Home महाराष्ट्र मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील

मराठा समाजाच्या कल्याणासाठी फडणवीस-शिंदेंचे सर्वाधिक योगदान : नरेंद्र पाटील

0
196

मुंबई : मराठा समाजाच्या उन्नतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक काम केले असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही पुढाकाराने मराठा तरुणांसाठी विविध योजना राबवल्या गेल्या. मात्र, सध्याचे आंदोलन हे काही विरोधकांनी माथी भडकावल्यामुळे केवळ व्यक्तिविरोधी झाले आहे, अशी टीका अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सोमवारी येथे केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.

नरेंद्र पाटील म्हणाले, “शरद पवारांनी बंद केलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाची पुनर्स्थापना फडणवीस सरकारने 2014-19 मध्ये केली. याच काळात मराठा समाजातील दीड लाख तरुण उद्योजक घडवले गेले. तब्बल 13 हजार कोटींचे कर्ज, 1300 कोटींचा व्याज परतावा या महामंडळामार्फत दिला गेला. हे यश महायुती सरकारचे आहे.”

मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी या हेतूने ‘सारथी’ महामंडळाची स्थापना करण्यात आली. बार्टीच्या धर्तीवर उभारलेल्या या संस्थेमुळे मराठा तरुणांना शिक्षण आणि करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या, असेही ते म्हणाले.

चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी 350 कोटींचा निधी देण्यात आला होता. यंदा पहिल्याच टप्प्यात 300 कोटींचा निधी वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्यात निजामाच्या काळापासून मराठा समाजाला ओबीसी अथवा कुणबी हा दर्जा मिळत होता. तो अबाधित राहावा तसेच सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी कायदेशीर तपास आवश्यक असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

“महाराष्ट्रात 12 मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनी समाजासाठी काहीही केले नाही. मराठवाड्यात सर्वाधिक मुख्यमंत्री होऊनही गरीबी दूर झाली नाही, याचा आत्मपरीक्षण काँग्रेसने करायला हवे,” असा टोला त्यांनी लगावला.

आंदोलनाबाबत बोलताना पाटील म्हणाले, “शांततेने आंदोलन करणे हा सर्वांचा अधिकार आहे. पण सर्वसामान्यांना त्रास देऊन आंदोलन बदनाम करू नका. 2016 मध्ये मूकमोर्चे निघाले तरी कुणालाही त्रास झाला नव्हता. तसाच संयम ठेवावा. मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांवर न्याय्य तोडगा काढेल, यावर विश्वास ठेवावा.”

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here