महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अनेक वर्षापासून लेडीज क्लबच्या माध्यमातून ‘हिरकणी महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ घेत आत्मनिर्भर बनत महिलांनी विकसित भारताच्या संकल्प यात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी लेडीज क्लब आयोजित हिरकणी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, जिल्ह्यात १५०० हून अधिक उद्योजकांनी प्रधानमंत्री/मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनांच्या माध्यमातून विविध उद्योग सूरु करत स्वतःला व इतरांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिला बचत गटांनी ड्रोनद्वारे शेती मशागतीची कामे करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.
लेडीज क्लबच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यावेळी बोलताना म्हणाल्या कि, धाराशिव जिल्ह्यातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्यासाठी लेडीज क्लब च्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. महालक्ष्मी सरस भीमथडी जत्रा तसेच महिला बचत गटांच्या वेगवेगळ्या उत्पादित वस्तूंच्या प्रदर्शनासाठी धाराशिव जिल्ह्यातील महिला बचत गटांना नेऊन त्याची विक्री व्यवस्था तसेच मार्केटिंग शिकवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर्षी संक्रांतीचे वाण म्हणून श्री राम प्रभूंच्या मूर्ती महिलांना देणार असल्याचं सांगत 22 जानेवारीला घरोघरी या मूर्तीचे पूजन करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
धाराशिव शहरातील लेडीज क्लबच्या प्रांगणात १० जानेवारी पर्यंत महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे १५० स्टॉल्स मांडण्यात आले असून महिलांसाठी उद्योजकीय तसेच सांस्कृतिक मनोरंजन, गीत रामायण यासारखे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
पहिल्या दिवशी देवीची नऊ रूपे नृत्य अविष्कारामध्ये सादर करणाऱ्या चाळीस महिलांच्या ताफ्याचा नवदुर्गा हा कार्यक्रम संपन्न झाला. महिला उद्योजकांना प्रेरणा देण्यासाठी सदरील कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्री / मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत कर्ज घेऊन उद्योग सुरू केलेल्या जिल्ह्यातील यशस्वी हिरकण्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री.संताजीराव चालुक्य पाटील, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन श्री.सुरेशभाऊ देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष श्री.नितीन काळे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.अस्मिताताई कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.नेताजीराव पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती सौ. महिमा कुलकर्णी यांच्यासह बहुसंख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.