धाराशिव – अनधिकृत बॅनर बाजीवर उच्च न्यायालयाने शासनाला अनेकदा फटकारले आहे. याबाबत सूचना देखील केल्या आहेत. मात्र पुढाऱ्यांकडून या निर्देशांना नेहमी मूठमाती दिली जाते. धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या दिशादर्शक कमानीवर बॅनर लावण्याचे आणि कार्यक्रम उलटून १० दिवस तसेच ठेवण्याचे धाडस मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी केले आहे.
स्व. वसंतराव काळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे संमेलन भरविण्यात आले असून शिक्षक आमदार विक्रम काळे हे त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. ०२ फेब्रुवारी रोजी हे संमेलन भरविण्यात आले होते मात्र दहा दिवस उलटून देखील बार्शी लातूर मार्गावर असलेल्या या कमानीवर झळकत असलेले हे बॅनर वाहनचालकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. शासकीय मालमत्ता फुकटात वापरण्याची ही क्लृप्ती कदाचित यापूर्वी कधीच वापरली गेली नाही. या बॅनर मुळे अनेकांचा मार्ग भटकण्याचा, खोळंबा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने देखील याकडे दुर्लक्ष केल्याने अधिकारी नेमक्या कोणत्या दबावात आहेत याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत.