सलगरा,दि.१८(प्रतिनिधी) –
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चुरशीच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी चेअरमन वैजिनाथ कोनाळे, दिनकर पाटील, नागेश कुताडे, माजी सरपंच विठ्ठल मर्डे यांच्या नेतृत्वाखालील जय मल्हार परिवर्तन पॅनलने १२ पैकी ११ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांना धोबी पछाड केले. एकूण १३ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे वि.जा.भ.जा. गटातून शामराव राठोड हे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. तर माजी पंचायत समिती सदस्य खंडेराव शिंदे, यांच्या नेतृत्वाखालील जय शंभो शेतकरी विकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
रविवारी (दि.१७) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. या निवडणुकीत ५३० पैकी ४८९ मतदान झाले. सर्वसाधारण गटात जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलचे चॉंदसाहेबलाल इनामदार (२२४), लक्ष्मण गिरमल (२२३), प्रविण कुठार (२२७), वैजिनाथ कोनाळे(२३०), राम किनगे (२२९), जयराम राठोड (२३०), अशोक शेळके (२३५) निवृत्ती शिंदे (२२७), तर याच गटातून जय शंभो शेतकरी विकास आघाडीचे मनोहर भोईटे (२०४), सचिन बिडवे (२२१), आण्णाराव मोजगे (२०५), बाळू राठोड (२१५), दगडू शिंदे (२१५), विजय शिंदे (२१४), विवेकानंद सोमवंशी (२१८), माणिक येलूरे (२११) यांना सपशेल पराभव पत्करावा लागला. अनुसूचित जाती गटात महादेव गायकवाड (२५०) विजयी झाले तर भिमा गवळी (२२७) पराभूत झाले. इतर मागास प्रवर्ग गटातील शिवाजी सगर (२५२) विजयी झाले तर महेश माने (२२१) पराभूत झाले. महिला राखीव गटात जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास विकास पॅनलच्या गंगाबाई सारणे (२४३) विजयी झाल्या तर कुसूम गायकवाड (२३०) यांचा जय शंभो शेतकरी विकास आघाडीच्या कुसूम शिंदे (२३१) यांनी केवळ एका मतांनी पराभव केला. तर जय शंभो शेतकरी विकास आघाडीच्या शेषाबाई सगर (२१६) यांचाही पराभव झाला.
सोसायटी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतची रंगीत तालीम समजली जाते. त्यामुळे अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. विजय खेचून आणण्यासाठी दोन्ही पॅनलमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली होती. अखेर जय मल्हार परिवर्तन ग्राम विकास पॅनलने १३ पैकी १२ जागा जिंकून किलज सोसायटीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले आहे.