तुळजापूर (ता. १४): तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे मागील सहा महिन्यांत एकूण १२ पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातील शिस्तभंग, अनुशासनबाह्य वर्तन, तसेच कायदा व सुव्यवस्थेस धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असून, सर्व प्रक्रिया देऊळ कवायत कायद्याच्या तरतुदींनुसार करण्यात आली आहे, अशी माहिती मंदिर संस्थान प्रशासनाने दिली.
मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की, देऊळ कवायत कायदा लागू असलेल्या तुळजाभवानी मंदिरात पुजाऱ्यांचे वर्तन व कार्यपद्धती यांच्यावर नियमित नियंत्रण ठेवले जाते. संस्थानच्या वतीने वेळोवेळी पुजाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात येतात. त्या अनुषंगाने चौकशी करून दोषी आढळलेल्या पुजाऱ्यांवर विशिष्ट कालावधीसाठी मंदिर प्रवेशबंदीची कारवाई केली जाते.
प्रवेशबंदीची कारवाई करण्यात आलेल्या पुजाऱ्यांची नावे व कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- ओंकार हेमंत इंगळे – 27 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 (1 महिना)
- अभिजीत माधवराव कुतवळ – 27 नोव्हेंबर 2024 ते 26 डिसेंबर 2024 (1 महिना)
- श्रीधर विनायक क्षीरसागर – 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 (15 दिवस)
- अक्षय किशोर कदम – 17 डिसेंबर 2024 ते 01 जानेवारी 2025 (15 दिवस)
- महेश भारत रोचकरी – 04 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 (15 दिवस)
- अजय संजय शिंदे – 04 जानेवारी 2025 ते 18 जानेवारी 2025 (15 दिवस)
- सुदर्शन यशवंत वाघमारे – 01 जानेवारी 2025 ते 01 जुलै 2025 (6 महिने)
- रणजीत अविनाश साळूंके – 20 फेब्रुवारी 2025 ते 20 एप्रिल 2025 (2 महिने)
- अमित दत्तात्रय तेलंग-कदम – 12 एप्रिल 2025 ते 12 मे 2025 (1 महिना)
- नानासाहेब जगन्नाथ चोपदार – 13 एप्रिल 2025 ते 13 मे 2025 (1 महिना)
- तुषार विजयकुमार पेंदे – 23 एप्रिल 2025 ते 23 जुलै 2025 (3 महिने)
- प्रदीप विलास मोटे – 12 मे 2025 ते 12 ऑगस्ट 2025 (3 महिने)
या कारवाईमुळे पुजारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, काही पुजाऱ्यांनी संस्थान प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप नोंदवत संबंधित कारवाईच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दुसरीकडे, मंदिर प्रशासनाने मंदिराच्या अनुशासनात्मक धोरणांप्रती कटिबद्धता व्यक्त करत ही कारवाई नियमबद्ध आणि आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील प्रमुख शक्तीपीठ असून, येथे दररोज हजारो भाविक भेट देत असतात. त्यामुळे मंदिरातील शिस्त व धार्मिक कार्यपद्धतींचे पालन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. अशा पार्श्वभूमीवर संस्थानचे हे पाऊल भविष्यात पुजारी वर्गासाठी एक इशारा मानला जात आहे.
- निकृष्ट बियाणे, खते व कीटकनाशकांवरील तक्रारींवर तात्काळ कारवाईसाठी सरकारकडून तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची फेररचना
- विठुनामाच्या गजरात भूम नगरीत आषाढी पालखीचे जल्लोषात स्वागत
- मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करण्याची RPI (डे) ची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- दारूच्या नशेत शिक्षक शाळेत हजर; चिंचपूर (बु) ग्रामस्थांत संताप, शिक्षण खात्याकडे तक्रार,
- धाराशिव पोलिसांची मोठी कामगिरी : १७ गुन्ह्यांतील कुख्यात आरोपी ‘कुक्या’ अखेर गजाआड