धाराशिव – केंद्रीय अर्थसंकल्पावर आयोजित पत्रकार परिषदेत आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी या बजेटचे विविध पैलू स्पष्ट करताना, “हा अर्थसंकल्प विकसनशील भारताला विकसित भारताकडे नेणारा आहे,” असे प्रतिपादन केले. या पत्रकार परिषदेला आ. राणाजगजितसिंह पाटील, संताजी चालुक्य पाटील, दत्ता कुलकर्णी आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अस्मिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा
आ. कल्याणशेट्टी म्हणाले, “५० लाख कोटींचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला असून, मध्यमवर्गीय नागरिकांसाठी कर सवलतींचा मोठा फायदा आहे. १२ लाख रुपयांपर्यंत कर सवलत दिली असून, त्यामुळे नागरिकांची क्रयशक्ती वाढेल.”
उद्योग आणि रोजगाराला चालना
या अर्थसंकल्पात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राला मोठा भर देण्यात आला आहे. पहिल्यांदा उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना तसेच महिलांना २ कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
शेती आणि आरोग्य क्षेत्रात मोठे निर्णय
आ. कल्याणशेट्टी म्हणाले, “या बजेटमध्ये तेलबियांची खरेदी १०० टक्के होणार असून, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. तसेच पायाभूत सुविधांसाठी राज्यांना ३ लाख कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. कॅन्सर रुग्णांसाठी देशभरात २०० नवीन कॅन्सर सेंटर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.”
पर्यटन आणि दारिद्र्य निर्मूलनावर लक्ष केंद्रित
पर्यटनाला चालना देण्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असून, त्यामुळे आर्थिक विकासाबरोबर रोजगार संधीही निर्माण होतील. याशिवाय “लखपती दीदी” योजनेसाठी १० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या १० वर्षांत दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या शून्यावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
धाराशिव जिल्ह्याला विशेष स्थान मिळावे
आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले की, “प्रधानमंत्री आय संरक्षण योजनेत देशातील १०० जिल्ह्यांचा समावेश होणार असून, धाराशिव जिल्ह्याचा समावेश व्हावा, यासाठी ठराव मांडला जाणार आहे. तसेच देशातील १०० जिल्ह्यांना आधुनिकतेची जोड देण्याच्या निर्णयात धाराशिवचा समावेश असावा, यासाठी प्रयत्न केले जातील.”तसेच वडगाव येथे उभारण्यात येणाऱ्या MSME पार्कमध्ये ९४ उद्योजकांनी सहभागाची तयारी दर्शवली असल्याचे त्यांनी सांगितले
महाराष्ट्राला भरघोस लाभ
आ. कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातून भरघोस निधी मिळाला असून, पायाभूत सुविधा, शेती, उद्योग आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक होणार आहे. संपूर्ण देशाच्या विकासाला गती देणारा आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.