यांवर आता फौजदारी कार्यवाहीचा धाराशिव नगरपालिकेचा इशारा

धाराशिव – शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनवर नगरपालिकेची नजर राहणार असून त्यांच्यावर फौजजादरी कार्यवाही करण्यात येणार आहे.

तसेच ज्या नागरिकांकडे अनाधिकृत नळ कनेक्शन आहेत अश्या नागरिकांनी दि. २२ जानेवारी पर्यंत नळ कनेक्शन शुल्क व दंडात्मक रक्कम घरगुती नळ कनेक्शनसाठी रक्कम रु. ४,०००/- व व्यावसायिक नळ कनेक्शन साठी रक्कम रु.१०,०००/- भरणा करून सदरील नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे. मुदत संपल्यानंतर शहरातील ज्या नागरिकाकडे अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याचे निदर्शनास येईल अश्या नागरिकाचे नळ कनेक्शन बंद करून संबंधितावर फौजदारी कार्यवाही करण्यात येईल असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

मराठा समाज बांधवांसाठी जनसुविधा पुरवाव्यात : सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील

मुंबई – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव हे आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईकडे येत असून, त्यांच्यासाठी जनसुविधा, अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सकल मराठा समाज आपल्या आरक्षण व अन्य विविध मागण्यांसाठी २० जानेवारीपासून मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथे मोठ्या संख्येने, आमरण उपोषणासाठी येत आहे. आपणास आग्रहाची विनंती की, मराठा समाजासाठी आमरण उपोषणाचे ठिकाण व मराठा मार्ग येथे वैद्यकीय सेवा, अग्निशमन तथा रुग्णवाहिका व तत्सम अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विविध स्तरातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव, भगिनी, युवा, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, लहान थोर यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा यामध्ये शौचालय, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका,प्रथमोपचार, औषधोपचार, औषधी, फिरते दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस संरक्षण तसेच अन्न व पाणी, निवाऱ्याची, जसे की मंडप, ऊन, वारा व पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच मराठा समाज बांधवांचे संरक्षण, मराठा मार्गावरील व मुंबईमधील उपोषणस्थळी वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक यंत्रणेमार्फत येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करावा व जनसुविधा, अत्यावश्यक सेवा,अन्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

भाजप मध्ये बरेच मोठे प्रवेश होतील – आ. राणाजगजितसिंह पाटील

लोकसभेपूर्वी फुल्ल इन्कमींग

धाराशिव – जिल्ह्यात येत्या काही काळात बरेच जण भाजपचे कमळ हाती घेतील या चर्चेला आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दुजोरा दिला आहे. मात्र नेमके प्रवेश कोणाचे होणार आहेत, केव्हा होणार आहेत हे सांगायला मात्र त्यांनी नकार दिला. काँग्रेसचे नेते बसवराज पाटील यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेवर देखील त्यांनी बोलण्यास नकार दिला.
शहरात आज महायुतीतील घटकपक्ष असलेल्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट), प्रहार, रयतक्रांती यांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून महायुतीचा मेळावा १४ जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आ. ज्ञानराज चौगुले, सुरेश बिराजदार, दत्ता साळुंके, राजाभाऊ ओव्हाळ, सुरज साळुंके, मयूर काकडे, सुरज अबाचने आदी उपस्थित होते.

समन्वय समिती चे काम

महायुतीतील घटक पक्षात समन्वय साधण्याचे काम ही समिती करणार असून प्रत्येक आठवड्याला समितीतील सदस्यांची बैठक होणार आहे. शासकीय समित्यांवर कोणाची नेमणूक करायची याबाबत देखील चर्चा याच समितीत होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीचे बँक खाते गोठवताच शेतकऱ्यांना विमा कंपनी प्रलंबित रक्कम देण्यास तयार

धाराशिव दि.9 (प्रतिनिधी ) प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2022 मध्ये सोयाबीन पिकाच्या 97 टक्के पुर्वसुचना ह्या क्रॉप कॅलेंडरनुसार 15 ऑक्टोबरपूर्वी प्राप्त झालेल्या असल्याने मार्गदर्शक सूचनेतील मुद्दा क्रं.21.5.10 लागू होत नाही.विमा कंपनीने 50:50 भारांकन न लावता पंचनाम्यातील नमूद नुकसानीचे क्षेत्र व नुकसानीच्या टक्केवारीनुसार नुकसान भरपाई वितरीत करावी.असे आदेश विमा कंपनीस जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती,विभागस्तरीय तक्रार निवारण समिती,राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती व राज्यस्तरीय समितीचे आदेशानुसार विमा कंपनीस दिलेले होते.परंतु विमा कंपनीने वरील समितीच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नसल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व शेतकरी यांनी पाठपुरावा केल्याने भारतीय कृषि विमा कंपनीच्या विरोधात जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नूसार वसुलीची कार्यवाही प्रस्तावित करुन विमा कंपनीचे बँक खाते गोठविलेले असता विमा कंपनीचे अधिकारी रविश लोहीया,व्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी,दिलीप डांगे
उपव्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी व मच्छिंद्र सावंत क्षेत्रिय व्यवस्थापक,भारतीय कृषि विमा कंपनी लि.मुंबई यांनी 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी यांची समक्ष भेट घेवून वसुलीची प्रस्तावित करण्यात आलेली रक्कम शेतकऱ्यांना वितरीत करण्यास विमा कंपनी तयार असल्याबाबतचे लेखी पत्र देवून प्रस्तावित करण्यात आलेली कार्यवाही परत घेणेबाबत विनंती केली.

त्याअनुषंगाने 8 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली विमा कंपनीच्या अधिकाऱ्यासमवेत जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.प्रस्तावित करण्यात आलेल्या वसुलीच्या रक्कमेपैकी 294 कोटी 8 लक्ष रुपयांपैकी 12 कोटी रुपये हे हंगामातील प्रतिकुल परिस्थिती(Mid Season Adversity) अंतर्गत वितरीत करण्यात आलेले आहे.विमा हप्त्याची रक्कम 50 कोटी रुपये अद्याप विमा कंपनीस प्राप्त नसल्याने उर्वरीत 232 कोटी रुपये द 25 जानेवारी 2024 पुर्वी वितरीत करण्याबाबत विमा कंपनीस आदेश दिले आहे.या आदेशाद्वारे रक्कम वितरित करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शविलेली आहे.तसेच उर्वरीत रक्कम 50 कोटी रुपये विमा कंपनीस प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनी वितरीत करील असे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समितीला अवगत केले.

विमा कंपनीने वरीलप्रमाणे विहीत मुदतीत कार्यवाही पुर्ण न केल्यास विमा कंपनीच्या विरोधात परत महसुली वसुली प्रमाणपत्र (आर.आर.सी.) ची कार्यवाही प्रस्तावित करण्याचे अधिन राहून विमा कंपनीच्या विरोधात प्रस्तावित करण्यात आलेली कारवाईस स्थगिती दिलेली असुन 28 जानेवारीपर्यंत 232 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी विमा कंपनीस दिलेल्या आहेत.यामध्ये उर्वरीत 50 कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याने त्यासाठी काही अधिसुचित मंडळाचा विमा उशिरा जमा होईल यांची सर्वांनी नोंद घ्यावी. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,धाराशिव यांनी कळविले आहे.

उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं – वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्यांचा माजी मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंबई – लोकसभा निवडणुका जस जश्या जवळ येत आहेत तस तसे राज्यातील राजकारण तापत चालले आहे. आघाडी, जागावाटप याच्या चर्चा प्राथमिक स्तरावर आहेत. पंतप्रधान मोदी आणि भाजप यांना थेट आव्हान देणाऱ्यांपैकी वंचित बहुजन आघाडी सर्वात आघाडीवर आहे. मात्र या पक्षाला इंडिया आघाडीत घेण्यासंदर्भात सध्या उलटसुलट चर्चा सुरू असतात त्याला विशेषतः काँग्रेसच्या नेत्यांना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी उत्तर दिले आहे ते म्हणतात की,
काँग्रेस मधील 23 बंडखोर नेत्यांपैकी एक असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी भडक वक्तव्य करू नयेत आणि इंडिया आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी भेटून चर्चा करावी. त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आतापर्यंत आम्ही 3 वेळा पत्र लिहिलेले आहेत. अनेकदा माध्यमांमधून, समाज माध्यमांमधून आणि सभांमधून आम्हाला इंडिया आघाडी मध्ये सहभागी व्हायचंय याची जाहीर वाच्यता केलेली आहे, सगळ्या जगाला हे माहिती आहे. मात्र तरीही अद्याप आम्हाला तुमच्या पक्षाकडून किंवा इंडिया अलायन्स कडून कुठलंही अधिकृत निमंत्रण न आल्यामुळे आम्ही त्याचा भाग होऊ शकलो नाही.

राहिला दुसरा मुद्दा, ज्या वेळेला मल्लिकार्जुन खरगे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावा की न घ्यावं या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना बोलावलं होतं, त्यात पृथ्वीराज चव्हाण होते. त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास विरोध केला होता. स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला एक वेगळा सल्ला द्यायचा की वंचितला सोबत घेऊ नका, आणि बाहेर येऊन माध्यमांमध्ये वंचितला वेगळे सल्ले जायचे, सारवासारव करणारी भूमिका मांडायची या भूमिकेचे वागण्याचा नेमकं कारण काय आहे? पृथ्वीराज चव्हाण यांना मी सांगू इच्छितो की याला मराठीत म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा. एकीकडे विरोध करायचा आतून आणि बाहेर येऊन वेगळच काहीतरी सांगायचं त्यामुळे माझी विनंती त्यांना की त्यांनी या अशा पद्धतीच्या उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं आणि सरळ सोयीने काही जर चांगलं जुळून येत असेल तर त्याला सहकार्य करावं. असेही सिद्धार्थ मोकळे
व्हिडिओ मध्ये म्हणाले आहेत.

गंधोरा शालेय समिती अध्यक्ष पदी सत्यवान साखरे तर उपाध्यक्ष पदी इसुब शेख

सलगरा,दि.९(प्रतिक भोसले) – तुळजापूर तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा गंधोरा येथे (दि.६जानेवारी) रोजी शालेय व्यवस्थापन शिक्षण समीतीवर अध्यक्ष- सत्यवान साखरे व उपाध्यक्ष- इसुब शेख यांची बिनविरोध निवड केली आहे. जि.प.प्रा.शाळा गंधोरा शाळेचा व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यामुळे पालकसभा घेऊन नवीन शालेय व्यवस्थापन समिती पुनर्गठित करण्यात आली आहे. पालक सभेमधून चर्चा करून सर्वानुमते शालेय व्यवस्थापन समिती मध्ये घेण्यासाठी पात्र संवर्गनिहाय नावे निवडून घोषित करण्यात आली, ज्या मध्ये एकूण ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली. या मध्ये पालक, शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक प्रतिनिधी व सचिव म्हणून मुख्याध्यापक यांची नावे घोषित करून निवड करण्यात आली आहे.

या मध्ये अध्यक्ष- साखरे सत्यवान काशिनाथ, उपाध्यक्ष- शेख इसुब नबी, सदस्य- सोनटक्के लिंबाजी आगतराव, सदस्य- देडे रंगनाथ दामू, सदस्य- भोसले शंकर सुदाम, सदस्य- श्रीमती एकंडे सुमित्रा मारुती, सदस्य- श्रीमती कानडे पद्मिनी कृष्णाथ, शिक्षणप्रेमी नागरिक- पाटील प्रविण पद्माकर, ग्रा.पं.सदस्य- श्रीमती भोसले चंपाबाई बलभीम, सचिव- मुख्याध्यापक जट्टे विश्वनाथ शिवलिंगप्पा, शिक्षक प्रतिनिधी- येळवे अमित प्रकाशराव आदींची निवड करण्यात आली आहे.

या निवडीच्या कार्यक्रमावेळी पोलिस पाटील गजेंद्र कोनाळे, माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष शामराव (अण्णा) मुसळे, प्रवीण (बाळू) पाटील, तानाजी भोसले, तुळशीराम एकंडे, संभाजी भोसले, लक्ष्मण पाटील, मोजम मुल्ला, जीवन पाटील, फुलचंद भोसले यांच्या सह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टपाल कार्यालयाची फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट 1 फेब्रुवारी 2024 पासून नवीन फ्रँचायझी योजना सुरू करणार

इंडिया पोस्ट ‘क्लिक एन बुक’ सेवा महाराष्ट्रातील 141 टपाल कार्यालयात उपलब्ध

इंडिया पोस्ट अन्वित सेवा मुंबईतील प्रमुख ठिकाणी सुरू होणार

महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे कार्यान्वित

मुंबई – इंडिया पोस्ट हे 89% ग्रामीण भागातील टपाल कार्यालयांसह 1.55 लाखाहून अधिक टपाल कार्यालये असणारे आणि सातत्याने टपाल कार्यालयांची मागणी असणारे जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे. तरीही ग्राहकांकडून विशेषत: नव्याने विकसित होत असलेल्या शहरी समूहांमध्ये आणखी टपाल कार्यालये उघडण्याची मागणी ग्राहकांकडून निरंतर होत आहे. याची पूर्तता करण्यासाठी, पोस्ट ऑफिस फ्रँचायझी आउटलेट्स उभारण्यासाठी इंडिया पोस्ट नवीन फ्रँचायझी योजना 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे.

विक्रयाधिकार केंद्र (फ्रँचायझी आउटलेटद्वारे) काय दिले जाऊ शकते?

अंतर्देशीय स्पीड पोस्टचे बुकिंग नॉन-सीओडी (कागदपत्रे आणि पार्सल), अंतर्देशीय रजिस्टर पत्रे, ई मनी ऑर्डर

टपाल तिकीट आणि लेखनसाहित्याची विक्री

रेव्हेन्यू स्टॅम्पची विक्री, केंद्रीय भर्ती शुल्क स्टॅम्प इ.सह किरकोळ सेवा.

पोस्टल जीवन विमा उत्पादनांसाठी थेट एजंट म्हणून कार्य करणे आणि प्रिमियम संकलनासह संबंधित विक्रीपश्चात  सेवा प्रदान करणे.

फ्रँचायझी कसे बनावे?

फ्रँचायझीसाठी अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. व्यक्ती तसेच संस्था/संघटना/इतर संस्था जसे कोपऱ्यावरील दुकान, पानवाला, किराणावाला, लेखनसाहित्याची दुकाने, छोटे दुकानदार इ.

वय: 18 वर्षांपेक्षा जास्त. उत्पादनांच्या श्रेणीचे व्यवस्थापन आणि विपणन करण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींची निवड करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.

व्यक्ती/संस्था भारतीय डाकसोबत करार करेल.

शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शाळेतून 10वी उत्तीर्ण. स्थानिक भाषा आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असलेली; संगणक साक्षर; स्मार्ट फोन वापराबाबत परिचित; वैध पॅन क्रमांक असलेली व्यक्ती फ्रँचायझी होण्यासाठी अर्ज करू शकते.

अर्जदाराला टपाल कार्यालयात सुरक्षा ठेव म्हणून रुपये 10,000/- जमा करावे लागतील.

फ्रँचायझीसाठी कमिशन:

फ्रँचायझींना प्रत्येक रजिस्टर पत्रासाठी 3.00 रु,  200/- पेक्षा जास्त मूल्याच्या प्रत्येक मनी ऑर्डरसाठी 5.00 रुपये, टपाल तिकीट आणि लेखनसाहित्य विक्रीवर 5% कमिशन मिळेल. बुक केलेल्या स्पीड पोस्ट लेखासाठी कमिशन दर अतिशय आकर्षक आहे आणि फ्रँचायझी त्याने केलेल्या मासिक व्यवसायाच्या 7% ते 25% कमिशन मिळवेल.

निवड निकष:

टपाल विभागीय प्रमुख हे फ्रँचायझीला संलग्न करण्यासाठी सक्षम अधिकारी असतील.

इंडिया पोस्टने ‘क्लिक एन बुक’ सेवा देखील सुरू केली आहे, एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म जो ग्राहकांना स्पीड पोस्ट, रजिस्टर पत्रे आणि पार्सल बुक करण्यास अनुमती देतो. सध्या ही सेवा महाराष्ट्र पोस्टल सर्कलच्या 141 टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना टपाल विभागाच्या https://www.indiapost.gov.in/Help/Pages/ClicknBook_individuals.aspx या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. यासाठी फक्त  50/- रुपये पिकअप शुल्क आकारणी केली जाईल. ही  सुविधा 500/- रुपये  पेक्षा जास्त शुल्क असलेल्या वस्तूंसाठी   पिकअप सेवा मोफत प्रदान केली जाईल. यासाठी डीओपीने अधिकृत केलेल्या ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट करावे लागेल.

जे लोक त्यांच्या वस्तूंच्या बुकिंगसाठी नियमित कामकाजाच्या वेळेत पोस्ट ऑफिसला भेट देऊ शकत नाहीत  अशा ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि काम करणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल .

स्मार्ट आणि डिजिटल पार्सल वितरण प्रणाली (एएनव्हीआयटी सेवा) पार्सल वितरणात एक क्रांती घडवून आणत आहे. ही स्मार्ट आणि विश्वासार्ह वितरण प्रणाली पोस्टल परिसरातून कधीही (24/7) पार्सल/वस्तू गोळा करण्यासाठी आखली गेली आहे. या उच्च-तंत्र असलेल्या सुव्यवस्थित आणि कार्यक्षम वितरण प्रणाली द्वारे लोकांना कोणत्याही खर्चाशिवाय त्यांच्या पार्सलची ओटीपी आधारित डिलिव्हरी प्रदान केली जाईल. ही सेवा सध्या ठाणे शहरातील ठाणे मुख्य पोस्ट ऑफिस, नवी मुंबई शहरातील वाशी सब पोस्ट ऑफिस आणि पुणे  शहरातील इन्फोटेक पार्क सब पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. एएनव्हीआयटी सेवा मुंबई जीपीओ, मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, घाटकोपर पश्चिम आणि मुंबईतील आणखी 5 ठिकाणी सुरु केली जाणार असून ही सेवा नवीन क्षितिजांवर आपले पंख पसरवण्यासाठी सज्ज आहे.

निर्यात उपक्रमांना चालना देण्यासाठी आणि निर्यात संबंधी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तसेच निर्यातदारांना एकाच छताखाली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी टपाल विभागाने महाराष्ट्र राज्य आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख पोस्ट ऑफिसमध्ये डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) सुरू केली आहेत. पार्सल पॅकेजिंग मटेरियल, पोस्टल बिल ऑफ एक्सचेंज (पीबीई),  सीमाशुल्क क्लियरन्स सुविधा, मोठ्या प्रमाणात ग्राहकांसाठी पिकअप सुविधा इत्यादी सुविधा निर्यातदारांना एकाच छताखाली पुरवल्या जात आहेत. आजपर्यंत महाराष्ट्र आणि गोवा राज्यात 69 डाक घर निर्यात केंद्रे (डीएनकेएस) कार्यान्वित झाली आहेत.

नागरिकांसाठी ” राईट टू हेल्थ ” कायदा आणणार -आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत

0

धाराशिव दि.8 (प्रतिनिधी) राज्यातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लवकरच नागरिकांसाठी
” राईट टू हेल्थ ” कायदा आणणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.

आज 8 जानेवारी रोजी शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात 50 खाटांचे सी सी यू ,आय पी एच एल प्रयोगशाळा आणि डी ई आय सी फेझ 2 या कामांचे भुमिपुजन पालकमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रा.डॉ. सावंत बोलत होते.आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे,पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी,विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ.अर्चना भोसले,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सतीश हरिदास, ऍड. मिलिंद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री डॉ.सावंत पुढे म्हणाले,यापूर्वी जागरूक पालक सुदृढ बालक,माता सुरक्षित तर घर सुरक्षित आणि बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान योजना आणि आभार अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी राज्य शासन घेत आहे.सध्या तरुणाई वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनांच्या अधीन होत आहे.त्यामुळे ” आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे ” हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृती करण्याची मोहीम राबविण्याबाबत आरोग्य यंत्रणेला प्रा.डॉ.सावंत यांनी निर्देश दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्य उपसंचालक अर्चना भोसले यांनी, सूत्रसंचालन दौलत निपाणीकर यांनी तर उपस्थितांचे आभार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला यांनी मानले.

याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थीनी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्मशानभूमी, दफनभूमीचे काम असमाधानकारक; संबंधितांना कारणे दाखवा नोटीस

यंत्रणांनी निधी निर्धारित वेळेत खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी

पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत 

जिल्हा नियोजन समिती सभा 

सन  2024-25 च्या 319 कोटी रुपयांच्या (सर्वसाधारण) प्रारूप आराखड्यास मंजुरी

धाराशिव दि 8 (प्रतिनिधी) धाराशिव – जिल्ह्यात स्मशानभूमी, दफनभूमीचे काम कासवगतीने सुरू असून बजेट देऊनही अजून काम असमधानकारक असल्याचे म्हणत पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत संबंधितांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले.

जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासोबतच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विविध यंत्रणांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो.यंत्रणांनी दिलेला निधी निर्धारित वेळेत खर्च करून जिल्ह्याच्या विकासाला गती द्यावी. असे निर्देश पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिले.

          आज 8 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली.यावेळी ते बोलत होते.खासदार ओमप्रकाश  राजेनिंबाळकर,आमदार कैलास घाडगे पाटील,आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी व जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांजल शिंदे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, जिल्ह्यातील धाराशिवसह अन्य नगरपालिकांच्या विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी येत्या 26 जानेवारी रोजी बैठक घेण्यात येईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी आणि वीज ग्राहकांना वीज भारनियमनाचा सामना करण्याची वेळ येणार नाही.यासाठी आवश्यक तेवढा वीजपुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने ट्रांसफार्मर बँक तयार करावी.प्रत्येक मतदारसंघासाठी स्थानिक विकास निधीतून एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. जिल्हा नियोजन समितीमधून वीज वितरण कंपनीला दिलेल्या निधीतून कोणकोणती कामे आतापर्यंत पूर्ण केली आहे,याची माहिती लोकप्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावी,असे ते यावेळी म्हणाले.

 जिल्हा नियोजन समितीच्या राखीव निधीमध्ये आरोग्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी असे सांगुन प्रा. डॉ.सावंत पुढे म्हणाले,जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी दोन लिफ्टची उभारणी करण्यात यावी. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. जिल्हा रुग्णालयात जेनेरिक मेडिकल स्टोअर्स सुरू करण्यात यावे.430 कोटी रुपयांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी इमारत उभी राहणार आहे,त्याचे डिझाईन कोणी तयार केले आणि त्यासाठी कोण सल्लागार नियुक्त केला आहे,याची माहिती महाविद्यालयाच्या अधिष्ठाताने जिल्हा नियोजन समितीला उपलब्ध करून द्यावी.शहरी भागाच्या विकासासाठी नगरपालिकांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येतो.जिल्ह्यातील नगरपालिकांनी विविध कामावर निधी खर्च कमी केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे तातडीने निधी खर्च करावा,असेही प्रा.डॉ.सावंत यावेळी म्हणाले.

पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत म्हणाले, जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता,यंत्रणांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना कराव्यात.ग्रामपंचायतचा ठराव मिळाला त्या तारखेपासून आठ दिवसात विहिरींचे अधिग्रहण करण्यात यावे.मागासवर्गीय वस्तींमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात यावे.आचारसंहितेपुर्वी धाराशिवसह अन्य नगरपालिका क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.धाराशिव शहरातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक,नगरपालिका मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व यासंबंधीत यंत्रणाची बैठक घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. 

शेतकऱ्यांकडून बँक कर्जाच्या  वसुलीला शासनाने स्थगिती दिली असल्याचे सांगून पालकमंत्री प्रा. डॉ.सावंत म्हणाले,शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड होणार नाही याकडे जिल्हा अग्रणी बँक प्रबंधकाने लक्ष द्यावे. शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढता आले पाहिजे.शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची बँकांनी दक्षता घ्यावी,असे ते यावेळी म्हणाले. 

खासदार राजेनिंबाळकर म्हणाले, धाराशिव शहरातील भूमिगट गटारची कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्यात यावी.या कामामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जिल्हा रुग्णालयासाठी एमआरआय मशीन खरेदी करण्यात यावी.त्यामुळे गोरगरीब रुग्णांना सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार कैलास पाटील म्हणाले, धाराशिव नगरपालिका क्षेत्रात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.त्यामुळे पोलीस विभागाने सीसीटीव्ही लावण्याचे काम त्वरित हाती घ्यावे.

आमदार चौगुले यावेळी म्हणाले, पाणीपुरवठा योजनांसाठी निश्चित केलेल्या पाणी स्त्रोतावरूनच पाणीपुरवठा करण्यात यावा.त्यामुळे नागरिकांची नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येणार नाही. 

आमदार राणा पाटील म्हणाले,बँकांनी ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केले आहे ते काढून टाकण्यात यावे. शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता बँकांनी घ्यावी,असे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा वार्षिक योजना  सन 2023- 24 या वर्षाच्या खर्चाचा आढावा या सभेत घेण्यात आला.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता  340 कोटी रुपये अर्थसंकल्पित तरतूद करण्यात आली असून 172 कोटी 12 लक्ष 38 हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, यंत्रणांना 121 कोटी 77 लक्ष 78 हजार रुपये निधी वितरित करण्यात आला आहे.95 कोटी रुपये खर्च करण्यात आले.खर्चाची टक्केवारी 28 टक्के इतकी आहे.

अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 74 कोटी रुपये  निधी अर्थसंकल्पीत आहे.17 कोटी 78 लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता देऊन 15 कोटी 67 लक्ष 74 हजार रुपये निधी वितरित करून तेवढाच निधी 31 डिसेंबर 2023 पर्यंत खर्च झाला आहे.या खर्चाची टक्केवारी 21.19 टक्के इतकी आहे.

आदिवासी उपयोजना क्षेत्र बाहेरील योजनेसाठी 1 कोटी 98 लक्ष 93 हजार रुपये निधी अर्थसंकल्पीत असून 47 लक्ष 34 हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देऊन 37 लक्ष 17 हजार रुपये निधी वितरित करून तेवढाच निधी खर्च झाला आहे.

वरील तीनही योजना मिळून जिल्ह्यासाठी 415 कोटी 98 लक्ष 93 हजार रुपये अर्थसंकल्प तरतूद आहे. 190 कोटी 38 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देऊन 137 कोटी 82 लक्ष 69 हजार निधी वितरीत करण्यात आला.31 डिसेंबर 2023 पर्यंत 111 कोटी रुपये निधी यंत्रणांनी विविध विकास कामावर खर्च केल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी श्री.झाडे यांनी सादरीकरणातून यावेळी दिली.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2024 – 25 करीता शासनाकडून जिल्ह्यासाठी कमाल आर्थिक नियतव्यय मर्यादा 319 कोटी रुपये इतकी देण्यात आली आहे.या आराखड्यास आज मंजुरी देण्यात आली.राज्यस्तरीय बैठकीसाठी 268 कोटी 94 लक्ष रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे.

सभेत जिल्हा नियोजन समितीच्या 16 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त व इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल यावेळी सादर करण्यात आला.सभेला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

‘गोकुळ’ उभारणार वीज बचतीसाठी सौर ऊर्जा प्रकल्प – चेअरमन अरुण डोंगळे

बचतीसाठी उचलले नवे पाउल : सोलापूर जिल्ह्यात १८ एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प, वर्षाला होणार अंदाजे साडेसहा कोटीची बचत

कोल्‍हापूर,दि.६ (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लि. कोल्हापूर (गोकुळ) ने सोलर ओपन ॲक्सेस स्कीम अंतर्गत ६.५ मेगा वॅट कपॅसिटीचा सौर ऊर्जा प्रकल्प मु.पो.लिंबेवाडी ता.करमाळा जि.सोलापूर येथे मे.सार्जन रिॲलिटीज प्रा.लि.पुणे यांच्यावतीने उभा करण्यात आलेल्या सोलर पार्कमध्ये स्वतःची १८ एकर जागा खरेदी करून हा प्रकल्प उभारत असल्याची व यामुळे गोकुळच्या वीज बिलामध्ये वर्षाला तब्बल साडेसहा कोटी रुपयांची बचत होणार असल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.गोकुळ दूध संघाने विविध माध्यमातून बचतीचे धोरण अवलंबले असून संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या बाबींमध्ये बचत करता येईल याचा विचार पुढे आल्यानंतर वीज बिलांच्या बचतीसाठी सौर उर्जेचा पर्याय समोर आला. यातूनच मग सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपयुक्त अशा भौगोलिक स्थितीचा सविस्तर अभ्यासाचा अहवाल अभियांत्रिकी विभाग प्रमुखांच्याकडून घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविण्याचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर संबंधित कंपनीशी करार करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात १८ एकरावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गोकुळचे वीजे पोटी वर्षाला खर्च होणारे तब्बल साडेसहा कोटी रुपये वाचणार आहेत.

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीच्या ओपन ॲक्सेस स्कीम मधून अशा पध्दतीची सौरऊर्जा निर्माण करून ती वीज मंडळाला पुरवली जाणार असून त्याबद्दल्यात वीज मंडळ गोकुळच्या वीज बिलांचा दर कमी करणार आहे. सध्या दूध संघाला वर्षाकाठी सरासरी वीज बिलाचा खर्च १३ कोटी इतका येतो. यासाठी सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यातील लिंबेवाडी जवळ २०० एकरवर पुणे येथील सार्जन रिॲलिटी प्रा.लि.ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहे यापैकी गोकुळ १८ एकर जागा खरेदी करून याठिकाणी या कंपनीमार्फत सोलर पार्क मधून रोज साडेसहा मेगावॅट वीज निर्मिती गोकुळ करणार आहे. एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचत करण्यासाठी गोकुळने नव्या वर्षात टाकलेले हे एक पाऊल आहे.

या ठिकाणी ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून पूर्ण करून देण्यासह जमीन खरेदीची रक्कम असा हा ३३ कोटी ३३ लाख रुपयांचा प्रकल्प आहे. यातून निर्माण होणारी वीज मंडळाला पुरवल्यानंतर गोकुळला सध्या प्रतियुनिट येणारा खर्च १० रुपया ऐवजी ३ रुपये येणार असून ही वार्षिक बचत साडेसहा कोटीवर जाणार आहे. याच हिशोबाने केवळ पाच वर्षांमध्ये या प्रकल्पाचा संपूर्ण खर्च वसूल होणार आहे. यासाठी राष्ट्रीय डेअरी डेव्हपमेंट बोर्डाकडे गोकुळ ने २५ कोटी ४७ लाख रुपये कर्जाची मागणी केली असून त्याचे हप्ते या बचत झालेल्या रकमेतून अदा केले जाणार आहेत.

सदर सौर ऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये ३३ कोटी ३३ लाख इतका होणार आहे व या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये ६.५० कोटी इतकी बचत होणार आहे. याची निविदा प्रकल्प झाली असून ३१ जुलै २०२४ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाऊन ऑगस्ट २०२४ पासून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू होणार आहे.