राजकीय पक्षांचे निवडणूकविषयक प्रशिक्षण,निवडणूक काळात विविध परवानग्या देतांनाराजकीय पक्षांना सहकार्य करण्यात येईल-जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे

0
99

धाराशिव,दि.19(प्रतिनिधी): येत्या 7 मे रोजी होणाऱ्या 40-उस्मानाबाद लोकसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या विविध राजकीय पक्षांचे तसेच अन्य उमेदवारांना लागणाऱ्या विविध परवानग्या देतांना सहकार्य करण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी विविध परवानग्या मिळण्यासाठी सुविधा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.
आज 19 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने सुविधा पोर्टलची माहिती, नामांकन अर्ज सादर करणे, प्रतिज्ञापत्र भरणे आणि विविध परवानग्या मिळणे तसेच माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची कामे याची माहिती देण्यासाठी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी उपस्थित राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना डॉ.ओम्बासे बोलत होते.
यावेळी जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी तथा संगणक सुरक्षा, आयटी ॲप्लीकेशन कक्षाचे नोडल अधिकारी पुरुषोत्तम रुकमे, महसूल तहसिलदार तथा सी-व्हिजील व विविध परवाने कक्षाचे नोडल अधिकारी प्रवीण पांडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी विवेक खडसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
डॉ.ओम्बासे म्हणाले, उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने सुविधा पोर्टलवर एकदा नोंदणी करावी म्हणजे उमेदवारांचे निवडणूकविषयक नामांकन अर्ज दाखल करणे, प्रतिज्ञापत्र देणे आणि विविध निवडणूकविषयक परवानग्या काढणे याबाबीस हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांना निवडणूकविषयक कामे करणे सोपे जाणार आहे. जे राजकीय पक्ष सुविधा पोर्टलवर विविध परवानग्या मिळण्यासाठी प्रथम अर्ज करतील त्यांना प्रथम परवानग्या दिल्या जातील. अशाप्रकारे कामे करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
श्री.पांडे यांनी एक खिडकी कक्षातून तात्पुरते पक्ष कार्यालयासाठी अर्ज करणे, ना हरकत प्रमाणपत्र व परवानगी पत्राचे नमुने तसेच सुविधा पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज करुन परवानग्या विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना देण्यात येणार असल्याचे सांगितले.
उमेदवार व त्यांना प्रतिनिधींनी ऑनलाईन परवानग्या मिळण्यासाठी अर्ज करावे असे सांगून श्री.पांडे म्हणाले, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना काही परवानग्या विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्राकरीता पाहिजे असल्यास त्यांनी संबंधित सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज करुन त्या परवानग्या घ्याव्यात. संपूर्ण लोकसभा क्षेत्रासाठी विविध प्रकारच्या परवानग्या घ्यायच्या असल्यास त्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून घ्याव्यात. जे वाहन निवडणूक प्रचारात वापरण्यात येणार आहे, त्या वाहनाचे चारही बाजूंचे फोटो उपलब्ध करुन द्यावे. ज्या ठिकाणी कॉर्नर सभा व रॅली काढण्यात येणार आहे, त्या ठिकाणची व त्या मार्गाचे संबंधितांचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी हेलीकॉप्टरने येणाऱ्या राजकीय नेत्यांचे हेलीकॉप्टर उतर‍विण्याच्या ठिकाणची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातील एक खिडकी कक्षातून देण्यात येणार असल्याचे श्री.पांडे यांनी सांगितले.
श्री.रुकमे यांनी सुविधा पोर्टलची माहिती दिली. उमेदवारांना व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूकविषयक विविध परवानग्या या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करुन व आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन मिळविता येईल. त्यामुळे प्रत्यक्ष परवानग्या मिळविण्याचा त्रास वाचण्यास मदत होणार आहे.
उमेदवार किंवा प्रतिनिधींना सुविधा पोर्टलवरुन विविध प्रकारच्या परवानग्या मिळविण्यासाठी संबंधिताचा मोबाईल क्रमांक, ई-मेल, उमेदवाराचे संपूर्ण नांव व जन्मतारीख पोर्टलवर नमुद करणे आवश्यक आहे. असे सांगून श्री रुकमे म्हणाले, सुविधा पोर्टलवर उमेदवार व राजकीय पक्षांना अर्ज करता येतील. उमेदवारांचे नामांकन ऑनलाईन भरण्याची सुविधा या सुविधा पोर्टलवर आहे. प्रतिज्ञापत्र देणे व विविध परवानग्या काढण्याची सुविधा या पोर्टलवर आहे. उमेदवाराने सुविधा पोर्टलवर एकदा नोंदणी करावी म्हणजे उमेदवारांचे निवडणूकविषयक नामांकन अर्ज दाखल करणे, प्रतिज्ञापत्र देणे व परवानग्या काढणे ह्या बाबी सोप्या होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.खडसे यांनी माध्यमे प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या कार्यपध्दतीची माहिती दिली. ही समिती राजकीय जाहिरातीचे प्रमाणीकरण, पेडन्युज संबंधित कामकाज, निवडणूक खर्चाच्या दृष्टिकोणातून जाहिरातीवर लक्ष ठेवण्यासोबतच निवडणूकविषयक पॉम्पलेटस, पोस्टर हॅन्डबील यावरही समितीचे संनियंत्रण राहणार आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांनी जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी 3 दिवस अगोदर अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. हस्तपत्र, घडीपत्रिका किंवा भित्तीपत्रके मुद्रक आणि प्रकाशकाच्या उल्लेखाशिवाय प्रकाशित करु नये. असे त्यांनी सांगितले.
राजकीय पक्षांसाठी आयोजित या प्रशिक्षणाला भाजपाचे जिल्हा सरचिटणीस इंद्रजित देवकते, शिवसेना (ठाकरे गट) संदिप खोचरे, वंचित बहुजन आघाडीचे शितल चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा महासचिव प्रविण जगताप, जिल्हा सचिव सादीकखॉ पठाण यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here