गणेश विसर्जन मिरवणुकीपूर्वी शहरातील चिखलमय मुख्य मार्ग दुरुस्त करा
शहरातील गणेश भक्ता सह गणेश मंडळ अध्यक्षांची तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
परंडा (भजनदास गुडे) – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक रोडवरील खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम टाकल्याने चिखलामुळे श्री गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीतील वाहने व गणेशमूर्तीला घसरुन अपघात होण्याची शक्यतानिर्माण झाल्याने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहरातील गणेश मंडाळातील गणेशभक्तांनी नायब तहसीलदार सुजित वाबळे यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील मुख्य मंडई पेठ,गोल्डन चौक,बसस्थानक, करमाळा डांबरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मातीमिश्रीत मुरूम टाकण्याचा अभिनव प्रयोग नगरपरिषद मार्फत सुरू करण्यात आला आहे.या ‘अर्थ’पूर्ण मलमपट्टीमुळे सर्वच अचंबित झाले आहेत.रस्त्यावरील खड्ड्याांमुळे दि. ८ व ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेशमूर्ती व वाहनांना अपघातासह हानी होण्याची शक्यता आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक रस्त्यावरील खड्ड्यात मातीमिश्रित मुरूम टाकल्याने चिखलामुळे गणेशभक्तांना घसरण्याचा धोका निर्माण होणार आहे. ‘आगीतून उठून फुफाट्यात पडण्या’सारखा हा प्रकार घडला आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक या मार्गावर हा मातीमिश्रित मुरमाचा अभिनव प्रयोग परंडा नगरपरिषदेने खड्डे बुजविण्यासाठी राबवत आहेत.हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून या खड्ड्यांचा आणि त्यानंतर ते ज्या अभिनव पध्दतीने बुजविले जात आहेत, त्याचा त्रास वाहनांपेक्षा जास्त दुचाकी आणि हलक्या वाहनांना होत आहे.नगरपरिषदने खड्डे मातीमिश्रित मुरमाने बुजविल्याने या माती मुरमाचे चिखलांत रुपांतर झाले आहे.सध्या पाऊस असल्याने खड्डे पूर्वी पाण्याने भरलेले असायचे. ते आता चिखलाने भरले आहेत. हा चिखल दुचाकी घसरून पडण्यास पुरेसा आहे. यामुळे आज व उद्या होणाऱ्या श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतील गणेशमूर्ती व वाहनांना धोका निर्माण होत आहे. यावर तात्काळ कच खड्डी टाकून दुरुस्ती करण्यात यावी.अन्यथा श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत गणेशमूर्ती व वाहनांना धोका निर्माण झाल्यास यांची सर्वस्वी जबाबदारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांची राहील असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर संकेत ठाकूर, प्रशांत गायकवाड, विकास साळुंखे,प्रितम डाके,पृथ्वीराज पाटील,सुरज मुसळे,आदित्य जमदाडे,सोहेल पटेल,सोहम परदेशी, आदर्श जमदाडे,अमर जमदाडे,रोहित काळे,लखन जमदाडे,कृष्णा जमदाडे,रोहित शेळके,योगेश बुरुंगे,अजय शिंदे, सागर गोफणे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत तसेच जय हनूमान टेंबे गणेश मंडळ,शिवछत्रपती गणेश मंडळ, नरवीर गणेश मंडळ, मोरया गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.