लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने पहिला डाव टाकला असून तब्बल १९५ उमेदवार जाहीर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणासीतून लढणार आहेत, अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांची नावे आहेत. दोन माजी मंत्र्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. 28 महिलांना यावेळी लोकसभेचं तिकीट देण्यात आल्याची घोषणाही भाजपचे महासचिव विनोद तावडे यांनी केली आहे. भाजपने पहिल्या यादीत सोशल इंजिनिअरींगवर भर दिला आहे. भाजपने वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराला यापूर्वीच सुरुवात केली आहे. विरोधकांच्या आघाडीचे जागा वाटप निश्चित होण्यापूर्वी उमेदवार जाहीर करून भाजपने खेळी खेळली आहे.
भाजपचे महासचिव विनोद तावडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष वैजंत पांडा आणि माध्यम प्रमूख अनिल बलोनी यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. 16 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 195 उमेदवारांची यादी आज घोषित करण्यात येत असल्याचं विनोद तावडे यांनी सांगितलं. या यादीत एकूण 34 केंद्रीय आणि राज्यमंत्र्यांना तिकीट देण्यात आलं आहे. पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आहे. मोदींना वाराणासीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर अमित शाह हे गांधीनगरमधून लढणार आहेत. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही लोकसभा निवडणूक लढणार आहेत. अंदमान निकोबारमधून विष्णू पडारे, अरुणाचल प्रदेश वेस्टमधून किरण रिजीजू, अरुणाचल ईस्टमधून तापीर गांवता निवडणूक लढणार आहेत.
भाजपच्या पहिल्या यादीत विविध राज्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. पहिल्या यादीत उत्तर प्रदेशातील 51, पश्चिम बंगालमधील 26, मध्यप्रदेशातील 24, गुजरातमधील 15, राजस्थानमधील 15, केरळमधील 12, तेलंगनातील 9, आसाममधील 14, झारखंडमधील 11, छत्तीसगडमधील 11, दिल्लीतील 5, जम्मू-काश्मीरमधील दोन, उत्तराखंडमधील तीन, अरुणाचल प्रदेशातील दोन, गोवा, त्रिपुरा, अंदमान आणि निकोबारमधील प्रत्येकी एका उमेदवाराचं नाव आहे.