करजखेडा येथे जलजीवन मिशन योजनेच्या पाईप चोरीची घटना

0
25

धाराशिव, 28 फेब्रुवारी 2025: करजखेडा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साठवून ठेवण्यात आलेले सुमारे 5.74 लाख रुपये किमतीचे लोखंडी पाईप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धाराशिव येथील ठेकेदार राजाभाऊ शिवाजी गडकर (वय 60, व्यवसाय – शासकीय ठेकेदार) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पाणीपुरवठा योजनेतील महत्त्वाचे साहित्य चोरीला

राजाभाऊ गडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या आदेशानुसार संतोष मुरकुटे यांच्या एस.टी.एम. इन्फ्रा. हायटेक प्रा. लि., नांदेड या कंपनीला कानेगाव व करजखेडा संयुक्त पाणीपुरवठा योजनेचे काम मिळाले होते. सदर योजनेतील काही भागाचे काम गडकर यांच्या राज कन्स्ट्रक्शन फर्म मार्फत सुरू होते.

योजनेच्या अंतर्गत माकणी येथील निम्न तेरणा धरणातून कानेगाव व करजखेडा गावांना पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन टाकण्याचे व इतर कामे करण्यात येत होती. यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने DI व HDPE पाईप्स पुरवले होते. हे पाईप विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आले होते, त्यापैकी काही करजखेडा आठवडा बाजार येथील पाण्याच्या टाकीजवळ साठवण्यात आले होते.

चोरीला गेलेले साहित्य:

150 मिमी व्यासाचे 35 लोखंडी पाईप (किंमत – ₹3,57,665)

100 मिमी व्यासाचे 30 लोखंडी पाईप (किंमत – ₹2,17,140)

एकूण नुकसान – ₹5,74,805

चोरीचा प्रकार कसा उघडकीस आला?

गडकर यांनी सांगितले की, सदर पाणीपुरवठा योजनेसाठी 18 डिसेंबर 2024 रोजी करजखेडा येथे 100 मिमी व्यासाचे 286 पाईप, 23 जानेवारी 2025 रोजी कानेगाव येथे 150 मिमी व्यासाचे 165 पाईप, तसेच 25 जानेवारी 2025 रोजी करजखेडा येथे 150 मिमी व्यासाचे 165 पाईप उतरवले गेले होते. हे पाईप टप्प्याटप्प्याने योजनेसाठी वापरण्यात येत होते.

30 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गडकर प्रकृती अस्वस्थतेमुळे कामावर हजर राहू शकले नाहीत. त्यानंतर इतर कामांमुळे करजखेडा येथे लक्ष देता आले नाही. मात्र, 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता गडकर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे शाखा अभियंता किरण जाधव आणि चॉईस कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि., अंधेरीचे अभियंता पंकज गुंड यांच्यासह पाहणीसाठी गेले असता पाईप कमी असल्याचे निदर्शनास आले.

त्यांनी योजनेच्या इतर ठिकाणी कामाची तपासणी केली असता अनेक पाईप योजनेसाठी वापरण्यात आल्याचे दिसले, मात्र करजखेडा येथील काही पाईपांचा हिशोब लागत नव्हता. त्यानंतर त्यांनी करजखेडा येथे पुन्हा जाऊन बारकाईने पाहणी केली असता खालील वर्णनाचे आणि किमतीचे पाईप चोरीला गेलेले असल्याचे स्पष्ट झाले.

चोरीला गेलेले साहित्य व अंदाजित नुकसान:

26 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान चोरी

गडकर यांच्या म्हणण्यानुसार, ही चोरी 26 जानेवारी 2025 दुपारी 2 वाजल्यापासून 22 फेब्रुवारी 2025 दुपारी 4 वाजेच्या दरम्यान घडली असावी. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने करजखेडा आठवडी बाजारातील पाण्याच्या टाकीजवळ साठवलेले 65 पाईप चोरून नेले आहेत.

पोलिसांत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गडकर यांनी या चोरीची सविस्तर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here