Home Blog Page 22

अवैध गावठी कट्ट्यासह एक बालक ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ढोकी : तेरणा साखर कारखाना (ढोकी) समोरील पारधी पेढी परिसरात एका विधी संघर्षग्रस्त बालकाकडे गावठी कट्टा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यानंतर पथकाने शुक्रवारी (दि. ९ मे) सकाळी १०.४५ वाजता छापा टाकत कारवाई केली.

कारवाईदरम्यान संशयित बालकाला ताब्यात घेऊन विचारणा केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे मिळाली. मात्र अधिक विश्वासात घेतल्यानंतर त्याने गावठी कट्टा घरातील लाकडी कपाटात लपवून ठेवल्याची कबुली दिली. त्यानुसार दोन पंचांच्या उपस्थितीत घराची झडती घेण्यात आली असता, गावठी कट्टा सापडला. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे १५ हजार रुपये किमतीचा कट्टा जप्त केला.

जप्त शस्त्रासह संबंधित बालकाला ढोकी पोलिस ठाण्यात पुढील कारवाईसाठी दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण व चालक पो.कॉ. भोसले यांच्या पथकाने केली.

अवैध मुरुम उत्खनन प्रशासनाची कासवगती कंत्राटदाराला धार्जिण

प्रशासन गप्प, कारवाई शून्य; ‘मुरुमायण’ प्रकरणात कोणाचे संरक्षण?

भाग 3

धाराशिव, प्रतिनिधी |
तुळजापूर–लातूर राष्ट्रीय महामार्गावरील काक्रंबा येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासाठी लागणारा मुरुम बेकायदेशीर पद्धतीने, परवानगीशिवाय किंवा चुकीच्या परवानग्यांद्वारे उत्खनन करून आणल्याचा प्रकार आता गंभीर वळणावर पोहोचला आहे. या प्रकरणावर कारवाई करणे तर दूरच, पण जिल्हा प्रशासनाची संपूर्ण भूमिका संशयास्पद व एकतर्फी असल्याने, कंत्राटदाराला मोकळे रान मिळत आहे.

कंत्राटदाराचा आडमुठेपणा की प्रशासनाचा पाठिंबा?
प्रशासनाला उड्डाणपुलासाठी लागणाऱ्या मुरुमाचे प्रमाण माहित असताना, प्रत्यक्षात ज्या ठिकाणांहून मुरुम नेण्यात आला आहे, त्या जागांसाठी ना परवानगी, ना लेखी नोंद — मग इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खनन चालू राहते तरी कसे? हे चित्र पाहता, कारवाई करण्याऐवजी प्रशासन कंत्राटदाराच्या बाजूने झुकल्याचे स्पष्ट होते.

‘मुरुमायण’च्या पाठीमागे कोण?
सध्या ‘काक्रंबा उड्डाणपुल मुरुम घोटाळा’ हे संपूर्ण प्रकरण जणू एखाद्या नाट्यपूर्ण कथानकासारखे वाटत आहे. जिल्ह्यातच परवानग्या घेतल्या गेल्या असल्या तरी प्रत्यक्ष उत्खनन दुसऱ्याच गावांतून, रात्रीच्या वेळेस, डंपर व जेसीबीच्या सहाय्याने सुरू असल्याचे पुरावे मिळत आहेत.

यात प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग आहे का? का काही ‘वरच्या’ पातळीवरील मूकसंमतीमुळे हा प्रकार उघड उघड सुरू आहे? हे प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय झाले आहेत.

कोणाची संमती? कोणाचा फायदा?
या अवैध उत्खननातून शासनाचा मोठा महसूल बुडत आहे. मोजक्याच परवानग्यांवर लाखो घनमीटर मुरुम उचलला जात असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र याबाबत प्रशासनाकडून ना जागेची पाहणी, ना पंचनामा, ना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे.

अधिकाऱ्यांची यंत्रणा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा संशय आता पक्काच होत आहे. त्यामुळे या ‘मुरुमायण’चे दिग्दर्शक कोण? आणि हे घोटाळ्याचे ‘निर्माते’ कोण? हे देखील आता शोधण्याची वेळ आली आहे.

प्रशासनाची भूमिका अजूनही ‘क्लीन स्लेट’
या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत असून, जिल्ह्यातील सामाजिक संघटना, पर्यावरणप्रेमी, आणि पत्रकार या प्रकरणाच्या चौकशीसाठी आता पुढाकार घेत आहेत.

त्वरित कारवाईची गरज
उड्डाणपूलासारखी अत्यावश्यक सार्वजनिक कामे योग्य मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून व्हायला हवीत. अन्यथा त्यातून निर्माण होणारे अवैध व्यवहार, पर्यावरणीय नुकसान आणि महसूल बुडवणूक यांचा परिणाम दीर्घकालीन असेल.

प्रशासनाने या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आणि पुढील मुरुम पुरवठा कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने होईल, याची शाश्वती द्यावी, अशी मागणी आता बुलंद होऊ लागली आहे.

कंत्राटदाराचा महसूल प्रशासनाला ‘गुलिगत धोका’, परवानगी एका ठिकाणची, मुरुम उचलला दुसरीकडून

भाग २

धाराशिव – तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील बहुप्रतीक्षित उड्डाणपूलाचे काम सुरू झाल्याने स्थानिकांना दिलासा मिळाला असतानाच, या कामाशी संबंधित गोंधळत आणखी गंभीर माहिती समोर येत आहे. कंत्राटदार कंपनीने बांधकामासाठी लागणाऱ्या मुरुमासाठी महसूल प्रशासनाला ‘गुलिगत धोका’ देत सरकारी यंत्रणांची दिशाभूल केल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पहिल्या टप्प्यात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, मुरुमाचे उत्खनन अनधिकृत पद्धतीने काक्रंबा आणि आजूबाजूच्या गावांमधून रात्रीच्या वेळी जेसीबी व डंपरच्या सहाय्याने सुरू असल्याचे निदर्शनास आले. आता या घडामोडींना आणखी गंभीर वळण मिळाले असून, संबंधित कंत्राटदाराने केवळ नाममात्र परवानग्या घेतल्या असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या भूखंडासाठी परवानगी घेतली गेली होती, त्यासोबत परवानगी न घेतलेल्या ठिकाणांहून मुरुम उत्खनन केले आहे.
या प्रकारामुळे महसूल विभागाला लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता असून, सरकारच्या महसुलावर टाच आली आहे. चिल्लर परवानग्या घेऊन मोठ्या प्रमाणावर मुरुम उपसा केला गेला आहे, हे निदर्शनास येत आहे. कामाचे खरे गणित पाहता ज्या प्रमाणात मुरुम लागत आहे आणि ज्या प्रमाणात परवानगी घेतली गेली आहे, त्या आकड्यांमध्ये फारकत स्पष्ट आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांनी कंत्राटदाराविरोधात सखोल चौकशीची मागणी केली आहे.उड्डाणपूलाच्या कामात जर अशा पद्धतीने अपारदर्शकता आणि फसवणूक होत असेल, तर हा विकास नव्हे, तर लुबाडणूक ठरेल, अशी तीव्र भावना लोकांमध्ये आहे.

प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तत्काळ दखल घ्यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करत शासकीय महसूल वाचवावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

धाराशिवमध्ये तलाठी आणि खाजगी लिपीक लाच घेताना रंगेहाथ अटकेत – लाचलुचपत विभागाची यशस्वी सापळा कारवाई

धाराशिव | 5 मे 2025
धाराशिव जिल्ह्यातील वाघोली येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज सापळा रचून तलाठी भूषण चोबे व त्यांचे खाजगी लिपीक भारत मगर यांना 4000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत विभागाच्या धाराशिव युनिटने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

प्रकरणाचा तपशील:
तक्रारदाराने त्यांच्या वडिलांच्या नावावरील गट क्रमांक १५/१० या शेतजमिनीवरील कुळाचे नाव कमी करण्यासाठी तहसील कार्यालय, धाराशिव येथे अर्ज केला होता. यावर तहसीलदार धाराशिव यांनी मंडळ अधिकारी तेर यांना स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या अहवालासाठी तलाठी भूषण चोबे व त्यांचा खाजगी लिपीक भारत मगर यांनी तक्रारदाराकडे 5000 रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली. त्यात आरोपींनी 4000 रुपयांवर तडजोड करून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज दुपारी सापळा रचण्यात आला.

सापळा कारवाई आणि अटक:
तलाठी भूषण चोबे यांनी खाजगी लिपीक भारत मगर यांच्यामार्फत तक्रारदाराकडून 4000 रुपये लाच घेतली. त्याचवेळी सापळा पथकाने कारवाई करून दोघांनाही रंगेहाथ पकडले. आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

जप्त सामग्री:
तलाठी भूषण चोबे यांच्याकडून:

  • 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी
  • 30 ग्रॅम वजनाचा चांदीचा कडा
  • सॅमसंग मोबाईल
  • पार्कर कंपनीचे पेन
  • डेल कंपनीचा शासकीय लॅपटॉप

भारत मगर यांच्याकडून:

  • 4000 रुपये लाच रक्कम
  • अतिरिक्त 1090 रुपये रोख
  • सॅमसंग कीपॅड मोबाईल

आरोपींच्या घरी झडती सुरू असून, मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

गुन्हा दाखल आणि कायदेशीर प्रक्रिया:
भूषण चोबे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 12 तर भारत मगर यांच्याविरुद्ध कलम 7A नुसार धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींचा पुढील तपास लाचलुचपत विभाग करत आहे.

कारवाई करणारे अधिकारी व पथक:
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. सापळा पथकात पोलीस अंमलदार नेताजी अनपट, आशीष पाटील आणि नागेश शेरकर यांचा समावेश होता. मार्गदर्शन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे आणि अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांनी केले.

तक्रार करण्यासाठी संपर्क:
भ्रष्टाचाराची तक्रार टोल फ्री क्रमांक 1064 वर करता येईल. तसेच पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (मो. 9923023361) किंवा पोलीस उप अधीक्षक सिध्दाराम म्हेत्रे (मो. 9594658686) यांच्याशी संपर्क साधावा.
या कारवाईमुळे महसूल प्रशासनातील भ्रष्टाचार उघड झाला असून, लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत मिळाले आहेत. नागरिकांनी अशा प्रकारांचा विरोध करताना लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणला मुरुम कुठून? – काक्रंबा उड्डाणपूलासाठी मुरुमाचा स्रोत संशयास्पद; प्रशासनाची डोळस भूमिका गरजेची

तुळजापूर–लातूर महामार्गावरील काक्रंबा येथील उड्डाणपूलाचे काम अखेर सुरू झाले असले, तरी या कामासाठी लागणाऱ्या मुरुमाचा उगमच सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मुरुम उत्खनन करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेतल्या नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार कंपनीने बांधकामासाठी लागणारा मुरुम काक्रंबा परिसरातील शेतजमिनी व ओसाड भूखंडांमधून बेकायदेशीरपणे उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीच्या वेळी जेसीबी आणि डंपरच्या सहाय्याने चालणाऱ्या या उत्खननामुळे परिसरातील पर्यावरणीय समतोल ढासळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतजमिनींचे नुकसान, धुळीचे साम्राज्य, आणि नागरिकांच्या आरोग्यावर होणारे परिणाम हे या प्रकाराचे गंभीर दुष्परिणाम ठरत आहेत.

शासनाचा महसूल बुडवून विकासकामे केली जात असतील तर ती टिकाऊ व कायदेशीर कशी राहतील, असा सवाल उपस्थित होत आहे.

या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने संबंधित मुरुमाचा मूळ स्रोत शोधून, उत्खननास परवानगी आहे का याची चौकशी करणे गरजेचे ठरत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि बांधकाम साहित्य कायदेशीर व पर्यावरणपूरक मार्गानेच प्राप्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून होत आहे.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा उड्डाणपूल गरजेचा आहेच, पण तो पर्यावरण व नियमांचे उल्लंघन करून झाला, तर तो विकास न ठरता विनाश ठरू शकतो.

परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा असा आहे  धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचा दौरा

धाराशिव, 26 एप्रिल 2025 –प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, येत्या 30 एप्रिल ते 1 मे 2025 या कालावधीत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांचा दोन दिवसीय दौरा करणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत दस्तऐवजानुसार, या दौऱ्यात महत्वाचे शासकीय कार्यक्रम, पायाभूत सुविधांचे उद्घाटन, स्थानिक नेत्यांसह बैठका आणि नागरिकांशी संवाद यांचा समावेश आहे. हा दौरा या भागातील विकासाला चालना देण्यासाठी महत्वाचा आहे.

पहिला दिवस: बुधवार, 30 एप्रिल 2025

ठाण्याहून प्रस्थान आणि धाराशिव येथे आगमन

  • दुपारी 12:00 वा. : मा. मंत्री सरनाईक ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाहून खाजगी वाहनाने (MH 04 LL-7578) मुंबईतील सांताक्रुझ (पूर्व) विमानतळावरील कालिना गेट क्र. 8 कडे प्रस्थान करतील.
  • दुपारी 12:45 वा. : कालिना गेट क्र. 8, सांताक्रुझ (पूर्व) विमानतळ येथे आगमन.
  • दुपारी 1:00 वा. : खाजगी विमानाने धाराशिवकडे प्रस्थान.
  • दुपारी 2:30 वा. : धाराशिव विमानतळावर आगमन आणि नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिवकडे प्रयाण.

धाराशिवमधील महत्वाचे कार्यक्रम

  • दुपारी 2:40 वा. : नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे “जलव्यवस्थापन कृती पंधरवडा” या शासकीय कार्यक्रमास उपस्थिती. हा कार्यक्रम पाण्याच्या शाश्वत व्यवस्थापनावर केंद्रित आहे. समन्वयक: श्री. विजयकुमार थोरात, अधीक्षक अभियंता, जलसंपदा (संपर्क: 9420499421).
  • दुपारी 3:20 वा. : धारूर गावाकडे (जि. धाराशिव) प्रस्थान.
  • दुपारी 3:40 वा. : धारूर येथे शिवसेनेच्या युवासेना शाखेचे उद्घाटन आणि नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ. समन्वयक: श्री. गणेश ज्ञानदेव जगताप (संपर्क: 8080307109).
  • दुपारी 3:50 वा. : तुळजापूर (जि. धाराशिव) कडे प्रस्थान.
  • सायंकाळी 4:25 वा. : तुळजापूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) नूतनीकृत बस डेपोचे उद्घाटन. समन्वयक: श्री. भालेराव, विभाग नियंत्रक, धाराशिव (संपर्क: 9021893704).
  • सायंकाळी 4:55 वा. : नळदुर्ग, ता. तुळजापूर येथे प्रस्थान.
  • सायंकाळी 5:00 वा. : नळदुर्ग येथे दोन कार्यक्रम:
  1. नळदुर्ग किल्ल्याची पाहणी. समन्वयक: श्री. लक्ष्मण कुंभार, मुख्याधिकारी, नळदुर्ग (संपर्क: 9604702029, 8208391739).
  2. युवासेना शाखेचे उद्घाटन. समन्वयक: श्री. निखिल घोडके (संपर्क: 9311758438).

सोलापूर येथील सायंकाळ

  • सायंकाळी 5:45 वा. : नळदुर्ग येथून सोलापूरकडे प्रस्थान.
  • सायंकाळी 6:45 वा. : सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन (राखीव वेळ).
  • सायंकाळी 7:00 वा. : सोलापूर येथील शिवस्मारक सभागृह, बाजीराव चौक येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसह बैठक आणि विविध कार्यक्रमांना उपस्थिती.
  • रात्री 9:30 वा. : सोलापूर येथून धाराशिवकडे प्रस्थान.
  • रात्री 10:40 वा. : धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहावर आगमन आणि रात्रीचा मुक्काम.

दुसरा दिवस: गुरुवार, 1 मे 2025

धाराशिव येथील सकाळचे कार्यक्रम

  • सकाळी 7:40 वा. : शासकीय विश्रामगृह, धाराशिव येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान.
  • सकाळी 7:50 वा. : जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आगमन.
  • सकाळी 8:00 वा. : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दोन महत्वाचे कार्यक्रम:
  1. महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ.
  2. कसबे तडवले येथील जि.प. कन्या प्राथमिक शाळा आणि जि.प. केंद्र शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा 365 दिवस शाळा उपक्रमासाठी सत्कार समारंभ. समन्वयक: श्री. अशोक पाटील, शिक्षण अधिकारी, धाराशिव (संपर्क: 9049318035).
  • सकाळी 9:00 वा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ भोगावती नदीतील गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ. समन्वयक: श्रीम. वसुधा फड, मुख्याधिकारी, धाराशिव (संपर्क: 8888847092).
  • सकाळी 9:30 वा. : नियोजन भवनातील पालकमंत्री कार्यालयात नागरिकांच्या भेटीसाठी राखीव वेळ.
  • सकाळी 10:00 वा. : धाराशिव जिल्हा वार्षिक योजना (2025-26) संदर्भातील बैठक, नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय.
  • दुपारी 12:00 वा. : धाराशिव जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक (2025-26). समन्वयक: श्री. रविंद्र माने, जिल्हा कृषी अधिकारी (संपर्क: 982201881).
  • दुपारी 12:30 वा. : स्वयंवर मंगलकार्यालय, बार्शी नाका येथे धाराशिव जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ. समन्वयक: श्री. अशोक पाटील (संपर्क: 9049318035).
  • दुपारी 1:00 वा. : धाराशिव बस डेपोच्या नूतनीकरणाचे उद्घाटन. समन्वयक: श्री. भालेराव (संपर्क: 9021893704).

मुंबईला परतणे

  • दुपारी 2:00 वा. : धाराशिव विमानतळाकडे प्रस्थान.
  • दुपारी 2:30 वा. : धाराशिव विमानतळावर आगमन.
  • दुपारी 3:00 वा. : खाजगी विमानाने सांताक्रुझ (पूर्व), मुंबईकडे प्रस्थान.
  • सायंकाळी 4:15 वा. : कालिना गेट क्र. 8, सांताक्रुझ (पूर्व) विमानतळ, मुंबई येथे आगमन.
  • सायंकाळी 4:45 वा. : ठाण्यातील निवासस्थानाकडे प्रस्थान, आगमन आणि मुक्काम.

चौकशी समिती घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी की कारवाईसाठी?

तांदूळ अफरातफर आणि कोट्यावधींच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती

कालमर्यादा नसलेली समिती अहवाल कधी देणार याकडे लक्ष!

आकाश नरोटे
भाग – ११

धाराशिव –
जीपीएस नसलेल्या वाहनातून शासकीय योजनेच्या धान्याची वाहतूक होत असेल तर ती वाहतूक अवैध आहे असा शासन निर्णय आहे आणि जिल्हाधिकारी अश्या अवैध वाहतुकीवर थेट कारवाई करू शकत असताना देखील ८.९४ क्विंटल अफरातफर आणि त्यातून जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या वरदहस्ताने होत असलेल्या घोटाळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली खरी मात्र ती कारवाईसाठी आहे की घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी आहे हे कोडे नव्याने तयार झाले आहे.

दैनिक जनमत ने लावून धरलेले पुरवठा विभागातील ८.९४ क्विंटल तांदूळ अफरातफर प्रकरण आणि त्याचाच धागा घेऊन हा घोटाळा २०० कोटींपेक्षा अधिक असल्याबाबत आणि हा घोटाळा पुढे 1 हजार कोटींच्या जवळपास जाईल याबाबत दैनिक जनमत ने वृत्तमालिका लावून धरली. तब्बल १० भाग प्रकाशित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी समिती स्थापन केली असून भूसंपादन उपजिल्हाधिकारी उदयसिंह भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करणार आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी या चौकशी समितीला वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले असले तरी किती दिवसात चौकशी पूर्ण केली गेली पाहिजे याबाबत नमूद नसल्याने कालमर्यादा नसलेली समिती अहवाला कधी देणार याकडे लक्ष लागले असले तरी एखाद्या समितीला चौकशीची कालमर्यादा नसणे ही घोटाळेबाजांना अप्रत्यक्षपणे वाचवण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.
८.९४ क्विंटल अफरातफर प्रकरणापासून या घटनेची सुरुवात असून यातील आरोपी अटकेत आहे त्याला अद्याप जामीन न मिळाल्याने तो न्यायालयीन कोठडीत असून आरोपी अल्पवयीन असल्याबाबत शंका उपस्थित केली गेली असल्याने याबाबत निवृत्त न्यायाधीश समितीत असायला हवे होते असे काही तज्ञ मंडळी सांगतात.

त्या दिवशीच्या दुसऱ्या ट्रक ला देखील नव्हते जीपीएस

एम. एच. ४० एन 7513 या ट्रक सोबतच एम. एच. 21 एक्स २५८६ या ट्रक ने लातूर येथून धाराशिव येथे रेशनचे धान्य आले होते. पहिल्या ट्रकला जीपीएस बसवले नव्हते याबाबत याआधीच बातम्या प्रसिद्ध झाल्या असून त्यावर अद्याप कुठलाच खुलासा पुरवठा विभागाने केला नाही. दुसऱ्या ट्रक ला देखील जीपीएस बसवले नसल्याची माहिती आहे.

अशी आहे चौकशी समिती

अध्यक्ष म्हणून उदयसिंह भोसले, उपजिल्हाधिकारी भूसंपादन हे असून सचिन पाटील नायब तहसीलदार आणि राहुल सलगर लेखाधिकारी हे समितीचे सदस्य आहेत.

धाराशिव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीर दस्त नोंदणीचा गंभीर प्रकार; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

धाराशिव, दि. २५ एप्रिल २०२५: धाराशिव येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदेशीर दस्त नोंदणीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात लोक आंदोलन न्यास या सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवेदन सादर केले असून, याप्रकरणी दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात कनिष्ठ लिपिक विशाल गाते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांना सह दुय्यम निबंधक पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवून केलेल्या बेकायदेशीर कृत्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठबळ दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

तक्रारीचा तपशील

लोक आंदोलन न्यासने सादर केलेल्या निवेदनानुसार, विशाल गाते यांना २७ जानेवारी २०२५ ते ७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत सह दुय्यम निबंधक कार्यालय, धाराशिव येथे तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला होता. या कालावधीत त्यांनी आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्याचा आरोप आहे. यामध्ये धाराशिव शहरातील नगर परिषद हद्दीतील जमिनींचे तुकडे पाडून किमान क्षेत्राच्या नियमांचे उल्लंघन करत दस्त नोंदणी करण्यात आल्याचे नमूद आहे.

निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी २०२५ रोजी धाराशिव शहरातील १४ आर क्षेत्र १२ व्यक्तींना आणि १० आर क्षेत्र ९ व्यक्तींना विक्री केल्याचे दस्त नोंदवले गेले. तसेच, ३१ जानेवारी २०२५ रोजी १० आर क्षेत्र ७ व्यक्तींना नोंदवले गेले. महाराष्ट्र शासनाच्या ८ ऑगस्ट २०२३ च्या आदेशानुसार, नगरपालिका हद्दीतील बागायत जमिनीचे किमान क्षेत्र २० आर ठरविण्यात आले आहे. मात्र, येथे १० आर आणि १४ आरचे दस्त नोंदवून नियमांचा भंग करण्यात आला.

माळरानावर ऊसाची खोटी नोंद

निवेदनात आणखी एक गंभीर आरोप आहे की, सदर जमीन माळरानावर असताना तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांशी संगनमत करून ७/१२ उताऱ्यावर ऊसाची खोटी नोंद करण्यात आली. याशिवाय, नॉन-ॲग्रिकल्चर (एन.ए.) परवानगी किंवा लेआउट न करता सामायिक शेतीच्या नावाखाली प्लॉट विक्रीचा गैरप्रकार केल्याचे नमूद आहे.

नियमांचा भंग आणि वरिष्ठांचे संगनमत

निवेदनात असेही म्हटले आहे की, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ पदाचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ लिपिकाला देता येत नसताना, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी विशाल गाते यांना बेकायदेशीरपणे हा कार्यभार सोपवला. याशिवाय, वर्ग-२ मधील जमिनींची खरेदीखत नोंदणी सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी आणि नजराना न भरता करण्यात आली. तसेच, अंतिम रेखांकनाशिवाय तात्पुरत्या लेआउटवर दस्त नोंदणी आणि साठेखताच्या अटींची पूर्तता न करता खरेदीखत नोंदवण्याचे बेकायदेशीर कृत्यही समोर आले आहे.

तक्रारीनंतरही कारवाई नाही

लोक आंदोलन न्यासने यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार निवेदन सादर केले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. याउलट, विशाल गाते यांना कळंब आणि परंडा येथे सह दुय्यम निबंधक पदाचा कार्यभार देण्यात आला असून, तेथेही त्यांनी बेकायदेशीर दस्त नोंदणी केल्याचा आरोप आहे.

चौकशी आणि कारवाईची मागणी

लोक आंदोलन न्यासने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात मागील सहा महिन्यांत विशाल गाते आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तक्रारीमुळे तक्रारकर्त्यांच्या जिवीताला धोका असल्याचे नमूद करत, त्यांच्यासाठी सुरक्षा व्यवस्था पुरवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

निवेदनावर स्वाक्षऱ्या

या निवेदनावर लोक आंदोलन न्यासचे मनोज खरे, परमेश्वर वाघमारे, संदीपान माळकर आणि मनोज जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. निवेदनाची प्रत माहिती आणि कारवाईसाठी पोलीस अधीक्षक, धाराशिव आणि सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांच्याकडेही सादर करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्हा परिषद ‘100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत’ अव्वल; QCI पथकाकडून अंतिम मूल्यमापन

धाराशिव – दि. 23 एप्रिल 2025: महाराष्ट्र शासनाच्या ‘100 दिवसांच्या क्षेत्रीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे’ अंतर्गत धाराशिव जिल्हा परिषदेने छत्रपती संभाजीनगर महसूल विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या मोहिमेच्या अंतिम टप्प्यातील मूल्यमापनासाठी भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) च्या पथकाने आज, दि. 23 एप्रिल 2025 रोजी धाराशिव जिल्हा परिषदेस भेट देऊन कामकाजाचे सादरीकरण तपासले.

मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विशेष मोहिमेचा कृती आराखडा दि. 07 जानेवारी 2025 ते दि. 16 एप्रिल 2025 या कालावधीत राज्यभर राबविण्यात आला. धाराशिव जिल्हा परिषदेने आपले अंतिम सादरीकरण दि. 18 एप्रिल 2025 रोजी ई-मेलद्वारे विभागीय आयुक्तांना सादर केले होते. या सादरीकरणाच्या आधारे विभागीय आयुक्तांनी धाराशिव जिल्हा परिषदेला विभागातील सर्वोत्तम जिल्हा परिषद म्हणून निवडून राज्यस्तरीय अंतिम मूल्यमापनासाठी शिफारस केली.

QCI चे पथकप्रमुख श्री. रामनंद शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील टीमने धाराशिव जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे सखोल मूल्यमापन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विलास जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. सूर्यकांत भुजबळ, तसेच इतर विभागप्रमुख, खातेप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

मूल्यमापनादरम्यान धाराशिव जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षमतेने आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांनी पथकाची प्रशंसा मिळवली. “जिल्हा परिषद पुढील काळातही निर्धार आणि उत्साहाने कार्यरत राहील आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवेल,” असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी व्यक्त केला.

केशेगाव स्मृती स्तंभ प्रकरणी लहू खंडागळेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा तक्रार,दप्तर दिरंगाईवर शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी; 28 फेब्रुवारीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष

धाराशिव, दि. 22 एप्रिल 2025: केशेगाव (ता. धाराशिव) येथील मराठवाडा मुक्तिसंग्राम स्मृती स्थंभ बांधकाम प्रकरणात गैरप्रकार आणि मनमानी कारभाराचा आरोप करत लहू रामा खंडागळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा तक्रार दाखल केली आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी दप्तर दिरंगाईचा मुद्दा उपस्थित करत शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

खंडागळे यांच्या तक्रारीनुसार, केशेगाव (ता. धाराशिव) येथे मराठवाडा मुक्तिसंग्रामात कोणताही जवान शहीद नसताना स्मृती स्थंभ बांधण्याची प्रशासकीय मान्यता 17 ऑगस्ट 2023 रोजी देण्यात आली. यात तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), उपमुख्य कार्यकारी अधिकारी शाम गोडभरले, कार्यकारी अभियंता (बांधकाम, जि.प.) आणि ग्रामपंचायत केशेगाव यांनी भौगोलिक तथ्यांची पडताळणी न करता घाईघाईत बांधकाम पूर्ण केले. यामुळे शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा त्यांचा आरोप आहे.

28 फेब्रुवारीच्या तक्रारीचा संदर्भ
28 फेब्रुवारी 2025 रोजी खंडागळे यांनी विभागीय आयुक्त (संभाजीनगर), जिल्हाधिकारी (धाराशिव), मुख्य सचिव आणि प्रधान सचिव (नियोजन विभाग) यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी स्मृती स्थंभ बांधकामातील गैरप्रकार, चुकीच्या ठिकाणी बांधकाम, आणि ग्रामपंचायत केशेगाव व तुळजापूर यांनी बनावट ठराव सादर करून शासकीय निधीवर डाका टाकल्याचा आरोप केला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी 28 नोव्हेंबर 2023 रोजी केशेगाव (ता. तुळजापूर) येथे नव्याने स्मृती स्थंभ बांधण्यास मान्यता देऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुका झाकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा खंडागळे यांनी केला आहे. मात्र, या तक्रारीवर दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी कोणतीही कारवाई झाली नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

आजच्या तक्रारीत काय?
आजच्या निवेदनात खंडागळे यांनी दप्तर दिरंगाईचा कायदा 2006 आणि महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 च्या तरतुदींचा आधार घेत कार्यालयीन विलंब आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आरोप केला की, त्यांचा 28 फेब्रुवारीचा अर्ज सात दिवसांहून अधिक काळ प्रलंबित राहिला, जे कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे संबंधित कर्मचारी दोषी असल्याचे त्यांचे मत आहे. तसेच, दोषी अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी आणि कायदेशीर कारवाई करून त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

प्रकरणाचा तपशील

  • चुकीचे बांधकाम: केशेगाव (ता. धाराशिव) येथे शहीद जवान नसताना स्मृती स्थंभ बांधण्यात आला.
  • आर्थिक गैरप्रकार: ग्रामपंचायत केशेगावने बनावट ठराव सादर करून आणि वरिष्ठांना चुकीची माहिती न देता निधीचा गैरवापर केला.
  • तुळजापूर येथील बांधकाम: चुका उघड झाल्यावर 28 नोव्हेंबर 2023 रोजी केशेगाव (ता. तुळजापूर) येथे नव्याने स्मृती स्थंभाला मान्यता देण्यात आली, परंतु ते बांधकामही 30 मार्च 2024 पर्यंत अपूर्ण आहे.
  • आरोप: तत्कालीन जिल्हाधिकारी, जि.प. अधिकारी, आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक चुका करून शासकीय तिजोरीवर अतिरिक्त भार टाकला.

मागणी
खंडागळे यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई, वाया गेलेल्या निधीची वसुली आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. तसेच, दप्तर दिरंगाईमुळे प्रकरणाला विलंब होत असल्याने शिस्तभंगाची कारवाई तातडीने करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.