वाशी तालुक्यात बोगस रासायनिक खत रॅकेटचा पर्दाफाश; कृषी विभागाची मोठी कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल

0
121

वाशी (प्रतिनिधी – राहुल शेळके): खरिपाच्या तोंडावर वाशी तालुक्यात बोगस रासायनिक खतांचा मोठा साठा उघडकीस आला असून, कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत बनावट खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या रॅकेटचे धागेदोरे थेट गुजरातपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे.

दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता वाशी तालुक्यातील पिंपळगाव लिंगी येथे, दसमेगाव रस्त्याच्या पश्चिमेला सुमारे ७०० मीटर अंतरावर गट नंबर ५६९ मधील एका कुकुटपालन शेडवर कृषी विभागाच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी सात वेगवेगळ्या कंपन्यांच्या नावावर विनापरवाना साठवलेली ४५६ पोती रासायनिक खते (एकूण वजन सुमारे २०.२१५ टन, अंदाजित किंमत ४,६१,१२० रुपये) जप्त करण्यात आली.

या कारवाईचे नियोजन धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषी संचालक (गुणवत्ता व नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक (लातूर) साहेबराव दिवेकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र माने आणि कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

संबंधित शेडमधील व्यक्तीकडे विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर देण्यात अपयश आल्याने, जप्त खतांचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ज्यांच्या नावावर ही खते होती, त्या कंपन्यांशी संपर्क साधला असता, संबंधित लॉट नंबर त्यांच्या नोंदीत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सदर साठा बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी वाशी तालुका कृषी अधिकारी राजाराम बर्वे यांच्या फिर्यादीवरून दत्तात्रय लिबराज तावरे (रा. पिंपळगाव लिंगी) आणि विकास रामभाऊ होळे (रा. खामकरवाडी) यांच्याविरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तालुक्यात अजूनही बनावट खताचा साठा असण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली असून, पुढील कारवाईसाठी तपास अधिक गतीने सुरू आहे. अवैध खत विक्री रोखण्यासाठी कृषी विभागासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here