१५ वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरण: आरोपी अटकेत, पीडितेची सुखरूप सुटका

0
30

धाराशिव, दि. १२ सप्टेंबर २०२५ (प्रतिनिधी) : उसतोड कामगाराच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध शाखेने अटक केली आहे. पोलिसांनी गुप्त आणि तांत्रिक तपास करून आरोपी आणि पीडित मुलीला अहिल्यानगर येथून ताब्यात घेतले. ही कारवाई अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात झाली.

घटना १८ मार्च २०२४ रोजी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी उसतोड कामगाराने वाशी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली की, संशयित सुनिल लक्ष्मण धोत्रे याने त्यांच्या १५ वर्षीय मुलीला अज्ञात कारणास्तव फूस लावून पळवून नेले. यावरून २३ मार्च २०२४ रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम ३६३ (अपहरण) आणि ३७० (मानवी वाहतुक) अंतर्गत गुन्हा दाखल झाला. सुरुवातीला वाशी पोलिसांनी तपास हाती घेतला. नंतर, १८ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिस अधीक्षक धाराशिव यांनी हा तपास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाकडे वर्ग केला.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वात विशेष पथक स्थापन केले. या पथकात पोलिस उपनिरीक्षक सोनटक्के, महिला पोलिस हवालदार नदाफ, पोलिस हवालदार केवटे आणि पोलिस नाईक माने यांचा समावेश होता. पथकाने गुप्त बातमीदार आणि तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपी आणि पीडितेचा ठावठिकाणा शोधला. अहिल्यानगर शहरात दोघे असल्याची खात्री झाल्यानंतर, ११ सप्टेंबर २०२५ रोजी पथकाने कारवाई करून आरोपी सुनिल लक्ष्मण धोत्रेला ताब्यात घेतले आणि पीडित मुलीची सुखरूप सुटका केली. दोघांनाही वाशी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.

सध्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे, आणि पीडित मुलीला आवश्यक वैद्यकीय व मानसिक आधार दिला जात आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here