विकास कामांसाठी जशी लोकप्रतिनिधींची गरज तशीच पत्रकारांची गरज – पालकमंत्री सरनाईक

0
24

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकार विमा सुरक्षा कार्डांचे वित


धाराशिव, दि. २० (प्रतिनिधी)“पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ते सर्वसामान्य जनतेच्या समस्या सरकार दरबारी पोहोचवतात आणि त्यामुळेच विकासकामांना दिशा मिळते. जशी लोकप्रतिनिधींची गरज असते, तशीच पत्रकारांचीही गरज आहे,” असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया या संस्थेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांना अपघात विमा सुरक्षा कवच कार्डांचे वितरण करण्यात आले. पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते हा वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री सरनाईक होते.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती:
खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, युवासेनेचे राज्य समन्वयक तथा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे, शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य सरचिटणीस चेतन कात्रे, राज्य कार्यवाह अमर चोंदे, जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, पोस्ट बँकेचे वरिष्ठ प्रबंधक चंद्रकांत झेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.


पत्रकारांसाठी विविध सोयी-सुविधांचा विचार – पालकमंत्री सरनाईक

यावेळी बोलताना पालकमंत्री सरनाईक म्हणाले, “पत्रकारांना निवासासाठी जागा, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांसाठी बस प्रवास सवलत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करून देण्याच्या मागण्या रास्त आहेत. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.”

तसेच एस.टी. सेवा सर्वसामान्यांसाठी पोहोचवण्याच्या संकल्पाचा पुनरुच्चार करताना त्यांनी सांगितले की, “आदिवासी भागातील दुर्गम पाड्यांपर्यंत एस.टी. बस पोहोचवण्यासाठी माझा कटिबद्ध संकल्प आहे.”


“पत्रकारांचे संरक्षण महत्त्वाचे” – आमदार कैलास पाटील

पत्रकारांसाठी विमा सुरक्षा कवच उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचे कौतुक करत आमदार कैलास पाटील म्हणाले, “पत्रकार हे लोकशाहीच्या बळकटीसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचे संरक्षण महत्त्वाचे आहे, म्हणूनच हा विमा सुरक्षा कवच उपक्रम सुरू करण्यात आला आहे.”

तसेच पत्रकारांनी लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.


“पत्रकारांना दबावमुक्त वातावरण हवे” – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पत्रकारांच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “गावागावातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पत्रकारांनी केले आहे. मात्र, हल्ली पत्रकारांवर दबाव टाकला जात आहे, जी परिस्थिती लोकशाहीसाठी घातक आहे.”

तसेच त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवर सरकारने त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी केली.


तुळजापूर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मोठा निर्णय

या कार्यक्रमात पालकमंत्री सरनाईक यांनी तुळजापूर येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. “या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत,” अशी माहिती त्यांनी दिली.

तसेच तुळजाभवानी मंदिराच्या विकासकामांसाठी उच्च दर्जाच्या कामांची ग्वाही देताना, मंदिराचा कळस आणि इतर महत्त्वाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.


आश्वासनांची अंमलबजावणी महत्त्वाची – पत्रकारांनी जाब विचारावा

खासदार राजेनिंबाळकर यांनी स्थानिक विकासाच्या दृष्टीने काही प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी नेत्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “निवडणुकीपूर्वी अनेक आश्वासने दिली जातात, मात्र त्यांची अंमलबजावणी शून्य असते. त्यामुळे पत्रकारांनी याबाबत अधिक तीव्र भूमिका घ्यावी.”

त्यांनी तुळजाभवानी मंदिराच्या प्रसाद योजनेवरही टीका करत विचारले, “या योजनेतून एक रुपयाही आला का?”


२०५ पत्रकारांसाठी विमा संरक्षण कवच

या कार्यक्रमादरम्यान २०५ पत्रकारांचा अपघात विमा उतरविण्यात आला.

प्रारंभी दीपप्रज्वलन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रवक्ता मनोज जाधव यांनी केले, तर आभार महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे यांनी मानले.


उपस्थित मान्यवर आणि पत्रकार

या वेळी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, डिजिटल विंगचे जुबेर शेख, रेडिओ विंगचे रमेश पेठे, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ कांबळे, सरचिटणीस आकाश नरोटे, कोषाध्यक्ष रवींद्र लोमटे, कार्यवाहक दयानंद काळुंके, प्रसिद्धी प्रमुख सलीम शेख यांच्यासह धाराशिव जिल्ह्यातील अनेक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here