जिल्हा परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश

0
143

धाराशिव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पुरपरिस्थितीने गंभीर स्वरूप धारण केले आहे. अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून मदत व बचाव कार्याला गती देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच इतर मंत्र्यांचे दौरे होणार असल्याने प्रशासनाकडून सज्जता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद धाराशिवच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक २३ सप्टेंबर रोजी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त सर्व विभागांतील अधिकारी व कर्मचारी यांनी २३ ते २६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मुख्यालयी अनिवार्य उपस्थित राहणे आवश्यक आहे.

उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या या परिपत्रकात स्पष्ट सूचनादेखील देण्यात आल्या आहेत. त्यानुसार—

  • कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.
  • अत्यावश्यक कारणाशिवाय कोणत्याही स्वरूपाची रजा मंजूर करण्यात येऊ नये.
  • सर्व विभाग प्रमुख व क्षेत्रीय स्तरावरील कार्यालय प्रमुख यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना सूचित करावे.
  • कोणत्याही स्तरावर झालेल्या कुचराईसाठी संबंधित अधिकाऱ्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल.

जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी ही पावले उचलण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यादरम्यान मदत व बचाव कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, यावर प्रशासनाने भर दिला आहे.

परिपत्रकात विशेषतः नमूद करण्यात आले आहे की, क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीदेखील पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणार नाहीत. याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांवर टाकण्यात आली आहे.

पुरपरिस्थितीत मदत व बचाव कार्यात कोणतीही कुचराई राहू नये तसेच प्रशासनाचा वेग मंदावू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलेला हा आदेश अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here