Home Blog Page 10

तुळजाभवानी मंदिर शिखराचा अहवाल होता तर मंत्र्यांचे पुन्हा अहवालाचे आदेश कशासाठी?

अहवाल नसताना मंदिर विकास आराखड्याचे कामकाज कोणाच्या आदेशाने?

धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरा बाबतची संदिग्धता, संभ्रमावस्था पुन्हा कायम राहिली आहे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबईमध्ये बैठक घेऊन गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर असल्याने मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावा, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे म्हटले यामुळे पुन्हा एकदा तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी माध्यमांना आणि देवीभक्तांना खोटी माहिती दिली असल्याची चर्चा होताना दिसत आहे. 12 मार्च रोजी आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शिखर उतरवावे लागणार आहे असे म्हटले ते वाक्य पूर्ण करून त्यांनी येत्या 15 दिवसांत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) चा अहवाल घेणार असल्याचे म्हणले 12 मार्च रोजी बोललेल्या वक्तव्याला 160 दिवस पूर्ण झाले मात्र तो अहवाल नेमका काय आहे हे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले नाही. आणि अहवाल असताच तर सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत 30 दिवसात पुन्हा अहवाल देण्याचे आदेश का दिले असावेत हा चर्चिला जाणारा विषय आहे.

तुळजापूर विकास आराखडा आणि मंदिर जीर्णोद्धाराचे काम कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडले आहे. तुळजाभवानीचे भक्त या वादामुळे नाराज झाले आहेत दुखावले गेले आहेत त्यांच्या भावनांना ठेस पोचली आहे. जर आज सास्कृतिक कार्यमंत्री अशी शेलार यांनी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला अहवाल देण्याचे आदेश दिले असतील तर यापूर्वी जे काम सुरू झाले आहे ते पुरातत्व विभागाला अंधारात ठेवून सुरू झाले आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची पोस्ट

श्री तुळजा भवानी मंदिर व संकुल जतन संवर्धन व विकास आराखडा या संदर्भात आज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे बैठक घेतली. यावेळी गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच धार्मिक परंपरा आणि श्रद्धेला बाधा न आणता उपाय शोधण्यावर शासनाचा भर असल्याने मंदिराच्या कळसाबाबत तसेच गाभाऱ्याच्या दुरुस्तीबाबत एएसआय (पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग) तज्ज्ञांची, आय.आय.टी. तज्ज्ञांची मदत घेण्याबाबतचा संपूर्ण अहवाल 30 दिवसात तात्काळ तयार करण्यात यावा, अशी सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

कुलस्वामिनीचे हे परंपरागत, धार्मिक आणि सांस्कृतिक स्थान आहे. त्यामुळे श्रद्धा, परंपरा आणि विज्ञान यांचा समन्वय साधत संवर्धनाची दिशा ठरवली जाईल. संवाद आणि समन्वयातून या विषयावर निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मान्यतेने पुढील दिशा ठरविली जाईल.

या बैठकीस आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार श्रीकांत भारतीय, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी, धाराशिवचे जिल्हाधिकारी पुजारा, पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, तसेच मंदिराचे महंत, पुजारी आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या श्रीलक्ष्मी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

धाराशिव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी तहसील कार्यालयाचे आदेश

धाराशिव – तालुक्यात १४ ऑगस्टपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे व नद्यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत तहसील कार्यालय, धाराशिव (महसूल शाखा) यांनी १८ ऑगस्ट रोजी आदेश काढत सर्व महसूल मंडळातील ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.

या आदेशानुसार धाराशिव ग्रामीण, ढोकी, तेर व जागजी महसूल मंडळातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. प्राथमिक अहवालानुसार खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने राबविण्याचा निर्णय तहसील प्रशासनाने घेतला आहे.


📌 आदेशातील महत्त्वाचे मुद्दे

तहसीलदार मृणाल जाधव यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या आदेशात विविध अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे –

  • तलाठी : नुकसान झालेल्या शेतजमिनीचे/पिकांचे सर्व्हे नंबर व गट क्रमांक पथकास दाखवून ७/१२ उताऱ्याशी जुळविणे.
  • ग्रामसेवक : ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषि सहाय्यक व शेतकरी यांच्या उपस्थितीत GPS सक्षम मोबाईल अॅपद्वारे नुकसानग्रस्त शेतजमिनीचे व पिकांचे फोटो घेणे.
  • कृषि सहाय्यक : प्रत्यक्ष शेतजमिनीवर जाऊन पिकांची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे टक्केवारीनुसार मूल्यमापन करणे.

तयार झालेल्या पंचनाम्याचे प्रपत्र (अ, ब, क) व Annexure-१, Annexure-७ यामध्ये माहिती नमूद करून त्यासोबत जिओ-टॅगिंग केलेले फोटो संलग्न करणे बंधनकारक आहे. हे अहवाल तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सुपूर्द केले जातील. त्यानंतर तालुका कृषी अधिकारी मंडळनिहाय एकत्रित अहवाल तयार करून तालुका स्तरीय समितीकडे सादर करतील.


📌 निष्काळजीपणाबद्दल कडक इशारा

आदेशात नमूद करण्यात आले आहे की, पंचनाम्याच्या कामात हलगर्जीपणा केल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ५२ अंतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच खोटे किंवा चुकीचे पंचनामे केल्याचे आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे.


📌 प्रशासनाची भूमिका

तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासकीय मदत मिळण्यासाठी पंचनामे काटेकोर, वस्तुनिष्ठ व वेळेत पूर्ण व्हावेत. अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या पिकांच्या नुकसानीची योग्य नोंद होणे हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आदेशात म्हटले आहे.


धाराशिव तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामे तातडीने करून अहवाल सादर करण्यासाठी ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली आहे.


धाराशिव जिल्ह्यात महायुतीत समन्वय नाहीच! एकमेकांच्या मंत्र्यांच्या दौऱ्यात पाठ फिरवण्याकडे भर

धाराशिव ( आकाश महादेव नरोटे)- राज्यात महायुतीचे सरकार आहे एकीकडे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र तर येतातच कधी कधी तर एकाच गाडीतून प्रवास देखील करतात. धाराशिव जिल्ह्यात मात्र चित्र थोडे उलटे आहे. राज्याचे मंत्री जिल्ह्यात येतात मात्र ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्याच पक्षाचे नेते त्यांच्या दौऱ्यात असतात. काल राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात आलेले असताना त्यांच्या दौऱ्यात काही अपवाद वगळता जिल्ह्यातील मोठे नेते नव्हतेच. जिल्ह्यात अतोनात नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांच्या व्यथा बांधावर जाऊन ऐकण्यासाठी पाहण्यासाठी कृषीमंत्री आलेले असताना त्यांच्या दौऱ्यात सत्ताधारी लोकप्रतिनिधी नसणे हा समन्वयाचा अभाव आहे. आ. तानाजी सावंत, आ. राणा जगजितसिंह पाटील हे महायुतीमुळे निवडून आलेले असताना एकमेकांच्या पक्षाचं वावडं नेमकं कशासाठी? हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा दौरा होता त्या दौऱ्यात भाजपच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीकडे पाठ फिरवली पवनचक्कीची कामे, तुळजाभवानी विकास आराखडा, मराठा समाजासोबत बैठक अश्या महत्वाच्या बैठका असताना त्यांच्या बैठकीकडे इतर दोन पक्षाच्या नेत्यांनी फिरवलेली पाठ असमन्वय अधोरेखीत करते.तर याच्या काही दिवस अगोदर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते त्यांनी देखील जनता दरबार घेतला मात्र या दौऱ्यात देखील इतर सहकारी पक्षांचे नेते सहभागी न झाल्याने हा असमन्वय किती मोठा आहे हे दिसून आले. भाजपाचे नेते धाराशिव शहरातील दहीहंडीच्या कार्यक्रमात होते मात्र कृषिमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात नव्हते त्यामुळे कृषिमंत्र्यांना ते कृषिमंत्री मानत नसावेत जिल्ह्यातील भाजपचे नेते त्यांच्या पेक्षा वरिष्ठ वाटत असावेत. अर्थात भाजपचे नेते पाहणी करायला गेले नाहीत असे नाही मात्र महायुती म्हणून असलेला एकसंधपणा यातून दिसत नाही. मंत्रालयात जाऊन परिस्थिती सांगणे आणि बांधावरची वस्तुस्थिती वेगळी असते याचा विसर महायुतीच्या नेत्यांना पडला असावा.

नागरी सत्कार सोहळ्याची कल्पनाच नव्हती पालकमंत्र्यांचा गौफ्यस्फोट

तुळजापूर विकास आराखड्याचा एक भव्यदिव्य सत्कार सोहळा तुळजापुरात पार पडला. ड्रग्सच्या संबंधित आरोपींचा त्यातील वावर दिसल्याने तो वादात सापडला महालुमंत्र्यांच्या दौऱ्याला त्यामुळे गालबोट लागले मात्र त्याही कार्यक्रमात भाजपाच्या नेत्यांशिवाय कोणीच उपस्थित नव्हते. सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात पालकमंत्र्यांना निमंत्रण आहे असे सांगण्यात आले होते निमंत्रण पत्रिकेवर त्यांचा फोटो देखील वापरला कार्यक्रमाच्या अनुपस्थितीबद्दल त्यांना विचारले असता त्या कार्यक्रमाची कल्पनाच नव्हती असे उत्तर त्यांनी दिल्याने महायुतीत सारे काही आलबेल नाही हेच दिसून येते.

असमन्वय नेमका कोणामुळे?

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती पत्रकार परिषद घेऊन ही समिती स्थापन केल्याचे सांगितले मात्र त्या दिवशी घेतलेली बैठकी पहिली आणि शेवटची ठरली त्यानंतर कधी बैठक झाल्याचे पाहायला मिळाले नाही. भाजपच्या नेत्यांना शिवसेना आणि राष्ट्रवादीतील पदाधिकारी विरोध करतात मात्र जाहीर विरोध करत नसल्यामुळे विविध कार्यक्रमांना अनुपस्थित रहात आपला विरोध दर्शवतात. मुख्यमंत्रिपद भाजपकडे असल्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप महायुतीतील पदाधिकारी करतात.

जलसंपदा मंत्र्यांचा दौरा आणि उद्घाटनाचा कार्यक्रम

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील काही दिवसांपूर्वी धाराशिव जिल्ह्यात येऊन गेले करजखेडा येथील निम्न तेरणा प्रकल्प दुरुस्ती कामाचे त्यांनी उद्घाटन केले तत्तूर्वी त्यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातीत सोलापूर जिल्ह्यातील एका पंप गृहाचे उद्घाटन केले या कार्यक्रमात देखील महायुतीतील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते हे विशेष.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली अतिवृष्टीग्रस्त भागातील पीक नुकसानीची पाहणी

शेतक-यांच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी साधला संवाद

धाराशिव दि.१६ ऑगस्ट – जिल्ह्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.या परिस्थितीची गंभीर दखल घेत कृषी मंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून शेतकऱ्यांची पीक नुकसानीच्या परिस्थितीची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.भेटीदरम्यान त्यांनी येत्या ३ दिवसांमध्ये पिकांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली होती.राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रीय झाला आहे.राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.त्यामुळे अनेक जिल्ह्यांना पावसाचा फटका बसत आहे.काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसांमुळे नद्यांना पूर आले आहे. जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तेरणा व मांजरा नदीला पूर आला आहे.तसेच जिल्ह्यातील काही भागातील शेतीचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीची तात्काळ दखल घेऊन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज जिल्ह्यातील विविध नुकसानग्रस्त भागांचा दौरा करून पाहणी केली.यामध्ये प्रामुख्याने वाशी तालुक्यातील घोडकी या गावामध्ये प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.खोंदला ता.कळंब या गावात अतिवृष्टी पुरामुळे वाहून गेलेल्या शेतकरी कुटुंबास भेट दिली. तसेच पीक नुकसानीचे पाहणी केली.वाशी शहरातील काही दुकांनामध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या ठिकाणीही त्यांनी पाहणी केली. दौऱ्यादरम्यान कृषी मंत्री श्री.भरणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अडचणी व तातडीच्या गरजा समजून घेतल्या.शेतकऱ्यांनी शेती पिकांचे झालेले नुकसान,जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता तसेच घरांचे झालेले नुकसान याबाबत माहिती दिली.

यावेळी कृषीमंत्री श्री.दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासन,कृषी विभाग व महसूल अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून मदत कार्य गतीमान करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांना विमा हप्ता,पीक कर्ज पुनर्नियोजन,बियाणे व औषधांची उपलब्धता यासाठीही आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

श्री.भरणे यांनी पाण्यातून व चिखलातून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात पीक नुकसानीची पाहणी करून शेतक-यांना आधार दिला.

कृषीमंत्री श्री.दत्तात्रय भरणे म्हणाले की, “शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे,या कठीण प्रसंगी शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. नुकसानभरपाई व आवश्यक मदत तातडीने केली जाईल.तसेच शेतकऱ्यांना हवामान बदलाशी लढा देण्यासाठी पिक विमा, हवामान माहिती व पिक बदल संदर्भात मार्गदर्शन यासारख्या उपाययोजना केल्या जातील.असे त्यांनी भेटीदरम्यान उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले.

“शेतकऱ्यांच्या दु:खात शासन त्यांच्या पाठीशी आहे.मदत आणि दिलासा पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे आश्वासन कृषीमंत्री श्री.भरणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.

पीक नुकसानी पाहणी दरम्यान माजी आमदार राहुल मोटे,कृषी व महसूल अधिकारी उपस्थित होते.दौऱ्यादरम्यान बाधित शेतकरी बांधवांनी कृषीमंत्री श्री.भरणे यांचेशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या.

फास्टॅग वार्षिक पास योजना देशभरात लागू; पहिल्याच दिवशी 1.4 लाख वाहनधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2025 (प्रतिनिधी):
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील सुमारे 1,150 टोल प्लाझांवर आजपासून फास्टॅग वार्षिक पास योजना लागू केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या या योजनेला वाहनधारकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, ही योजना महामार्ग प्रवास अधिक किफायतशीर, वेगवान व सुलभ करणारी ठरणार आहे.

पहिल्याच दिवशी 1.4 लाख वाहनधारकांनी घेतला पास

योजना सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जवळपास 1.4 लाख वापरकर्त्यांनी वार्षिक पास खरेदी केला. या कालावधीत 1.39 लाख व्यवहारांची नोंद झाली आहे. सध्या 20,000 ते 25,000 वापरकर्ते ‘राजमार्गयात्रा’ ॲपचा वापर करत असून, पास वापरल्यानंतर टोल शुल्क शून्य कापल्याची माहिती वाहनधारकांना एसएमएसद्वारे पाठवली जात आहे.

कोणासाठी लागू आहे ही योजना?

फास्टॅग वार्षिक पास योजना सर्व बिगर-व्यावसायिक (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध आहे. वैध फास्टॅग असलेल्या वाहनधारकांना NHAI चे अधिकृत संकेतस्थळ किंवा राजमार्गयात्रा ॲपवरून वार्षिक शुल्क भरता येते.

  • शुल्क भरल्यानंतर 2 तासांच्या आत पास सक्रिय होतो.
  • त्यानंतर वाहनधारकांना वर्षभर देशातील राष्ट्रीय महामार्ग व द्रुतगती मार्गांवर प्रवास करताना टोल शुल्क आकारले जाणार नाही.

फास्टॅग क्रांती आणि वाढती लोकप्रियता

देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीत क्रांती घडवणाऱ्या फास्टॅगचा वापराचा दर सध्या तब्बल 98% आहे. आजघडीला 8 कोटींपेक्षा जास्त फास्टॅग वापरकर्ते आहेत.
वार्षिक पास सुविधा सुरू झाल्यामुळे महामार्ग वापरकर्त्यांचा प्रवासाचा अनुभव अधिक सहज, सुलभ आणि खर्चिकदृष्ट्या फायदेशीर होणार आहे.

पंतप्रधानांच्या दूरदृष्टीचा भाग

ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि ‘ईज ऑफ लिव्हिंग’ धोरणाचा एक भाग असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान अधिक सुलभ करण्याचा उद्देश आहे.

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे करणार पाहणी

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून काही भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री  दत्तात्रय भरणे आज दि. 16 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.

भरणे यांचा पुणे–इंदापूर–धाराशिव हा सुधारित दौरा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता इंदापूर येथून कुर्डुवाडी, बार्शी, येरमाळा मार्गे वाशी (जि. धाराशिव) कडे प्रयाण करतील.

दुपारी साडेतीन वाजता वाशी येथे आगमन करून शहर व लगतच्या परिसरातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी कृषिमंत्री करतील. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार राहुल भैय्या मोटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव असलकर उपस्थित राहणार आहेत.

यानंतर सायं. साडेपाच वाजता भरणे वाशी येथून पुन्हा इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे प्रयाण करतील. रात्री 8 वाजता तेथे पोहोचून मुक्काम करतील.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी भरणे यांच्या दौऱ्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ईटकुर येथील वाशीरा नदीला महापूर मुसळधार पावसात ऊस, सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान,नुकसानीचे पंचनामे करा शेतकऱ्यांची मागणी

ईटकुर (बालाजी देसाई) : कळंब तालुक्यातील ईटकूर परिसरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वाशीरा नदीला महापूर आल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच वाशिरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेतीवरील ऊस व सोयाबीन पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ईटकूरसह गंभीरवाडी, बोरगाव धनेश्वरी गावात गुरुवारी मध्यरात्री संततधार पाऊस झाला. या पावसामध्ये ईटकुर- पारा रोडवरील तसेच ईटकूर- भोगजी रस्त्यावरील वाशीरा नदीला महापुर आल्याने पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने या मार्गावरील वाहतुक सेवा पूर्णपणे ठप्प झाली होती .रस्त्यावर सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत पाणीच पाणी साचल्याने अनेक गावांशी संपर्क तुटला होता. शुक्रवारी दुपारनंतर पाणी कमी झाल्याने वाहतूक सेवा सुरळीत सुरू झाली.

वाशिरा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात घुसले. यामुळे सोयाबीन तसेच ऊस पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. तसेच या पुर परिस्थितीमुळे वाशीरा नदी काठच्या शेतकऱ्यांच्या जनावरांच्या गोठ्यात पाणी शिरल्याने मुक्या जनावरांना चांगलीच तारांबळ उडाली परंतू प्रसंगावधान ओळखून मुक्या जनावरांना पाण्यातून बाहेर काढल्याने कुठल्या ही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.

या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

  • घरांच्या पडझडीचे तलाठ्यांकडून पंचनामा
    गुरुवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे गंभीर वाडी येथील शिवाजी तानाजी दनाणे यांच्या मातीच्या घराची पडझड झाली होती. या पडझडीची माहिती मिळताच गंभीरवाडी सज्जाचे तलाठी आकाश हजारे यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला आहे.

आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग – पालकमंत्री प्रताप सरनाईक

तुळजापूर विकास आराखड्याची बैठक आता 17 सप्टेंबरला

धाराशिव – तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासंदर्भात आक्षेपांची सुनावणी न घेणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भंग असल्याची खंत पालकमंत्री तथा तुळजापूर विकास आराखडा समितीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात 15 ऑगस्ट रोजी तुळजापूरचे स्थानिक नागरिक व पालकमंत्री यांच्यात बैठक झाली.

विकास आराखड्याचे प्रेझेंटेशन स्थानिक नागरिकांना दाखवले गेले नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पुढील आठवड्यात बैठक घेण्याची सूचना दिली. तसेच या विकास आराखड्यास किती लोकांची संमती आहे, याची माहिती लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देशही दिले.

स्थानिकांच्या घरांवर बुलडोझर फिरवला जाणार नाही, असा विश्वास पालकमंत्र्यांनी नागरिकांना दिला.

पूर्वीही दिली जागा
तुळजापूर मंदिर विकासासाठी 1988 आणि 2012 मध्ये जागा दिली असून, त्यावेळी विरोध झाला नव्हता. मात्र आता आणखी किती जागा द्यायची, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. मंदिराजवळील घरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याने त्यांना हेरिटेज दर्जा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.

एकच आर्किटेक्ट का?
या आराखड्यासाठी हेमंत पाटील हेच आर्किटेक्ट असल्याचे, आणि ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे ऐकत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पहिल्या आराखड्यात आमची घरे नव्हती, मात्र दुसऱ्या व तिसऱ्या आराखड्यात ती दाखवली गेली, हे संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

बैठकीचे निरोप मिळाले नाहीत
पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार असल्याचे आठवडाभर आधी ठरले होते. मात्र बाधित नागरिकांना त्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. याबाबत तहसीलदार उत्तर देऊ शकले नाहीत, त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

आता 17 सप्टेंबरला बैठक
तुळजापूर विकास आराखड्याबाबत आता 17 सप्टेंबर रोजी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत मार्ग निघतो की नागरिकांचा विरोध कायम राहतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

करजखेडा दुहेरी हत्याकांडातील आरोपी पुण्यात पकडले; २४ तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखेची  कारवाई


धाराशिव, दि. १४ ऑगस्ट – धाराशिव जिल्ह्यातील करजखंडा (ता. धाराशिव) येथील दुहेरी हत्याकांडातील दोन्ही आरोपींना केवळ २४ तासांच्या आत जेरबंद करण्याची धडाकेबाज कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक  शफकत आमना (प्रभारी पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस ठाणे बेंबळी हद्दीत गुरनं २०९/२०२५ भादंवि कलम १०३, ३(५) बीएनएस अंतर्गत नोंद झालेल्या संवेदनशील दुहेरी हत्याकांडानंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि सचिन खटके, पोह. विनोद जानराव, नितीन जाधवर, दयानंद गादेकर, पोना. बबन जाधवर, अशोक ढगारे, चापोह. विजय घुगे आणि महेबुब अरब हे पथक रवाना झाले.

दरम्यान, गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी –

  1. जीवन हरीबा चव्हाण
  2. हरीबा यशवंत चव्हाण
    हे दोघे पुण्यातील नातेवाईकांच्या घरी आश्रयाला गेले असल्याचे कळाले. तातडीने वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने सरकारी वाहनांद्वारे पुण्याकडे रवाना होऊन जनता वसाहत, पर्वती पायथा येथे छापा टाकला. अत्यंत शिताफीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव येथे आणून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना रिपोर्टसह पोलीस ठाणे बेंबळी येथे सुपूर्द करण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई  अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.


बांधकाम कामगारांसाठी मोठा दिलासा; नोंदणी व नुतनीकरण शुल्क पूर्णतः निःशुल्क

मुंबई, दि. १३ ऑगस्ट :
राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो कामगारांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी किंवा नुतनीकरण करताना आकारले जाणारे शुल्क आता पूर्णपणे निःशुल्क करण्यात आले आहे.

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने आज (१३ ऑगस्ट २०२५) जारी केलेल्या शासन निर्णयात म्हटले आहे की, यापूर्वी बांधकाम कामगारांकडून नोंदणी व नुतनीकरणासाठी रु. २५ शुल्क आकारले जात होते. शासनाच्या २०२२ मधील आदेशानुसार ते कमी करून रु. १ करण्यात आले होते. मात्र, बांधकाम कामगारांच्या मागण्या आणि मंडळाच्या शिफारसी लक्षात घेऊन आता हे शुल्कही रद्द करून नोंदणी व नुतनीकरण प्रक्रिया पूर्णपणे शुल्कमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंडळाच्या कल्याणकारी योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत करण्यात आली आहे. राज्यातील नोंदणीकृत व सक्रिय (जिवीत) बांधकाम कामगारांसाठी मंडळामार्फत २९ विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. यामध्ये शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषयक योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा योजना आणि इतर योजनांचा समावेश आहे.

प्रक्रिया अधिक सुलभ

सन २०२० पासून बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण आणि लाभवाटप प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू करण्यात आली आहे. शुल्क रद्द झाल्याने नोंदणीसाठी कोणताही आर्थिक अडथळा राहणार नाही, तसेच नवीन कामगारांना मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सुलभता मिळेल.

थेट फायदा हजारो कामगारांना

हा निर्णय लागू झाल्याने राज्यभरातील हजारो बांधकाम कामगारांना थेट आर्थिक दिलासा मिळेल. कमी उत्पन्न असलेल्या कामगारांना नोंदणीसाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही, तसेच मंडळाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग अधिक खुला होईल.

कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत करत शासनाचे आभार मानले असून, हा उपक्रम कामगारांच्या सामाजिक सुरक्षेला आणि कल्याणाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.