जनतेच्या आशिर्वादावरच नवा महाराष्ट्र घडवायचा आहे – ठाकरे
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी
उस्मानाबाद दि.९ (प्रतिनिधी) –
होय मी साधा आमदार आहे, साधा आमदार म्हणून महाराष्ट्राची सेवा करणार आहे. तुमची ओळख गद्दार म्हणून राहणार असा पलटवार आदित्य ठाकरे यांनी ईट येथील शेतकरी संवादा दरम्यान केला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोण आदित्य ठाकरे? माझ्यासाठी तो एक साधा आमदार आहे असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी केले होते त्याचे उत्तर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्याच मतदारसंघात येऊन दिले आहे. भूम तालुक्यातील ईट येथील जाहीर सभेत शेतकरी व जनतेशी संवाद साधताना दि.८ नोव्हेंबर रोजी दिला. दरम्यान, त्यांनी पारगाव, पिंपळगाव, गिरवली येथील पिकांची पाहणी केली. तर ठिकठिकाणी शिवसैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
संपूर्ण महाराष्ट्रात गोगलगाय, अतिवृष्टी, सततचा पाऊस यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र हे गद्दार सरकार गद्दार मंत्री व गद्दार आमदार पाहणी करून शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा देण्यासाठी साधी फिरकले देखील नाहीत. या गद्दारांना धडा शिकवून जनतेच्या आशीर्वादावरच पुन्हा नवा महाराष्ट्र घडवायचा आहे असा आत्मविश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
युवा शिवसेना सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधित त्यांना धीर दिला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, खा ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा गौतम लटके, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे, शिवाजी कापसे, विकास मोळवणे, अनिल गवारे, ज्ञानेश्वर पाटील, नायक तांबोळी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आघाडी सरकारच्या माध्यमातून आघाडी सरकारने ६५० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणून उद्योग उभारले. मात्र गद्दार सरकारच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातला स्थलांतरित झाले. त्यामुळे लोखो तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला असता. मात्र यासाठी खोके सरकार व या गद्दारांचे प्रमुख एकनाथ शिंदे हे काहीही करू शकले नाहीत. स्वतःच्या फायद्यासाठी ते आजपर्यंत १५ वेळा दिल्लीला जाऊन आले. मात्र हे उद्योग महाराष्ट्रात उभा करण्यासाठी त्यांनी काहीही प्रयत्न केले नसल्याचा गंभीर आरोपी केला. तसेच जनतेने तुम्हाला निवडून दिले असून त्यांची सेवा करा असे म्हणत शेतकरी, तरुण व उपस्थित महिलांना त्यांनी सर्व ओके आहे का ? असे म्हणत या खोके सरकारची खोकेगिरी चव्हाट्यावर आणली. मी संपूर्ण राज्याचा पाहणी दौरा करीत असून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचलेले असून शेतकऱ्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आम्ही या सरकारकडे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. परंतू सरकारने गांभीर्याने घेतले नसून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. अशी भयानक व विदारक परिस्थिती असताना देखील काही शेतकऱ्यांचे पंचनामे केली नाहीत तर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत मदत देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाली नसल्याचे सांगत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमदार कैलास पाटील यांनी उपोषण केल्यानंतर सरकारने आश्वासन दिले मात्र आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी सरकारने अद्यापपर्यंत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेतली नाही. त्यामुळे कृषिमंत्री अब्दुल गद्दार असा उल्लेख करीत महिलांचा अपमान करणाऱ्या अब्दुल सत्तारांचा तात्काळ राजीनामा घेऊन त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
——————————————
३ महिन्यांमध्ये सरकार कोसळणारच
आम्ही लोकशाही व संविधान वाचविण्यासाठी आम्ही आघाडी करुन सरकार स्थापन केले होते. मात्र विश्वासघात व गद्दारी करुन सत्तेवर आलेले असंवैधानिक खोके सरकार कोणत्याही परिस्थितीत येत्या ३ महिन्यात कोसळणार असल्याचा ठाम दावा त्यांनी केला. या वक्तव्यामुळे सत्तेतील भाजप किंवा शिंदे गटाचे किती आमदार फुटणार ? अशी चर्चा सुरु झाली आहे. यामुळे महाराष्ट्रात नेमकी कशी व कोणती उलथापालथ होईल ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.