धाराशिव – सामाजिक वनीकरण विभागात वृक्ष लागवडीपेक्षा “कागदी लागवड” अधिक प्रभावीपणे होत असल्याचे नेहमीच ऐकायला मिळते. पण आता या विभागातील काही अधिकाऱ्यांनी तर हजेरीच भविष्यात लावून ठेवत, जणू स्वतःची ‘भविष्यवाणी क्षमता’ सिद्ध केली आहे. कार्यालयाला आणि सामाजिक वनीकरणाला खरोखरच कोणी वाली नाही, हे या प्रकारातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
धाराशिव येथील सामाजिक वनीकरण विभागात हजेरी नोंदवहीत गंभीर अनियमितता आढळल्याची माहिती मिळत आहे. विभागाच्या कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच आगामी दिवसांच्या उपस्थितीच्या सह्या नोंदवलेल्या असल्याचे प्रत्यक्ष पाहण्यात आले. उपस्थिती नोंद हे शासकीय कामकाजातील महत्त्वाचे दस्तऐवज मानले जातात. अशा नोंदी भविष्यात आधीच भरल्या जाणे हे नियमबाह्य असून त्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
एका कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत हजेरी पट पाहण्याची विनंती करण्यात आली असता संबंधित नोंदवही दाखवण्यात आली. त्यावेळी भविष्यातील तारखांच्या सह्या नोंद झालेल्या असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. सरकारी हजेरी नोंदी या प्रत्यक्ष उपस्थितीवर आधारित असणे बंधनकारक असताना अशा पूर्वलिखित हजेरीचे स्वरूप विभागातील नियंत्रण यंत्रणेवर मोठा प्रश्न उपस्थित करते.
या प्रकाराबाबत वरिष्ठांकडून चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी पुढे येत आहे. आवश्यक असल्यास या नोंदींची तपासणी करून प्रत्यक्ष हजेरीची खातरजमा करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचे कार्यक्षेत्र मोठे असून कर्मचारी रोजच्या कामावर अवलंबून असतात. अशा स्थितीत उपस्थिती नोंदीतील अनियमितता ही गंभीर बाब मानली जात आहे. धाराशिवच्या सामाजिक वनीकरण विभागातील हजेरी नोंदवहीत भविष्यातील तारखांच्या सह्या आढळणे ही घटना गंभीर स्वरूपाची असून यामुळे विभागीय कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

सरकारी हजेरी नोंद ही प्रत्यक्ष उपस्थितीची अधिकृत नोंद असताना अशा प्रकारचे व्यवहार शासकीय सेवा नियमांचे उल्लंघन मानले जातात. त्यामुळे या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस आचारसंहिता तसेच भारतीय दंड संहितेतील लागू कलमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिक नागरिकांची ठाम मागणी आहे.
- मतदानाला 36 तास शिल्लक असताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडून धाराशिव नगरपालिकेत 2017 ते 2020 काळात 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप !
- चार ठिकाणी उमेदवार न देणं हीच पक्षाची भूमिका आ. राणाजगजितसिंह पाटील
- सामाजिक वनीकरणातील अधिकाऱ्यांची ॲडव्हान्स सही लागवड..!
- नगरपरिषद व नगरपंचायती निवडणुक २०२५ : तुळजापूर–धाराशिव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त धडक कारवाई
- प्रि जीबी, पत्रकारांना मज्जाव धाराशिव नगरपालिकेचा असाही इतिहास
