सोलापूर : माढा पंचायत समितीच्या कृषी विस्तार अधिकाऱ्यास अकाउंट नंबर दुरुस्तीसाठी अवघ्या ५०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संदीप रामदास गावडे (वय ४५) असे या पकडण्यात आलेल्या कृषी विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई गुरुवारी पंचायत समिती कार्यालयात दुपारी 4च्या दरम्यान झाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे जिल्हा परिषद सेस डीबीटी योजनेअंतर्गत कडबाकुट्टी मशीन अनुदान मिळण्यासाठी पंचायत समिती कृषीविभाग येथे अर्ज सादर केला होता. त्याचा पाठपुरावा करत असताना आलोसे संदीप रामदास गावडे, कृषी विस्तार अधिकारी, कुर्डुवाडी पंचायत समिती कृषी विभाग यांनी अर्जामधील बँक अकाउंट नंबर चुकला असल्याचे सांगून सदर अकाउंट नंबर दुरुस्ती करण्यासाठी हजार रुपयाची मागणी करुन तडजोडीअंती पाचशे रुपये स्वीकारण्याचे मान्य करुन सदर लाच रक्कम कुर्डुवाडी पंचायत समिती, कृषी विभाग, कार्यालयात स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. याबाबत कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत चालू होती.
ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी संजीव पाटील, पोलीस उपाधिक्षक,एसीबी सोलापुर, उमाकांत महाडीक पो.नि. एसीबी सोलापुर, पो.ना अतुल घाडगे, पो. कॉ. स्वप्निल सन्नके, पो.कॉ गजानन किणगी एसीबी सोलापुर यांच्या पथकाने केली.