मिरज (प्रतिनिधी) तालुक्यातील म्हैसाळ येथे एका डॉक्टर दाम्पत्याच्या घरातील नऊ जणांनी एकाच वेळी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.
म्हैसाळ ता. मिरज येथे पशुवैद्यकीय डॉक्टर कुटुंबासहित वास्तव्यास आहेत. सोमवारी सकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडला नव्हता, त्यामुळे दवाखान्यातील कर्मचारी तसेच आजूबाजूला राहणाऱ्या ग्रामस्थांनी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पशुवैद्यकीय डॉक्टर त्यांच्यासह कुटुंबातील अन्य कोणीही मोबाईल उचलला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना शंका आल्यानंतर ग्रामस्थांनी घरात जाऊन पाहणी केली असता डॉक्टर दाम्पत्याच्या घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह मिळून आले आहेत.
या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरून गेला आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वनमोरे (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिकानगर चौकालगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह रहात होते. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. तर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह मिळून आले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरज ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे यांच्या सह पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे मिरज तालुका हादरून गेला आहे. म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन स्टेशनचे पोलिस निरीक्षक चंद्रकांत बेंद्रे हे करीत आहे.