Home Blog Page 13

मंत्रालयात अभ्यागत आणि वाहन प्रवेशासाठी नव्या सुधारित मार्गदर्शक सूचना

मुंबई, दि. १२ ऑगस्ट २०२५: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनात अभ्यागत आणि वाहनांना प्रवेश देण्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. शासन निर्णय क्रमांक पीईएस-४२१/प्र.क्र.१०८/विशा-४, दि. १२ ऑगस्ट २०२५ अन्वये या सूचना लागू करण्यात आल्या आहेत. मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या आणि वाहनांच्या प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, सुरक्षितता आणि कार्यक्षमता आणण्यासाठी या सूचना तयार करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे मंत्रालयातील प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येण्यासह सुरक्षेचे मानके उंचावतील, असा विश्वास शासनाने व्यक्त केला आहे.
मंत्रालयात अभ्यागत आणि वाहन प्रवेशासंदर्भात शासनाला प्राप्त झालेल्या सूचना, निवेदने आणि यापूर्वीच्या शासन निर्णयांनुसार (दि. २४.१२.२०२१, २४.०३.२०२५ आणि ११.०८.२०२५) आलेले अनुभव विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालय सुरक्षा प्रकल्प फेज-२ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या Visitor Management System (VMS) प्रणालीचा विचार करून या मार्गदर्शक सूचना सुधारित करण्यात आल्या आहेत. यापूर्वीच्या शासन निर्णय क्रमांक १ ला अधिक्रमित करून नव्या सूचना लागू करण्यात आल्या असून, यामुळे प्रवेश प्रक्रिया अधिक तंत्रस्नेही आणि सुरक्षित होईल.

सुधारित मार्गदर्शक सूचनांचा तपशील:

१. वाहनांना “पार्किंग पास” देण्याबाबत:

खालील ३२ श्रेणींतील व्यक्तींच्या प्रत्येकी एका वाहनाला मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश आणि आवारात पार्किंगसाठी “पार्किंग पास” अनुज्ञेय असेल:

  • मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री.
  • मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य व इतर न्यायाधीश.
  • महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती, विधानसभेचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते (दोन्ही सभागृहे).
  • सर्व विद्यमान मंत्री, राज्यमंत्री, उपसभापती, उपाध्यक्ष.
  • मा. महापौर (बृहन्मुंबई), नगरपाल, महामंडळांचे अध्यक्ष (मंत्री दर्जाचे), वैधानिक विकास मंडळांचे अध्यक्ष.
  • मा. महाअधिवक्ता, लोकआयुक्त, उप लोकआयुक्त, राज्य माहिती आयुक्त, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे आयुक्त, बृहन्मुंबई माहिती आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष.
  • मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, मुख्य निवडणूक अधिकारी, पोलीस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव, अपर पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी.
  • मंत्रालयातील दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनांना विशेष परवानगी.

२. वाहनांना “ड्रॉपिंग पास” देण्याबाबत:

खालील व्यक्ती/संस्थांच्या शासकीय/कार्यालयीन वाहनांना (प्रत्येकी एक) मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनाच्या प्रवेशद्वारातून प्रवेशासाठी “ड्रॉपिंग पास” मिळेल, परंतु या वाहनांना आवारात पार्किंगची परवानगी नसेल:

  • सर्व विद्यमान खासदार आणि आमदार.
  • मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्र्यांचे कार्यालयीन/शासकीय वाहने.
  • मंत्रालयीन विभागांची कार्यालयीन वाहने.
  • भा.प्र.से./भा.पो.से./भा.व.से. संवर्गातील अधिकाऱ्यांची कार्यालयीन वाहने.
  • मंत्रालयातील उपसचिव, सहसचिव आणि दिव्यांग अधिकारी/कर्मचाऱ्यांची चारचाकी वाहने.

३. प्रवेशासाठी अटी आणि शर्ती:

  • अर्ज प्रक्रिया: पार्किंग आणि ड्रॉपिंग पाससाठी संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या कार्यालयाने विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक.
  • खासगी वाहनांचे प्रमाणीकरण: शासकीय कार्यालयांना वाहन पुरवठा करणाऱ्या खासगी पुरवठादारांकडून भाड्याने घेतलेल्या वाहनांना पास मिळण्यासाठी संबंधित व्यक्ती किंवा कार्यालयाने वाहनाचा वापर प्रमाणित करणे आवश्यक.
  • दिव्यांग वाहने: दिव्यांग व्यक्तींच्या वाहनांना प्रादेशिक परिवहन विभागाचे “Adapted Vehicle” प्रमाणपत्र आवश्यक.
  • प्रवेश प्रतिबंध: पासधारक व्यक्तीशिवाय इतर कोणालाही वाहनातून मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही.
  • पासची वैधता: सर्व वाहन प्रवेशपास ३१ डिसेंबरपर्यंत वैध असतील, त्यानंतर नूतनीकरण आवश्यक.

४. शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि अभ्यागतांना प्रवेश:

  • माजी खासदार/आमदार: विधानमंडळाच्या ओळखपत्राद्वारे थेट प्रवेश, परंतु माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे नोंदणी आणि RFID कार्डद्वारे चेहरा ओळख प्रणाली (Facial Recognition) बंधनकारक.
  • विधानमंडळ कर्मचारी: ओळखपत्र दर्शनी भागावर लावून प्रवेश, परंतु RFID कार्ड आणि चेहरा ओळख प्रणालीद्वारे प्रवेश आवश्यक.
  • इतर शासकीय कर्मचारी: DigiPravesh अॅपद्वारे प्रवेशपास घेऊन प्रवेश. मंत्रालयाबाहेर RFID कार्ड वितरणासाठी खिडकी उपलब्ध. प्रवेशपास परत करणे बंधनकारक.
  • बैठकीसाठी येणारे अधिकारी/अभ्यागत: DigiPravesh अॅपद्वारे प्रवेशपास आवश्यक. संबंधित विभागाने बैठक पत्र किमान एक दिवस अगोदर सायंकाळी ५:३० पर्यंत अॅपवर अपलोड करणे बंधनकारक. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी दृकश्राव्य माध्यमांचा (VC) वापर सुचविला आहे.

५. सर्वसाधारण अभ्यागतांसाठी नियम:

  • सर्वसाधारण अभ्यागतांना दुपारी २:०० नंतर DigiPravesh अॅपद्वारे प्रवेशपास घेऊन प्रवेश मिळेल.
  • ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग: दुपारी १२:०० पासून प्रवेश आणि स्वतंत्र रांगेची व्यवस्था. वैध प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक.
  • वकील आणि लिपिक: न्यायालयीन कामकाजासाठी वैध दस्तऐवज तपासून सकाळी १०:०० नंतर प्रवेश.
  • ओळखपत्र आवश्यक: आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी एक शासकीय ओळखपत्र सादर करणे बंधनकारक.

६. सामान्य नियम आणि अंमलबजावणी:

  • ओळखपत्र/प्रवेशपास: सर्व शासकीय कर्मचारी आणि अभ्यागतांनी मंत्रालयात वावरताना ओळखपत्र/प्रवेशपास दर्शनी भागावर लावणे बंधनकारक.
  • वाहन पास: पार्किंग/ड्रॉपिंग पास वाहनाच्या पुढील काचेवर चिकटवणे आवश्यक.
  • अधिकार: प्रवेशपास मंजुरीचे अधिकार प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग आणि अपवादात्मक प्रकरणात अपर मुख्य सचिव (गृह) यांच्याकडे.
  • प्रतिबंध: वॉकीटॉकी किंवा इतर सूचनांवरून प्रवेश देण्यास मनाई. नियमभंग गंभीर बाब मानली जाईल.
  • लागू क्षेत्र: या सूचना मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनासाठी लागू.महाराष्ट्र शासनाने या निर्णयाद्वारे मंत्रालयातील प्रवेश व्यवस्थेत सुधारणा करून प्रशासकीय कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास मंत्रालयातील कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान होईल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.
  • महाराष्ट्र शासनाने या निर्णयाद्वारे मंत्रालयातील प्रवेश व्यवस्थेत सुधारणा करून प्रशासकीय कार्यक्षमता आणि सुरक्षितता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. या सूचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास मंत्रालयातील कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान होईल, असा विश्वास गृह विभागाने व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय : पोलीस भरती, पीडीएस दुकानदारांना दिलासा, सोलापूर विमानप्रवासाला गती, कर्ज योजनांतील सवलती

मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज (१२ ऑगस्ट) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पोलीस भरती, सार्वजनिक वितरण प्रणालीतील दुकानदारांच्या मार्जिनवाढ, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गाला अनुदान, तसेच मागासवर्ग विकास महामंडळांच्या कर्ज योजनांतील सवलतींचा समावेश आहे.

🔹 १५ हजार पोलीस भरतीला हिरवा कंदील
महाराष्ट्र पोलिस दलातील सुमारे १५,००० शिपाई पदांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली. २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही भरती प्रक्रिया होणार आहे. विशेष बाब म्हणून २०२२ आणि २०२३ मध्ये वयोमर्यादा ओलांडलेले उमेदवारही यामध्ये अर्ज करू शकणार आहेत.

🔹 रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अन्नधान्य व साखर वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांचे क्विंटलमागील मार्जिन १५० रुपयांवरून १७० रुपये करण्यात आले. त्यामुळे दुकानदारांना प्रती क्विंटल २० रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.

🔹 सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासासाठी व्हायअबिलिटी गॅप फंडिंग
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी एक वर्षासाठी प्रति आसन ३,२४० रुपये व्हायअबिलिटी गॅप फंडिंग (१०० टक्के अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही योजना उडान योजनेच्या धर्तीवर असून, त्यामुळे प्रवासखर्च कमी होऊन सामान्य प्रवाशांना विमानप्रवास परवडणारा होणार आहे.

🔹 कर्ज योजनांतील जामीनदार अटी शिथिल व शासन हमीस मुदतवाढ
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ यांच्या विविध कर्ज योजनांतील जामीनदारांच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. तसेच शासन हमीस पाच वर्षांची मुदतवाढ मिळणार आहे. यामुळे लघुउद्योजकांना कर्ज मिळविणे सुलभ होणार असून प्रलंबित प्रकरणांना गती मिळेल.

या निर्णयांमुळे रोजगार निर्मिती, जनसामान्यांना दिलासा आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याचा आज शेवटचा दिवस

१,२०० एकर जमिनीवर ३० वर्षांचा भाडेपट्टा; स्थानिकांना किमान १०० जणांना रोजगार बंधनकारक

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे हाती घेण्यात येणाऱ्या १,२०० एकर क्षेत्रफळाच्या हरित ऊर्जा प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आज, १२ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. इच्छुक कंपन्यांना आजच आपला प्रस्ताव संस्थानकडे प्रत्यक्ष, टपाल किंवा कुरिअरद्वारे पोहोचवावा लागेल. अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव स्वीकारले जाणार नाहीत.


प्रकल्पाचा तपशील

हा प्रकल्प माळुंब्रा व मसला (खु.) गावांमधील श्री जगदंबा देवस्थान, भारतीबुवा मठ, सिंदफळ यांच्या ताब्यातील जमिनीवर उभारला जाणार आहे. यामध्ये –

  • सौर, पवन, हायब्रिड किंवा CBG अशा तंत्रज्ञानाद्वारे स्वच्छ ऊर्जा निर्मिती केली जाईल.
  • प्रकल्पाच्या संचालनातून किमान १०० स्थानिकांना रोजगार मिळणे अनिवार्य आहे.
  • भाडेपट्ट्याचा कालावधी ३० वर्षे असेल, त्यानंतर जमीन व प्रकल्प ट्रस्टकडे हस्तांतरित केला जाईल.

निविदेच्या प्रमुख अटी

  • बोली लावणारी कंपनी कंपनी अधिनियम १९५६/२०१३ अंतर्गत नोंदणीकृत असावी.
  • हरित ऊर्जा प्रकल्पांचा अनुभव आणि किमान ₹१०० कोटी वार्षिक उलाढाल असणे आवश्यक.
  • भाडेपट्टीचे दर प्रति एकर प्रति वर्ष सर्वाधिक कोट करणाऱ्या कंपनीला प्रकल्प देण्यात येईल.
  • वार्षिक भाड्यात दरवर्षी ३% वाढ होईल.
  • विजेत्या कंपनीने तीन वर्षांच्या भाडेपट्टीएवढी सुरक्षा ठेव जमा करावी.

स्थानिकांसाठी रोजगाराची संधी

संस्थानने स्पष्ट केले आहे की या प्रकल्पातून स्थानिकांना रोजगार प्राधान्याने दिला जाईल. यामुळे तुळजापूर तालुक्यातील आर्थिक घडामोडींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

तुळजापूरात १०८ फुटी शिल्पाच्या फायबर मॉडेलसाठी १० लाखाचे मानधन

३१ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया

वंचित बहुजन आघाडीचा विरोध

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाच्या प्रसंगावर आधारित 108 फुट उंचीच्या ब्रॉन्झ धातूच्या शिल्पासाठी फायबर मॉडेल तयार करण्यासाठी नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत शिल्पकारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

निविदा व मानधनाचे स्वरूप

  • प्रस्तावित फायबर मॉडेलची उंची 2.5 ते 3 फूट असावी.
  • मॉडेल धार्मिक व ऐतिहासिक मार्गदर्शनानुसार तयार करणे आवश्यक.
  • मॉडेल तयार करणाऱ्या शिल्पकाराकडे शिल्पकलेतील पदविका/पदवी व किमान १५ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक.
  • सर्व फायबर मॉडेल मुंबई येथील कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य येथे सादर करावेत.
  • मॉडेल सादर करण्याची मुदत १ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५.

निवड प्रक्रिया व बक्षीस

  • प्राप्त सर्व मॉडेलपैकी ५ मॉडेल निवडले जातील; निवडलेल्या प्रत्येक शिल्पकाराला ₹१.५ लाख मानधन.
  • अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेलच्या शिल्पकाराला ₹१० लाखांचे मानधन.
  • निवड समितीची बैठक कला संचालनालय, मुंबई येथे होईल.

वंचित बहुजन आघाडीचा विरोध

“जिजाऊ-शिवराय दाखवा, चुकीचा इतिहास नको” – अनुराधा लोखंडे

वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे यांनी या शिल्प संकल्पनेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, इतिहासात माँसाहेब जिजाऊ यांनीच शिवरायांना तलवार देऊन लढाईचे शिक्षण दिले, तर तुळजाभवानी देवीने तलवार दिल्याचा ठोस पुरावा नाही.
“देवीने तलवार दिल्याचे शिल्प उभारल्यास खऱ्या इतिहासाला तडा जाईल. त्यामुळे 108 फुटी शिल्पात जिजाऊ व शिवराय यांचेच दर्शन घडावे,” अशी मागणी त्यांनी आंदोलनातून केली.

रस्ता अपघातात चालकासह दोघे जखमी, एकाचा मृत्यू – ९० जनावरे मृत

येडशी – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील रेल्वे ब्रिजजवळ झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, वाहनचालक व त्याचा सहकारी जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनातील तब्बल ९० जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. ही घटना गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली.

धाराशिव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी बाकर आयुब (रा. चोदपूर, ता. पुखरायान, जि. कानपूर, उत्तर प्रदेश) हा आपले युपी ७७ बीएन ३२१३ क्रमांकाचे वाहन वेगाने व निष्काळजीपणे चालवत होता. येडशीजवळील एनएच ५२ वरील रेल्वे ब्रिजवर त्याने समोरील ट्रेलर (क्र. केए ४१ डी ७०७३) व कंटेनर (क्र. केए ४१ डी ६६४५) यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात वाहनातील सोनवीर राम सनेही (रा. बिछौली, पोस्ट ऐतहार, जि. भिंड, मध्य प्रदेश) गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच ठार झाले. तर फिर्यादी अरशद इस्तीखार (वय १९, रा. चांदोपुर, पोस्ट अमरोधा, जि. कानपूर, उत्तर प्रदेश – व्यवसाय: क्लिनर) आणि चालक बाकर आयुब हे जखमी झाले.

धडकेनंतर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये प्रवास करणाऱ्या ७१ शेळ्या व १९ मेंढ्या जागीच मृत्युमुखी पडल्या. यामुळे जनावरांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या प्रकरणी फिर्यादी अरशद इस्तीखार यांनी १० ऑगस्ट रोजी धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी भा.न्या.सं. कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब), ३२५ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.


दारूच्या नशेत पोलीस ठाण्याच्या काचेवर दगडफेक

धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत एका इसमाने काचेवर दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी पोलीस हवालदार संतोष रामराजे पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत ते पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून पोअं/९१९ डी.बी. झोरी व वायरलेस ड्युटीसाठी पोअं/६६८ चव्हाण हेही ड्युटीवर होते.

रात्री १०.५२ वाजता तक्रारदार सुलताना हबीब निचलकर यांची तक्रार नोंदवित असताना, एक इसम दारूच्या नशेत येऊन अंमलदार कक्षाच्या काचेवर दगड मारून काच फोडली. बाहेर येऊन पाहणी केली असता, त्याचे नाव प्रदीप श्रीमंत लोखंडे (वय ४२, रा. तुळजापुरनाका, धाराशिव) असे समजले. आरोपीच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत होता. चौकशीत त्याने आपल्या गल्लीत भांडण झाल्याचे व लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व हातापायावर किरकोळ जखमा होत्या.

घटनेची माहिती बीट मार्शल पोलिसांना दिल्यानंतर पोअं/११०१ भोसले व पोअं/१७०० घुगे घटनास्थळी आले. लोखंडे याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३(१) व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जिल्हाधिकारी कार्यालयाचीच केराची टोपली; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच लावले अवैध बॅनर

धाराशिव – जिल्हाधिकाऱ्यांनी एखादा आदेश अथवा सूचना काढल्यास त्याचे पालन सर्व शासकीय यंत्रणांनी करणे अपेक्षित असते. मात्र, धाराशिव जिल्ह्यात उलट चित्र दिसून आले आहे. स्वतःच्या आदेशाचे पालन खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयानेच न केल्याची घटना उघड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना व नगरपंचायतींना अवैध बॅनरांवर लगाम घालण्यासाठी कठोर सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार, शहरातील प्रत्येक बॅनरवर QR कोड असणे बंधनकारक करण्यात आले होते, ज्यामुळे बॅनर लावणाऱ्यांची ओळख व वैधता त्वरित तपासता येईल.

परंतु, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच लावण्यात आलेल्या एका बॅनरवर QR कोड नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा बॅनर वैध आहे की अवैध, हा प्रश्न निर्माण झाला असून, नियमभंगाचे हे उदाहरण खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

शहरात बॅनर आणि होर्डिंग लावण्यासाठी ठराविक वेळ, ठिकाण आणि आकारमानाचे निकष निश्चित आहेत. त्याबाबत कर आकारणीची स्पष्ट तरतूद असून, या माध्यमातून नगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. परंतु, प्रत्यक्षात हे निकष पाळणे टाळले जात असल्याने अवैध बॅनर लावण्याचे प्रकार वाढले आहेत. धाराशिव शहरात, विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत, बॅनर सर्रासपणे लावले जातात. यामुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडत नाही, तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळा बॅनरमुळे दृष्टी आड झाल्याने किरकोळ अपघातांच्याही घटना घडल्या आहेत.

नगरपालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक असतानाच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच नियमभंग करणारा बॅनर लावला जाणे, ही बाब दुर्दैवी आणि लाजिरवाणी मानली जात आहे. नागरिकांचा प्रश्न आहे की, या बॅनरच्या वैधतेबाबत नगरपालिका स्पष्ट भूमिका घेणार का? की नेहमीप्रमाणेच चुकीकडे दुर्लक्ष करून ‘मूकसंमती’ दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाहणीला आले आणि उद्घाटन करून गेले 

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पडसाळी पंपगृह पूजन करून उद्घाटन

पडसाळी पंपगृहाच्या कामाची अधिकाऱ्याकडून घेतली सविस्तर माहिती

सोलापूर, दिनांक 11 : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प योजना क्रमांक दोन अंतर्गत पडसाळी येथे उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाचे पूजन व उद्घाटन जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पंपगृहाच्या कामाची सखोल माहिती घेऊन पाहणी केली.

या प्रसंगी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजीतसिंह  पाटील, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, कार्यकारी अभियंता अमोल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी प्रथम सिंचन प्रकल्पाच्या कामांची सविस्तर पाहणी केली. कृष्णा मराठवाडा योजनेतील टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पडसाळी येथे उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाचे पूजन विधिवत पार पडले. यानंतर प्रकल्पाच्या कार्यपद्धती, प्रगती आणि भविष्यातील लाभधारक क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर व भरपूर पाणी मिळणार असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

पाहणीला आले आणि उद्घाटन करून गेले

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मराठवाड्यासाठी महत्वाची आहे मात्र या योजनेचे भिजत घोंगडे कायम आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी निवडणुकीपूर्वी पाणी येईल असे सांगितले होते मात्र अद्याप धाराशिव जिल्ह्यात पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका आता तोंडावर असल्याने पाण्याबद्दल विचारणा होणार यामुळेच जलसंपदा मंत्र्याच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी येथील पंपगृहाचे उद्घाटन केल्याचे बोलले जात आहे. जलसंपदा मंत्र्याच्या दौऱ्यात केवळ पाहणी असताना उद्घाटन होणे अजब असल्याचे बोलले जात आहे.

एसटी चालक-वाहकांचे 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण

मागण्या मान्य न झाल्यास सणासुदीत सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

धाराशिव –
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नाचा कणा मानल्या जाणाऱ्या चालक आणि वाहक यांच्या आगारस्तरील प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या उपोषणामुळे श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या काळात एसटी सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगारातील विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी चालक-वाहकांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले असून, त्याची प्रत राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, विभाग नियंत्रक धाराशिव, विभागीय वाहतूक अधिकारी, कामगार अधिकारी, पोलीस निरीक्षक (आनंदनगर), विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या अशा

  1. नियमानुसार आपत्कालीन भत्ता देणे.
  2. सेवा जेष्ठतेनुसार राज्य परिवहन महामंडळात कर्तव्याचे वाटप.
  3. सेवा जेष्ठतेनुसार रोटेशन तालिका तयार करणे.
  4. मुंबई, बोरीवली, भिवंडी पायलट कर्तव्याचा संपूर्ण मोबदला नियमानुसार देणे. अन्यथा, इतर आगारांप्रमाणे ‘स्क्रू’ सुविधा उपलब्ध करणे.

या मागण्यांसह आणखी काही मागण्या उपोषणाच्या निवेदनात समाविष्ट आहेत. “मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी न झाल्यास 15 ऑगस्टपासून आम्ही आमरण उपोषणास बसू”, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

निवेदनावर वाहक ए. डी. शिरसकर, चालक एल. बी. सय्यद, वाहक के. बी. गायकवाड, चालक व्हि. टी. मुंडे, चालक एन. व्ही. रपकाळ, चालक जी. के. कात्रे, वाहक सौ. एम. एस. राऊत यांच्यासह एकूण 53 चालक-वाहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटीचे चालक आणि वाहक हे प्रवासी वाहतुकीचे थेट चालक घटक असल्याने, त्यांच्या संपाचा परिणाम थेट गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. त्यामुळे उपोषणाची अंमलबजावणी झाल्यास, सणासुदीच्या काळात प्रवाशांना गैरसोयीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


देशभरात दोन मोठ्या आंदोलनांचा बिगुल — मुंबईत शिवसेनेचे ‘जनआक्रोश’, दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा

मुंबई / नवी दिल्ली — देशाच्या राजधानी आणि आर्थिक राजधानीत आज दोन महत्त्वपूर्ण राजकीय आंदोलनांचे वातावरण तापले आहे. मुंबईत उद्धव ठाकरे गटाने ‘जनआक्रोश आंदोलन’ाची हाक दिली असून, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा निघणार आहे.


मुंबईत ‘जनआक्रोश आंदोलन’

देशाची आर्थिक राजधानी देखील आंदोलनाने ढवळून निघणार असून मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्कमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यासमोर सकाळी 11 वाजल्यानंतर हे आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहणार असून, या आंदोलनात केवळ शिवसैनिकच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ठाकरे गटाने महायुती सरकारवर तीव्र आरोप करत, भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा मुद्दा उचलून धरला आहे. अलीकडेच ‘हनीट्रॅप’सह विविध भ्रष्टाचार प्रकरणांमुळे महायुतीतील काही मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मुख्य मागणी ठाकरे गटाची आहे.

उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे की, “सरकारने अशा मंत्र्यांना पाठीशी घालण्याऐवजी कायद्याच्या कक्षेत कारवाई केली पाहिजे. अन्यथा राज्यभरात आंदोलनाची तीव्रता वाढेल.” या पार्श्वभूमीवर आज फक्त मुंबईतच नव्हे तर राज्यातील अनेक जिल्ह्यांत जनआक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.


दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा

दुसरीकडे, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व खासदार आज एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगावर मोर्चा काढणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकतेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये ‘मतांची चोरी’ झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीने आयोगावर थेट दबाव आणण्याचे धोरण आखले आहे.

विरोधी पक्षातील खासदारांचे म्हणणे आहे की, निवडणूक आयोगाने मतमोजणीत पारदर्शकता राखली नाही आणि निष्पक्षपणे काम करण्यात अपयश आले. यामुळे मतमोजणी प्रक्रियेत फेरफार होऊन सत्ताधारी पक्षाला लाभ मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. या संदर्भात आयोगाकडे सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

आयोगाकडून विरोधी खासदारांना भेटण्यासाठी दुपारी 12 वाजता वेळ देण्यात आली असून, एकूण 30 जणांच्या प्रतिनिधीमंडळाला प्रवेशाची परवानगी दिली आहे. या भेटीत आंदोलनाचे निवेदन अधिकृतरीत्या आयोगाला सादर केले जाणार आहे.


आजच्या या दोन आंदोलनांकडे देशभराचे लक्ष लागले आहे. एकीकडे मुंबईत राज्यातील सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेचे रस्त्यावर उतरलेले आंदोलन आणि दुसरीकडे दिल्लीत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा विरोधी पक्षांचा मोर्चा — या दोन्ही घडामोडी आगामी राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकतात.