सलगरा,दि.२५(प्रतिनिधी) –
बुधवारी सकाळी अचानक प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ११ वा.सु. अचानक भेट दिली. त्या मुळे सगळ्यांची चांगलीच धांदल उडाली. प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर वापरायोग्य असतानासुद्धा वर्षभरापासून बंद असल्याचे गुप्ता यांच्या पाहणीत समोर आले. संबंधितांना फैलावर घेत लवकरात लवकर त्याचे निर्जंतुकीकरण करून पंधरा दिवसात पुन्हा ऑपरेशन थिएटर सुरू करण्याचे आदेश त्यावेळी तेथील आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. प्रसुतीचे प्रमाण हे फारसे समाधानकारक नसल्याचे नमूद करीत हे प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले. या वेळी गुप्ता यांनी जवळपास तीन तास आरोग्य केंद्राची झाडाझडती घेतली. या मध्ये पहिल्या आस्थापनांची तपासणी केली, त्यात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तिका अद्यावत नसल्याचे समोर आले. तेव्हा संबंधित कर्मचाऱ्यांना त्या सेवा पुस्तिका अद्यावत करण्याचे आदेश दिले.
त्याचबरोबर तेथील निवासी इमारतीत वीज कनेक्शन ची अडचण असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्या नंतर माता व बाल संगोपन राष्ट्रीय कार्यक्रम चांगले सुरू असून शासनाच्या आदेशाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्याची सूचना दिली. चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले विशेष म्हणजे आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यीका रेनके यांनी अचानक भेट देऊन पण या वेळी चांगल्या प्रकारचे प्रेझेंटेशन दिले त्या बद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी आरोग्य सेवेच्या बाबतीत सतर्क राहावे असे सांगितले या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश गायकवाड यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.