सोलापूर, प्रतिनिधी: राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर आधीच प्रश्नचिन्ह उपस्थित असतानाच सोलापुरातील मोदी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले आहे. बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात दूषित पाणी प्याल्याने दोन शाळकरी मुलींचा मृत्यू झाला असून, एक मुलगी गंभीर अवस्थेत मृत्यूशी झुंज देत आहे.
मृत्यू झालेल्या मुलींची नावे भाग्यश्री म्हेत्रे (वय १६) आणि जिया महादेव म्हेत्रे (वय १६) अशी आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघींनी झोपडपट्टीतील नळाद्वारे मिळालेलं पाणी प्यायलं होतं. त्यानंतर त्यांच्या तब्येती अचानक बिघडल्या. तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन मुलींचा मृत्यू झाला. तिसरी विद्यार्थिनी गंभीर अवस्थेत उपचार घेत असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.
दूषित पाणीपुरवठ्यावर संतप्त प्रतिक्रिया
स्थानिक रहिवाशांनी महापालिकेवर आणि प्रशासनावर थेट आरोप करत, गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याचे सांगितले. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. या भागात राहणाऱ्या महिलांनी उद्विग्नतेने सांगितले, “आम्ही झोपडपट्टीत राहतो, काम करून पोट भरतो. विकत पाणी घेण्याची ऐपत नाही, खासगी रुग्णालयात उपचार घेणेही शक्य नाही. तरीही आम्हाला चांगलं, सुरक्षित पाणी मिळालं पाहिजे, हा आमचा मूलभूत अधिकार आहे.”
राजकीय प्रतिक्रिया आणि प्रशासनाची दखल
घटनेची माहिती मिळताच भाजप आमदार देवेंद्र कोठे आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आमदार कोठे यांनी माध्यमांशी बोलताना दूषित पाणीपुरवठ्याच्या स्थानिकांच्या आरोपांना दुजोरा दिला आणि महापालिकेच्या आरोग्य व पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले.
दोन निरागस मुलींच्या मृत्यूमुळे महापालिकेतील कामचुकार कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल, अशी माहितीही प्रशासनाने दिली आहे.
प्रणिती शिंदेंची कुटुंबीयांना भेट
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मृत मुलींच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी तेथील वातावरण अत्यंत हृदयद्रावक होते. कुटुंबीयांचा आक्रोश आणि दुःख काळीज हेलावून टाकणारे होते. शिंदे यांनी प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
सार्वजनिक आरोग्यावर धोका
ही घटना केवळ एक अपवाद नाही, तर संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या दुरवस्थेचं उदाहरण आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, लहान मुलांचे प्राण जाणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सुरक्षित आणि शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शासन आणि प्रशासन यांना जागे होण्याची गरज
सोलापूरसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारच्या घटनांमुळे शासन व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. केवळ आश्वासनांनी नव्हे, तर ठोस कृतीनेच अशा दुर्घटनांना आळा बसू शकतो. नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देणे ही काळाची गरज आहे.