धाराशिव – भाजप आणि शिवसेनेतील(उबाठा)१७४ कोटींच्या विकासकामांच्या उद्घटनावरून सुरू झालेल्या आरोपांच्या फैरी अद्याप थांबलेल्या नाहीत त्याचा पुढचा अंक आज तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी यांनी केलेल्या टिकेवरून दिसून आला त्यालाही भाजपकडून लागलीच प्रत्युत्तर दिल्याने हा सिलसिला निवडणुका होईपर्यंत थांबणार नसल्याचे चित्र आहे. दरम्यान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर बेछूट आरोप करायचे बंद करा अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा सतिषकुमार सोमाणी यांनी दिला. तसेच येत्या काळात योग्य वेळ आल्यानंतर टेबल लावून टक्केवारी गोळा करतानाचे व्हिडिओ देखील दाखवू असे सोमाणी यावेळी म्हणाले.
धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या नावाखाली डॉ.पद्मसिंह पाटील हे अब्जाधीश खासदारांच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आले, परंतु धाराशिव जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसर्या क्रमांकावर आला. अशा कर्तृत्त्ववान नेत्याचे लांगूलचालन करण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे हे करत आहेत. डॉ.पद्मसिंह पाटील यांनी धाराशिव येथे मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय स्वतःच्या संस्थेच्या घशात घातले. सुतगिरणी, कुकुट्टपालन उद्योगही बुडविले. हजारो बेरोजगारांचा रोजगार बुडवून विकासाची भाषा करणार्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी, त्यांच्या या कामाची कीव येत असल्याचेही सोमाणी म्हणाले.
सोमनाथ गुरव यांनी लावला तो व्हिडिओ
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी एका सभेत बोलताना आ. पाटील यांच्यावर टीका करताना मोठ्या आवेशात भाषण करताना फाईव फाईव वन वन या क्रमांकावरून खिल्ली उडवली होती. तोच व्हिडिओ सोमनाथ गुरव यांनी दाखवला. तसेच नगर पालिकेच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून धाराशिव शहरातील बायपास रोडवरील पर्यायी रस्ता व पथदिवे यासाठी केलेल्या कामाचा पाढा वाचून दाखवला.
गोरगरिबांच्या हक्काचा रेशनाचा गहू व तांदूळ चोरीचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत त्यांना तालुकाप्रमुख का केलं? आमदार,खासदारांनी उत्तर द्यावे- अभय इंगळे
गोरगरिब नागरिकांना पोटभर अन्न मिळावे यासाठी सरकारने दिलेला रेशनचा तांदूळ व गहू चोरून त्याची विक्री करण्याचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तीला स्वच्छ चारित्र्याचा नेता म्हणून राज्यभर ओळख असलेल्या राणा दादांवर बोलण्याचा अधिकार आहे का..? हे सगळं माहिती असताना सोमानींना तालुका प्रमुख करण्यामागे खासदार व आमदारांना नेमकं कोणाचं हित साधायचं होत याच त्यांनी उत्तर द्यावे असा घणाघात भाजपचे शहर अध्यक्ष अभय इंगळे यांनी केला आहे.
सोमाणी यांनी पत्र परिषदेत केलेल्या आरोपांना उत्तर देताना इंगळे यांनी त्यांच्यावर रेशनचा माल चोरीचे असलेल्या गुन्ह्याची उजळणी करून देऊन जोरदार प्रतिहल्ला केला आहे.अधिकारी,कंत्राटदार यांच्याकडून टक्केवारी घेणे ही तुमची संस्कृती आहे म्हणत इंगळे यांनी येणाऱ्या निवडणुकीत भाजपाचा सामान्य कार्यकर्ता तुम्हाला तुमची जागा दाखवेल अस म्हटले आहे.
पाच वर्षात धाराशिव शहरात भ्रष्ट कारभार केल्याने शहरातील नागरिकांचे होणाऱ्या हालअपेष्टाला तुमचे नेते जबाबदार असून तुमच्या पक्षाचे मुख्यमंत्री असताना जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्पांना एक रुपया आणू शकला नाहीत हे तुमचे कर्तृत्व सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे.तुमच्या नेत्यांनी कोणाकडून किती वसुली केली याची पुराव्यानिशी माहिती लवकरच जनतेसमोर आणली जाईल.
चालू तेरणा कारखाना बंद पाडणे, चालू जिल्हा बँक डबघाईला आणणे हे तुमच्या नेत्यांचे कार्य संबंध जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे.या पापात तुम्ही देखील भागीदार आहात.महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जिल्ह्यातील महत्वाचे सर्वच विषय मार्गि लागत आहेत,मोठ्या प्रमाणात सरकार निधी उपलब्ध करून देत आहे म्हणून तुमचा पोटशूळ उठला आहे हे सर्वश्रुत आहे.त्यामुळे इथून पुढे तोंड सांभाळून बोला अन्यथा तुमचे व तुमच्या नेत्यांचे काळे कारनामे लवकरच बाहेर काढले जातील असा इशारा अभय इंगळे यांनी दिला आहे.