सलगरा,दि.५ (प्रतिक भोसले)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खरीप पिकाचे २०२० साली अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. आता भरपाई मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या मुळे जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार २८७ शेतकऱ्यांना ५१० कोटी रुपयाचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
तुळजापूर तालुक्यातील सलगरा दिवटी येथे शेतकऱ्यांनी फटाके फोडून घोषणा देत आनंद व्यक्त केला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा तीन आठवड्यात देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. असे असून पण विमा कंपनीने आणि सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नव्हती, त्यानंतर शासनामार्फत व संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष स्थळ पाहणी पंचनामे झाले होते त्यामध्ये ८०% च्या जवळपास शेतीपिकाचे नुकसान झाल्याचे शासनाच्या पंचनाम्यामध्ये नमूद करण्यात येऊन देखील कंपनीने केंद्र सरकारच्या धोरणाचा व शासनाशी झालेल्या करारातील तांत्रिक बाबींचा आधार घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा देण्याबाबत वारंवार टाळाटाळ केली. त्या नंतर आ. पाटील यांच्या पुढाकारातून काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीडाने शेतकऱ्यांच्या बाजुने निकाल देत शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची भरपाई देणेबाबत संबंधित कंपनीला आदेशित केले होते. मात्र कंपनीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा निकाल कायम ठेवत तीन आठवड्यात शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्याचा आदेश विमा कंपनीला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.