उस्मानाबाद – वांगी (बु.), ता. भुम येथील सुभाष आण्णा पवार याने गांजा हा अंमली पदार्थ बाळगल्याने त्याच्याविरुध्द
उस्मानाबाद व आंध्र्रप्रदेशात गुन्हे दाखल असुन तो सध्या जामीन मुक्त आहे. त्याने आंध्रप्रदेशातील एका कुटूंबातील पाच व्यक्तींचे व त्यांच्याच एका नातेवाईकाचे अपहरन करुन त्यांना अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले होते. तसेच 2 मेट्रीक टन गांजा आणुन दिल्यावरच त्यांची सुटका करण्यात येईल अशी धमकी सुभाष पवार याने त्या अपहृतांच्या नातेवाईकांना दिली होती. या प्रकरणी आंध्रप्रदेशातील जीके विधी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 16/2022 हा भा.दं.सं. कलम- 341, 344, 347, 367, 506 सह एनडीपीएस कलम- 28 अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
तपासादरम्यान आंध्रप्रदेश पोलीसांचे पथक दि. 26.06.2022 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात आले होते. त्यांना तपासादरम्यान भाषेची अडचण जाणवत होती. या पथकाने स्थानिक पोलीसांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. यावर मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी कळंब विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगीतले. यावर कळंब उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या पथकातील पोउपनि- श्री. पुजरवाड यांसह पोलीस अंमलदार- किरण अंबोरे, नवनाथ खांडेकर, महेश शिंदे यांच्यासह आंध्र पोलीसांच्या संयुक्त पथकाने दि. 26- 27 जून दरम्यानच्या रात्री आरोपी सुभाष पवार राहत असलेल्या वांगी (बु.), ता. भुम येथील परिसरात पाळत ठेवली. दरम्यान पोलीसांच्या लक्षात आले की, सुभाष याच्या घरात नमूद अपहृतांना डांबून ठेवले आहे. यावर पथकाने दि. 27 जून रोजी सकाळी सुभाष पवार यास ताब्यात घेतले. तात्काळ पथकाने त्याच्या घरात डांबून ठेवलेल्या पांगी कुटूंबीय गोवर्धन, धनलक्ष्मी, तरुण- वय 4 वर्षे, संदीप- वय 2 वर्षे, यशोदा- वय 14 वर्षे यांसह जेम्मीली नागेंद्र बाबू सर्व रा. एबुलम, जी.के. विधी मंडल, जि. अल्लुरी सितारामाराजु, राज्य- आंध्द्रप्रदेश यांची पथकाने यशस्वी सुटका केली. उस्मानाबाद पोलीसांनी दाखवलेल्या धाडस व सक्रीयतेबद्दल आंध्र पोलीसांच्या पथकाने उस्मानाबाद पोलीसांचे आभार व्यक्त करुन आरोपी सुभाष आण्णा पवार यासह नमूद सहा व्यक्तींना घेउन आंध्र पोलीस आंध्रप्रदेशकडे रवाना झाले.