मुंबई – मराठा आरक्षणासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज बांधव हे आमरण उपोषण करण्यासाठी मुंबईकडे येत असून, त्यांच्यासाठी जनसुविधा, अत्यावश्यक सेवा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी सुप्रीम कोर्टाचे अधिवक्ते डॉ.राजसाहेब पाटील यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सकल मराठा समाज आपल्या आरक्षण व अन्य विविध मागण्यांसाठी २० जानेवारीपासून मागण्या मान्य होईपर्यंत मुंबई येथे मोठ्या संख्येने, आमरण उपोषणासाठी येत आहे. आपणास आग्रहाची विनंती की, मराठा समाजासाठी आमरण उपोषणाचे ठिकाण व मराठा मार्ग येथे वैद्यकीय सेवा, अग्निशमन तथा रुग्णवाहिका व तत्सम अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विविध स्तरातील ग्रामीण भागातील मराठा समाज बांधव, भगिनी, युवा, कष्टकरी, शेतकरी, जेष्ठ नागरिक, लहान थोर यांच्यासाठी अत्यावश्यक सेवा यामध्ये शौचालय, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय सुविधा रुग्णवाहिका,प्रथमोपचार, औषधोपचार, औषधी, फिरते दवाखाने, हॉस्पिटल, पोलीस संरक्षण तसेच अन्न व पाणी, निवाऱ्याची, जसे की मंडप, ऊन, वारा व पाऊस, थंडी यांपासून संरक्षण मिळण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच मराठा समाज बांधवांचे संरक्षण, मराठा मार्गावरील व मुंबईमधील उपोषणस्थळी वाहतूक व्यवस्थेचे वाहतूक यंत्रणेमार्फत येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याचे योग्य नियोजन करण्यात यावे. महाराष्ट्र शासनाने वरील सर्व बाबींचा विचार करावा व जनसुविधा, अत्यावश्यक सेवा,अन्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती या निवेदनात डॉ.राजसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.