धाराशिव – जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी झालेली असतानाच संभाव्य अडचणीच्या स्थितीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांना पत्र लिहीत मार्गदर्शन मागविले आहे.
सद्यस्थितीत महाराष्ट्रात मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण देणेचे अनुषंगाने उपोषण, रास्ता रोको आयोजित केले जात आहेत, त्यातच मराठा समाजास इतर मागासवर्ग संवर्गातून आरक्षण दिले जात नसल्याने मराठा समाजातील नागरीक नाराजीने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये जास्तीत जास्त लोकसभा सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास EVM मशिनचे क्षमतेपेक्षा जास्त उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यास EVM मशिनद्वारे निवडणूक घेणे अडचणीचे ठरणार आहे.
मतपत्रीका व मतपेट्यांचा वापर करुन निवडणुक घ्यावयाची झाल्यास त्यासाठी अपुरे मनुष्यबळ, मतपेट्या अनुपलब्धता अशा प्रकारच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. त्याशिवाय मतपत्रीकेवर उमेदवारांच्या संख्या वाढल्यास मतपत्रीकाही तीतकीच मोठ्या आकाराची होणार आहे व त्याची घडी घातल्यानंतर मतपेटीमध्ये जास्त जागा व्यापली जाणार आहे व त्यामुळे मतपेट्या देखील मोठ्या प्रमाणात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतपेट्यांची संख्या वाढल्यास मतदान केंद्रात नियुक्त करावयाचे मतदान अधिकारी/कर्मचारी यांचे संख्येत तसेच सदर निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर पाठविणे व स्ट्रॉग रुम मध्ये जमा करणेसाठी अतिरिक्त वाहनांची आवश्यक्ता भासणार आहे. त्याच प्रमाणे निवडणूका झाल्यास मतमोजणी पावेतो मतपेट्या सुरक्षित ठेवणेकामी जागा देखील अपुरी पडणार आहे.
तरी परिस्थितीचे अनुषंगाने आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ ची निवडणूक प्रक्रिया अंमलबजावणी करण्यास येणा-या अडचणी निदर्शनास आणून देत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पत्रात म्हटले आहे.