मतदानाला 36 तास शिल्लक असताना माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्याकडून धाराशिव नगरपालिकेत 2017 ते 2020 काळात 250 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप !

0
146

धाराशिव – धाराशिव नगरपालिकेच्या मतदानासाठी अवघे छत्तीस तास शिल्लक असताना भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी पत्रकार परिषद घेत 2017 ते 2020 या काळात नगराध्यक्षांनी अडीचशे कोटींचा भ्रष्टाचार  केल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप स्थानिक लेखा परीक्षणाचा हवाला देत करण्यात आले असून स्थानिक लेखापरीक्षणात अनियमितता केल्याचा उल्लेख आहे ही अनियमित्ता आहे की भ्रष्टाचार आहे आणि त्यावर अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही याचे उत्तर भाजपकडून देण्यात आले नाही तसेच या पत्रकार परिषदेत उपस्थित युवराज नळे नगरपालिकेत गटनेते होते त्या काळात नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अशा अनियमितता झाल्याच्या चर्चा कधीच घडल्या नाहीत या प्रश्नाला त्यांनी उत्तर देण्याचे टाळले.

तत्पूर्वी बोलताना जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले की, विरोधकांकडे विकासाचा अजेंडा नाही.नगरपालिकेची निवडणूक महत्वाची, ज्याचं सरकार होतं त्यांच्याकडून जे अपेक्षित होतं ते नाही झालं.मूलभूत सोयी सुविधा कशा मिळतील याच्यावर बोलण्यापेक्षा संभ्रम निर्माण करून मत मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असून आम्हीवचननामा जाहीर केला तो दारोदारी पोहचवण्यात काम सुरू आहे. विकासाचं व्हिजन न मांडता विरोधक टीका करत असल्याचे ते म्हणाले.

हे प्रकरण आजपर्यंत का काढले नाही?

आरोप केलेले प्रकरण जर गंभीर असेल तर हे प्रकरण आजपर्यंत का काढले गेले नाही. प्रशासकाच्या काळात राज्यात भाजपची सत्ता असताना यावर भाष्य न केले गेल्याने आरोपात तथ्य आहे की नाही याचा मागमूस लागेल की नाही याबाबत साशंकता आहे. मात्र भाजप त्यांची सत्ता असताना देखील आजपर्यंत गप्प का हा मोठा प्रश्न आहे.

त्यावेळचे उपाध्यक्ष आता उमेदवार आणि युतीत!

शेवटच्या दोन वर्षाच्या काळात नगरपालिकेचे उपाध्यक्षपद अभय इंगळे यांच्याकडे होते या आरोपाबाबत त्यांना विचारले असता मी संख्येच्या बळावर उपाध्यक्ष होतो मला विशेष अधिकार नव्हते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच सत्तेच्या सुरुवातीच्या काळात सूरज साळुंके हे उपाध्यक्षपदी होते ते सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असून त्यांच्या पक्षाने नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे त्यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र विरोधकांचे संख्याबळ कमी नव्हते तरीदेखील अशी प्रकरणे तेव्हा बाहेर निघाली नाहीत त्यामुळे या प्रकरणात सत्तेतील कोणी अडकत तर नाही ना? अशी शंका निर्माण होत आहे.

पत्रकार परिषदेत काही प्रकरणांचा उल्लेख

स्वच्छतागृहांचा प्रश्न, त्यांच्या स्वच्छतेसाठी 54 लाख खर्च, त्यांना पाणीपुरवठा करायसाठी 17 लाख खर्च,260 किमी रस्ते साफ करताना 1कोटी 42 लाख,नाली साफ करण्यासाठी 1 कोटी 46 लाख खर्च,25 लाख रुपयांची फवारणी,साहित्य खरेदीसाठी 93 लाख खर्च,औषध खरेदीत 1 कोटीचा भ्रष्टाचार आदी प्रकरणांचा उल्लेख करत त्यांनी आरोप केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here