उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०२० च्या हंगामातील पीक विमा नाकारणाऱ्या कंपनीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फटकारून विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास आदेशीत केले आहे.
आ. कैलास पाटील यांनी आज मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यातील पीक विम्याचा कंपनीने निर्माण केलेला पेच व तद्नंतर रिट पिटिशन दाखल करून शेतकऱ्यांनी दिलेला न्यायालयीन लढा व त्याला मिळालेले यश, या सर्व इत्यंभूत बाबी त्यांना अवगत केल्या. लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची व कंपनीस नुकसानभरपाई तातडीने देण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती केली. यावर लागलीच मुख्यमंत्री महोदयांनी कृषी सचिव यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पिकविम्या बाबत सकारात्मकता दर्शविली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर विमा रक्कम मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्नशील असून, त्याला नक्कीच यश मिळेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी समवेत कळंब तालुकाप्रमुख शिवाजी आप्पा कापसे उपस्थित होते.