सलगरा,दि.४ (प्रतिक भोसले)
तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे ‘स्वयम शिक्षण प्रयोग’ संस्था, तुळजापूर कृषी विभाग व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत भाजीपाला प्रक्रिया उद्योग यावर आधारित दि.३ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
‘स्वयम शिक्षण प्रयोग’ या स्वयंसेवी संस्थेने आता पर्यंत आरोग्य, शुद्ध पाणी, स्वच्छता, अपारंपारिक ऊर्जा, सेंद्रीय शेती आणि ग्राम विकास आदी क्षेत्रांमध्ये संस्थेने विविध उपक्रम राबवलेले आहेत. आता हि संस्था सेंद्रिय शेती या उपक्रमावर काम करत असून संस्थे मार्फत मराठवाडा जिल्हा परिवर्तन मॉडेल प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील गावांमध्ये बैठका घेऊन सेंद्रिय शेतीविषयी माहिती देऊन जनजागृती करण्याचे काम चालू आहे. या मध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी महिला गटांना पोषण आहार परसबाग साठी भाजीपाला बियाण्याचे गावोगावी वाटप करण्यात येत आहे. त्या मध्ये महाबीजचे दहा ग्राम वजनाचे दहा प्रकारचे परसबागेसाठी उपयोगात येणारे भाजीपाला बियाणे मिनी किट तालुक्यातील आत्माअंतर्गत स्थापित विविध गावातील शेतकरी महिला गटांना देण्यात आले. सदरील भाजीपाला बियाणे मिनी किटमध्ये मेथी, पालक, कारले, कोथिंबीर, भेंडी, काकडी, राजमा, दोडका इत्यादी प्रकारचे भाजीपाला बियाणे उपलब्ध आहेत. प्रकल्प संचालक आत्मा उस्मानाबाद कार्यालयामार्फत सदर बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
त्या अनुषंगाने तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) आणि गंधोरा येथे सेंद्रीय शेती या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये बोलताना मान्यवरांनी उपस्थितांना सेंद्रीय शेती विषयी मार्गदर्शन केले. या वेळी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ डॉ. वर्षा मरवाळीकर, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव लोंढे, स्वयम् शिक्षण प्रयोग संस्थेच्या गोदावरी क्षिरसागर आणि अर्चना कोळी, सलगरा पोस्टमन अर्चना जाधव यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. हे शिबिर आयोजित करण्यासाठी रागिणी सोनटक्के आणि जरीना पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले.